सिंहगडावर कपड्यांवरून वाद, नियम ठरवण्याचा अधिकार कोणाचा? मारहाणीनंतर उभे राहिले अनेक प्रश्न

    • Author, प्राची प्रतिभा शिरिष
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

पुण्यात सिंहगडावर एका आठ वर्षांच्या मुलीनं शॉर्ट्स घातल्या म्हणून सोबतचे पालक आणि इतरांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांच्या मित्राने केला आहे. यावरून त्यांनी तक्रार दाखल केली असून त्यावरून पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पण हा वाद कपड्यांवरून नव्हता तर मद्यपान तसंच गुटखा खाण्यावरून लोकांना अडवण्यावरून झाला असल्याचा दावा, आता ज्या संघटनेवर आरोप करण्यात आला आहे त्या समस्त हिंदू बांधव संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पडवळ यांनी केला आहे.

पण या सगळ्या दरम्यान सिंहगडावरच शॉर्टस घालून प्रवेश दिला जाणार नाही, पूर्ण कपडे घालून यावे असा बोर्डच लावण्यात आला आहे.

पुरातत्व विभाग, वन विभाग, पर्यटन विभाग अशा विविध विभागांनी लावलेल्या बोर्डांच्या गर्दीत, 'सिंहगड फोर्ट' अशा नावाने लावलेला हा बोर्ड नेमका कोणी लावला? याची कोणालाही माहिती नाही. त्यामुळे कथित संस्कृतीरक्षक विरुद्ध सामान्य लोक असा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

मुळात पुरातत्व विभागापासून ते पोलिसांपर्यंत यंत्रणा असताना या संघटनांकडून अशी कारवाई का केली जाते? असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.

काय घडलं?

सिंहगडाच्या 'पुणे दरवाजा'कडे जाताना पार्किंगपासून बाहेर पडलं, की लगेच लाल रंगातला एक बोर्ड दिसतो. या बोर्डवर 'शॉर्ट्स किंवा अयोग्य कपडे घालून सिंहगडावर येऊ नये', असा संदेश लिहिलेला आहे.

भारतीय संस्कृती समजून घेऊन त्याचे पालन करावे, असंही त्यावर नमूद करण्यात आलं आहे. खाली सिंहगड फोर्ट असे नाव आहे.

अवधूत पाटील, त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि मुलं हे सगळे 16 ऑगस्टला सिंहगडावर गेले तेव्हा याच कपड्यांच्या मुद्द्यावरून त्यांना अडवण्यात आलं असा त्यांचा दावा आहे. पण या शॉर्ट्स 8 वर्षांच्या मुलीने घातल्या होत्या.

सुटीचा दिवस असल्याने अवधूत पाटील आणि त्यांचे मित्र कुटुंबासोबत सिंहगडावर गेले. नंतर ते गडावर असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी गेले.

तिथं फोटो काढत असताना काही लोकांनी आक्षेप घेतला. हा आक्षेप सोबत असणार्‍या 8 वर्षांच्या मुलीने शॉर्टस् का घातल्या यावरून घेतला गेला, असल्याचा दावा पाटील करतात.

यानंतर सगळे बाहेर आले. मात्र तरीही हा मुला-मुलींचा गट पाठीमागे आला आणि त्यांच्याशी वाद होऊन त्यांनी आपल्याला मारहाण केली, असं पाटील यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हणलं आहे.

समस्त हिंदू बांधव या संघटनेचे हे लोक फक्त आपलीच नाही तर इतरांचीही अडवणूक करत असल्याचं पाटील सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना पाटील म्हणाले, "16 तारखेला आमचं अचानक सिंहगडावर जाण्याचं ठरलं. समाधीचं दर्शन घेऊन फोटो काढत असताना ती मंडळी तिथं उपस्थित होती. त्यांनी येऊन एका मुलाने बर्मुडा घातलेला आहे, तुम्हांला संस्कृती कळत नाही का? असं म्हणत आम्हांला जाब विचारला. मी त्यांना सांifतलं की आम्ही येण्याचा निर्णय अचानक घेतला आहे. आणि ही मुलगी लहान आहे. आम्ही बाहेर यायला लागलो तर ते आमच्या सोबत बाहेर यायला लागले. त्याबद्दल मी त्यांना विचारल्यावर; त्यांनी हो, आम्ही मारणार आहे असं म्हणत मला मारहाण करायला सुरुवात केली. मला मारत असतानाच माझ्या पत्नीलाही त्यांनी मुलींच्या घोळक्यात ओढायचा प्रयत्न केला. तिथं काही मुलं देखील होती. "

पोलीस कारवाई

सिंहगडावरून खाली आल्यानंतर पाटील यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या सिंहगड पोलीस स्थानकात याबद्दल तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी समस्त हिंदू बांधव संघटनेच्या तरुण तरुणींवर गुन्हा दाखल केला.

याविषयी बोलताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, " पर्यटनासाठी काही लोक गेले होते. ते नरवीर तानाजी मालुरसेंच्या समाधीचं दर्शन घ्यायला ते गेले असताना त्यांना काही लोकांनी विचारलं की तुमची जी आठ वर्षांची मुलगी आहे तिने शॉर्ट्स घातल्या आहेत, हे पाश्चात्य कपडे आहेत. तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितल्यावर त्यांच्या मध्ये बाचाबाची झाली. त्यावरून या गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सुरू आहे."

मारहाणीवरून गुन्हा नोंद झाला असला तरी संस्कृतीरक्षणावरून असे प्रकार करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचं तज्ज्ञ मांडतात.

कपड्यांवरून घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत बोलताना कुठल्याच कायद्यानुसार हा गुन्हा किंवा चूक ठरत नसल्याचं ॲड. रमा सरोदे यांनी स्पष्ट केलं.

बीबीसी मराठीशी बोलताना सरोदे म्हणाल्या, "कोणी काय कपडे घालावे याबद्दल काही कायदा नाही. त्यामुळे जे लोक यांना प्रश्न विचारतात ते चुकीचं आहे. त्याच्यावरून जर ते मारहाण करत असतील, भांडाभांडी करत असतील त्यांच्यावर गुन्हेगारी कलमं आहेत भारतीय न्याय संहितेची त्यानुसार कारवाई होऊ शकते. हे जे स्वयंघोषीत संस्कृतीरक्षक आहेत, त्यांना मुळात काही अधिकार नाही. ते नाही सांगू शकत कोणी जायचं, कसं जायचं. शॉर्ट्स घालणं हे ऑब्सिन ठरत नाही. त्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नाहीत. अनेक लोक स्वयंसेवक म्हणून गड़ावर काम करतात. त्यात तुम्ही काय कपडे घातले याचा काय संबंध? पोलीस जरी तिथे असले तरी त्यांनाही शॉर्ट्स का घातल्या असा विचारण्याचा अधिकार नाही. "

हा कायदा हातात घेण्याचा आणि मॉरल पोलिसिंगचा प्रकार असल्याचं सांगत अँड सरोदे म्हणाल्या, "त्या गटांना कोणी दिला आहे हा अधिकार? ते जे म्हणतात की दारू पिऊन येतात, किंवा सार्वजनिक जागा असेल तर दारू पिता येणार नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून मला सिंहगडावर असं काही करताना दिसलं तर मी तक्रार करू शकते ना? कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मी पुरावे गोळा करू शकते, तक्रार करू शकते. या दोन गोष्टींचा हा फरक आहे. इथं या गटाने कायदा हातात घेतला. तुम्ही काही किल्ल्याचं संवर्धन करायला गेला नाही आहात हे मॉरल पोलिसिंग आहे. "

वादाला वेगळं स्वरूप दिलं जात असल्याचा समस्त हिंदू बांधव संघटनेचा दावा

दरम्यान हा वाद शॉर्ट्स घालण्यावरून झालाच नव्हता असा दावा आता समस्त हिंदू बांधव या संघटनेचे प्रमुख रवींद्र पडवळ यांनी केला आहे. ही तरुण मुलं मुली मोहिमेसाठी सिंहगडावर गेली होती. समस्त हिंदू बांधव ही संघटनेचे कार्यकर्ते नेहमीच अशी मोहीम आयोजित करत असल्याचं पडवळ यांनी सांगितलं.

समस्त हिंदू बांधव ही संघटना रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात काम करते. गड किल्ले यांचं संवर्धन, त्यासाठी समितीची स्थापना करण्यासाठी आंदोलन यासह अशा अनेक मुद्द्यांवर या संघटनेकडून आंदोलनं करण्यात आली आहेत.

विशाळगडचं अतिक्रमण काढण्यासाठी संघटनेचे प्रमुख रवींद्र पडवळ यांनी विशाळगडापर्यंत पायी मोर्चा काढला होता. विशाळगडावर झालेल्या हिंसाचार प्रकरणात पडवळ हे आरोपी आहेत. छत्रपती शिवरायांच्या गडांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपण काम करत असल्याचं ते सांगतात.

8 ऑगस्ट रोजी समस्त हिंदू बांधव ऑफिशियल या इन्टाग्राम हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. की "गडाचे पावित्र्य राखा अन्यथा परिणाम भोगा. गडकिल्ल्यावर येडेचाळे कराल तर.. गड किल्ल्यांवर दारू पिणे, व्यसन करणे किंवा अश्लील चाळे करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कोमी दिसल्यास एस.एच.बी. आर्मी कडून जागीच चांगला प्रसाद (चोप) मिळेल व व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केला जाईल. गडकिल्ले हे मौजमजेचे ठिकाण नसून पवित्र तीर्थक्षेत्र आहेत."

याशिवाय गडकिल्ल्यांवर शूट केलेले रिल्स, स्टंट या बाबत आक्षेप घेणाऱ्या अनेक पोस्ट या अकाउंट वर दिसतात.

सिंहगड प्रकरणाच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडताना समस्त हिंदू बांधव संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पडवळ म्हणाले, " या विद्यार्थ्यांनी गुटखा खाणारे, दारू पिणारे लोक यांच्यावर आक्षेप घेतला होता. ही सर्व मुलं शिक्षित आहेत. 16 आणि 18 वर्षांच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. पण त्यांना गुंड ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. मुळात आठ वर्षांच्या मुलीने कपडे घालण्यावरून हा वाद झालाच नाही. व्यसन करणाऱ्या लोकांना संघटनेचे लोक अडवत होते त्यावर यातल्या एकाने आक्षेप घेतला. ते कोणत्या धर्माचे आहेत ते मला माहित नाही आणि मी सांगणारही नाही. मात्र त्यांनी हस्तक्षेप केल्याने वादाला सुरुवात झाली. हा वाद त्या मुलीच्या कपड्यांबाबत नव्हता"

पण हा आक्षेप घेण्याचा अधिकार तुम्हांला कोणी दिला? असा प्रश्न विचारल्यावर पडवळ यांनी पोलीस तक्रार केल्यास शिक्षा होते तसेच दंड केला जातो. म्हणून आम्ही समज देतो. यानंतर मात्र थेट पोलिसांना कळवू असं म्हटलं. त्याचबरोबर गड किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी माणसं आर्किओलॉजिकल सर्व्हे विभागाकडे उपलब्ध नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

गडांचं संरक्षण की 'संस्कृती'रक्षण?

अशा प्रकारे संघटनांनी गड किल्ल्यांवर नियम, कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाही. छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांचं पावित्र्य राखलं जावं अशी भूमिका या संघटनांकडून घेतली जाते.

यापूर्वी रायगडावर चप्पल घालण्यावरून झालेला वाद असो किंवा गडांवर रिल्स शूट करणे किंवा कपल्स ने जाणे अशा अनेक मुद्द्यांवरून या संघटनांकडून आक्षेप घेतले जातात.

मात्र कारवाई करण्यासाठी अधिकृत यंत्रणांचा वापर या संघटनांनकडून का केला जात नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे.

याविषयी आम्ही इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याशी बोललो. त्यांनी हा मॉरल पोलिसिंगचाच प्रकार असल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्राला अनेक लढाऊ महिलांचा वारसा असल्याचं नमूद करत सावंत म्हणाले, " असा वारसा असणार्‍या राज्यात महिलांशी, लहान मुलींशी कसं वागावं याची जाणीव जर शिवभक्त म्हणवणाऱ्या कोणाला समजत नसेल तर त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा नव्याने अभ्यास करावा. नव्याने त्याची माहिती घेतली पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे. दुर्ग जर चढायचा असेल आपल्याला तर पारंपारिक वेशभूषा आहे जी साडीची आहे ती नाही चालत. मग तुम्ही कासोटा असलेल्या साड्या नेसून जाणार आहात का? ही साडी कुठपर्यंत असते? तुमची दृष्टी दूषित झाली असेल आणि स्वत ला शिवप्रेमी म्हणणार असाल आणि अधिकार नसतानाही मॉरल पुलीसिंग करत असाल तर हे शिवछत्रपतींनाही अभिप्रेत नसणार आहे."

ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या या गड किल्ल्यांवर लोकांकडून इतिहासाचा अवमान केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांचे लोक करतात. मात्र त्यात कायदा हातात घेणं असो, की अशी नियमावली लादणं याचा अधिकार या संघटनांना कोणी दिला असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारतात. मुळात कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल, यासाठी आता काय पावलं टाकली जाणार हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.