You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सून पुण्यात दाखल, राज्यात या ठिकाणी आहे 'ऑरेंज अलर्ट'; राज्यात काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर दोन आठवड्यांनी महाराष्ट्रात आगेकूच केल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
पुढच्या दोन दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असंही हवामान विभागानं म्हटलंय. त्याचवेळी विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे.
मान्सून कुठे पोहोचला आहे आणि राज्यात कुठल्या जिल्ह्यांमध्ये कोणते इशारे दिले आहेत, जाणून घेऊयात.
सोमवारी 22 जून रोजी मान्सूनची उत्तरेकडची सीमा महाराष्ट्रात अलिबाग, पुणे आणि पुढे लातूरचा काही भाग आणि निझामाबादमधून जाते आहे
आता मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह रायगडचा अर्धा भाग व्यापला आहे.
पुढच्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये आणखी आगेकूच करू शकतो. म्हणजे दोन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
22 जूनच्या दुपारी सॅटेलाईट दृश्यांमध्ये राज्यात किनारी भागांत मोठ्या प्रमाणात ढग जमा होत असल्याचं दिसतंय.
मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांत सकाळच्या वेळी मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत.
कुठे वाढेल पाऊस?
हवामान विभागाच्या भारत फोरकास्टिंग मॉडेलनुसार पुढच्या चार पाच दिवसांत राज्यात, विशेषतः कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो.
कोकणात तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील.
तर मराठवाड्याच्या काही भागांत तुरळक ठिकाणी थंडरस्टॉर्म्स म्हणजे विजांसह गडगडाट, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
विदर्भात मात्र सध्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. पुढचे चार दिवस इथे तापमान वरच राहण्याची शक्यता आहे.
राज्यात कसं असेल तापमान?
राज्यात बहुतांश ठिकाणी आता कमाल तापमानात हळूहळू घट होते आहे. पूर्व विदर्भातले जिल्हे वगळता इतर भागांत तापमान 40 अंशांच्या खाली गेलं आहे.
पण किमान तापमान मात्र तुलनेनं जास्त आहे. घाटालगतचा भाग वगळता राज्यात इतर ठिकाणी रात्रीचं तापमान 26 अंश सेल्सियसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
जिल्हानिहाय कुठे आहे ऑरेंज अलर्ट?
22 जूनच्या रात्रीसाठी वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर यवतमाळ आणि गडचिरोलीत उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे.
राज्यात इतर बहुतांश भागांत हवामान विभागानं थंडरस्टॉर्म्सचा इशारा दिला असून सिंधुदुर्गात जोरदार पावसाचीही शक्यता आहे.
23 जून रोजीही वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदियामध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर यवतमाळ आणि गडचिरोलीत उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे.
23 जून रोजी अमरावती, अकोला, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पालघरमध्ये थंडरस्टॉर्मसाठी यलो अलर्ट आहे.
तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात जोरदार सरी बरण्याची शक्यता असल्यानं इथे यलो अलर्ट दिला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)