'टेट्राक्रोमसी' : इतरांना सहज न दिसणारे रंग पाहता येण्यांची महिलांमध्ये असलेली खास क्षमता

फोटो स्रोत, Roberto Machado Noa via Getty Images
- Author, डेझी स्टीफन्स
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
चित्रकार कॉन्सेटा अँटिको सांगतात की, जेव्हा त्यांना समजले की जे रंग त्यांना दिसतात ते रंग त्यांचे विद्यार्थी पाहूच शकत नाहीत, तेव्हा तो अनुभव त्यांच्यासाठी अगदी वेगळा होता.
अँटिको यांच्या मते, त्यांना रोजच्या जीवनात अगदी साध्या-साध्या गोष्टींमध्येही असंख्य रंग दिसतात.
उदाहरण द्यायचे झाले तर सामान्य लोकांना जशी सावलीमध्ये फक्त एकच रंग छटा दिसते तिथे त्यांना अनेक वेगवेगळे रंग नजरेस पडतात.
त्यांना नेहमीच वाटायचं की प्रत्येक व्यक्ती जगाकडे त्याच दृष्टीने पाहते ज्या दृष्टीने त्या स्वतः पाहतात. पण नंतर विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादातून त्यांना समजलं की प्रत्यक्षात तसं नाही.
"मी एकाला विचारले, 'तुम्ही मला ही गोष्ट आधी का नाही सांगितली?' तर त्यांनी उत्तर दिलं, तुम्ही तर शिक्षिका होत्या. आम्हाला वाटलं तुम्ही काहीतरी कलात्मक पद्धत वापरत आहात."
नंतर अँटिको यांच्या चाचणीतून (जेनेटिक टेस्ट) हे स्पष्ट झालं की, त्यांच्यामध्ये 'टेट्राक्रोमसी' (Tetrachromacy) ही जैविक क्षमता आहे.
वेगळ्या प्रकारच्या पेशी
बहुतांश लोकांच्या डोळ्यांमध्ये 'कोन' (Cone) नावाच्या विशेष पेशींचे 3 प्रकार असतात.
प्रत्येक प्रकारची कोन पेशी वेगवेगळ्या तरंगलांबीवर (वेव्हलेंथ) असलेल्या प्रकाशावर सक्रिय होते ज्या मुख्यत्वे लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांशी जोडलेल्या असतात.
यानंतर या कोन पेशी मेंदूपर्यंत संदेश पाठवतात. आपल्याला कोणता रंग दिसेल, हे मेंदूला वेगवेगळ्या कोन पेशींकडून मिळणाऱ्या संदेशांच्या एकत्रित स्वरूपावर अवलंबून असते.
मात्र काही व्यक्तींमध्ये चौथ्या प्रकारची कोन पेशीसुद्धा आढळू शकते.
थोडक्यात सांगायचे तर यामुळे त्यांच्या मेंदूला विविध प्रकारची माहिती मिळते. यामुळे मानवाला दिसणाऱ्या सर्व रंगांच्या पट्ट्यामधील (स्पेक्ट्रममधील) बारीक-सारीक रंगछटा ओळखण्याची क्षमता वाढू शकते.

फोटो स्रोत, Darren Hauck/Getty Image
जीन्सचे 2 वेगळे प्रकार
लाल आणि हिरव्या रंगाला प्रतिसाद देणाऱ्या कोन पेशींचे नियंत्रण करणारे जीन्स X क्रोमोझोमवर असतात.
एखाद्या व्यक्तीमध्ये टेट्राक्रोमसीची क्षमता असण्यासाठी तिच्या शरीरात या जीन्सचे 2 वेगवेगळे प्रकार असणे आणि ते सक्रिय असणे गरजेचे आहे.
स्त्रियांच्या शरीरात 2 X क्रोमोझोम्स असतात आणि पुरुषांमध्ये सहसा 1 च X क्रोमोझोम असतो. त्यामुळे सामान्यतः केवळ महिलांमध्येच ही क्षमता दिसून येऊ शकते.
पुरुषांमध्ये हाच जीन व्हेरियंट अनेकदा रंग ओळखण्याच्या क्षमतेत अडथळा किंवा दोष निर्माण करण्याचे कारण ठरतो. डोळ्याच्या रेटिनामध्ये चौथ्या प्रकारची कोन पेशी असण्याच्या स्थितीला 'रेटिनल टेट्राक्रोमसी' (Retinal Tetrachromacy) म्हटले जाते.
अनुवांशिक चाचणीद्वारे (जेनेटिक टेस्टद्वारे) अशा लोकांची ओळख पटवली जाऊ शकते ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचे जीन व्हेरियंट्स असतात ज्यामुळे 4 प्रकारच्या कोन पेशी तयार होतात.
ब्रिटनमधील न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, सुमारे 12 टक्के स्त्रियांमध्ये ही जनुकीय क्षमता आढळते असे मानले जाते. तथापी विविध भागांतील लोकसंख्येनुसार ही टक्केवारी बदलू शकते असे संशोधनातून समोर आले आहे.
पण फक्त एक अतिरिक्त कोन पेशी असल्यामुळेच एखाद्याची रंग ओळखण्याची क्षमता खूप चांगली होईल असे अजिबात नाही.

फोटो स्रोत, BSIP/UIG Via Getty Images
अमेरिकेतील UC अर्वाइन ब्रनसन सेंटरच्या डॉ. किम्बरली ए. जेमसन सांगतात की, एखाद्या व्यक्तीमध्ये जर खरोखरच रंगांची अधिक चांगली पारख करण्याची क्षमता तयार झाली तर त्याला 'फंक्शनल टेट्राक्रोमसी' म्हणतात. पण ही गोष्ट सिद्ध करणे खूपच कठीण काम आहे.
असे असले तरी या जनुकीय क्षमतेमुळे रंग ओळखण्याची क्षमता नक्कीच सुधारू शकते, हे मानण्यासाठी पुरेशी कारणे आहेत.
डॉ. जेमसन यांच्या एका संशोधनातून समोर आले की, 4 प्रकारच्या कोन पेशी असणाऱ्या महिला रंगांच्या एकाच पट्टीतील (स्पेक्ट्रममधील) बारीक-सारीक छटा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या करू शकत होत्या.
याचा अर्थ असा होतो की, सामान्य माणसांपेक्षा (ट्रायक्रोमॅट लोकांपेक्षा) त्या कितीतरी जास्त रंग स्पष्टपणे ओळखू शकतात. ज्यांच्या डोळ्यांमध्ये 3 प्रकारच्या कोन पेशी असतात त्यांना ट्रायक्रोमॅट म्हणतात.
याचे उदाहरण प्राण्यांमध्येही दिसून येते.
न्यू वर्ल्ड माकडांच्या काही प्रजातींमध्ये नर हे 'डायक्रोमॅट' असतात. म्हणजे त्यांच्या डोळ्यांत फक्त 2 प्रकारच्या कोन पेशी आढळतात. याउलट मादी माकडे 'ट्रायक्रोमॅट' असतात ज्यांच्यात 3 प्रकारच्या कोन पेशी असतात.
संशोधकांनी पाहिलं आहे की, या ट्रायक्रोमॅट मादी नरांपेक्षा खूप वेगाने लाल फळे शोधून खातात. यावरून त्यांना लाल रंग जास्त स्पष्टपणे दिसतो हे लक्षात येते.
ब्रिटनमधील ससेक्स युनिव्हर्सिटीच्या व्हिज्युअल न्यूरोसायंटिस्ट (मेंदू आणि मज्जासंस्था तज्ज्ञ) डॉ. जेनी बॉस्टन सांगतात की, हाच नियम जर टेट्राक्रोमॅटिक माणसांना लागू केला तर अतिरिक्त कोन पेशी असणाऱ्या स्त्रिया बाकीच्यांपेक्षा नक्कीच वेगळे रंग पाहू शकतात.
मात्र हा अनुभव नक्की कसा असतो याबद्दल अजूनही वैज्ञानिकांमध्ये वेगवेगळी मते आहेत.
शब्दांत सांगता न येणारे रंग
अॅडलेड युनिव्हर्सिटीतील अभ्यासक डॉ. मायकल न्यूऑल यांनी 'टेट्राक्रोमॅट लोकांना काय दिसते' या विषयावर संशोधन केले आहे.
ते सांगतात, "एक शक्यता अशी आहे की, जर एखाद्याकडे रंग ओळखणारी एक जास्तीची पेशी (रिसेप्टर) असेल तर त्या व्यक्तीला असे काही रंग दिसू शकतात ज्यांचे शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे.
अगदी तसेच जसे आपण कलर ब्लाइंडनेस असलेल्या माणसाला लाल किंवा हिरवा रंग नक्की कसा असतो हे स्पष्ट करून सांगू शकत नाही."

फोटो स्रोत, Javier Prieto Gallego/Cover/Getty Images
ते पुढे असेही म्हणतात, "दुसरा विचार असा असू शकतो की, ही माणसे आपल्या रोजच्या साध्या रंगांमधला अगदी बारीक-सारीक फरकसुद्धा खूप सहज आणि स्पष्टपणे ओळखू शकत असतील."
एखादी व्यक्ती नक्की कोणते रंग पाहते हे वैज्ञानिक मार्गाने शोधून काढणे तसे खूप कठीण आहे.
डॉ. जेनी बॉस्टन सांगतात, "एका सामान्य ट्रायक्रोमॅट म्हणजेच सामान्य दृष्टी असणाऱ्या माणसाचा रंग पाहण्याचा वैयक्तिक अनुभव काय आहे हे अचूकपणे मोजणे शक्य नाही."
डॉ. किम्बरली ए. जेमसन म्हणतात, "हा विषय समजायला थोडा कठीण आहे. कारण टेट्राक्रोमसीचे अनेक प्रकार असू शकतात. जास्तीची कोन पेशी किती क्षमतेने काम करते यावर त्या माणसाला रंग कसे दिसणार हे अवलंबून असते."
पण डॉ. बॉस्टन यांच्या मते, लोक रंगांमधला बारीक-सारिक फरक कसा ओळखतात आणि वेगवेगळ्या छटा कशा वेगळ्या करतात याच्या चाचण्या घेऊन संशोधक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
टेट्राक्रोमॅट व्यक्ती कशी ओळखायची?
इंटरनेटवर शोधले तर टेट्राक्रोमसी तपासण्यासाठी अनेक ऑनलाइन चाचण्या मिळतील. पण तज्ज्ञांच्या मते, फक्त यांच्या मदतीने कोणी टेट्राक्रोमॅट आहे की नाही हे निश्चित सांगता येत नाही.
आजकालच्या बहुतेक डिजिटल स्क्रीन फक्त 3 रंगांचे चॅनेल्स (लाल, हिरवा आणि निळा) वापरतात. त्यामुळे टेट्राक्रोमॅट असणाऱ्या लोकांना जर खरोखरच असे काही वेगळे रंग दिसत असतील जे सामान्य लोकांना दिसत नाहीत तर ते रंग स्क्रीनवर स्पष्टपणे दाखवणेच शक्य होत नाही.
डॉ. न्यूऑल सांगतात की, या कारणामुळेच याची चाचणी करणे कठीण जाते. एखाद्या माणसाला जर रोजच्या आयुष्यात दिसणारे खरे रंग आणि स्क्रीनवर दिसणारे रंग नेहमीच वेगळे वाटत असतील तर ती व्यक्ती टेट्राक्रोमॅट असण्याची शक्यता असते.
पण हे आपण कोणते डिव्हाइस किंवा स्क्रीन वापरत आहोत यावरही अवलंबून असते.

फोटो स्रोत, OsakaWayne Studios via Getty Images
डॉ. जेम्सन यांच्या मते, दुसरा एक संकेत असा असू शकतो की, त्या व्यक्तीला नेहमी असे वाटत राहते की ती इतरांपेक्षा वेगळे रंग पाहू शकते.
त्या पुढे म्हणतात, "अशा व्यक्तींना अगदी लहान वयापासूनच हे मनापासून जाणवत असते की त्यांची रंग ओळखण्याची पारख बाकीच्या लोकांपेक्षा जास्त तीव्र आणि संवेदनशील आहे."
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींना प्रखर एलईडी लाईटचा जास्त त्रास होऊ शकतो. तर हलक्या पिवळसर किंवा उबदार प्रकाशात जास्त हलके वाटू शकते.
डॉ. जेम्सन यांच्या मते, "टेट्राक्रोमॅट स्त्रियांना असा लाईट अजिबात सहन होत नाही ज्यात 'लाँग वेव्हलेंथ'चा ( प्रकाशाच्या लहरी) प्रकाश पुरेशा प्रमाणात नसतो."
त्या सांगतात, "त्या घरातल्यांना सरळ सांगतात की, 'मला हा लाईट मुळीच नको. या ट्युबलाईटचा त्रास होतोय याच्यामुळे मला अस्वस्थ वाटतं आणि तब्येत बिघडल्यासारखी वाटते."
त्याचप्रमाणे ज्यांच्या वडिलांना रंग ओळखायला थोडी अडचण येते त्यांच्या मुलींमध्ये टेट्राक्रोमॅट असण्याची शक्यता जास्त असते.
पण हे फक्त काही प्राथमिक संकेत आहेत. खरोखरच कोणी टेट्राक्रोमॅट आहे की नाही, हे लॅबमधील जनुकीय तपासणीतूनच पक्के सांगता येते.
रेटिनल ते फंक्शनल टेट्राक्रोमसीचा प्रवास
रेटिनल टेट्राक्रोमसीचे रूपांतर नक्की कधी आणि कोणत्या परिस्थितीत 'फंक्शनल टेट्राक्रोमसी'मध्ये होते, हे वैज्ञानिकांना अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाही.
डॉ. बॉस्टन म्हणतात, "यासाठी अतिरिक्त कोन पेशीचा एखादा विशेष प्रकार असणे गरजेचे आहे का? की ती व्यक्ती त्या संकेतांचा वापर करायला कशी शिकली आहे यावर हे अवलंबून आहे?"
दृष्टी यंत्रणेच्या (व्हिज्युअल सिस्टीमच्या) इतर घटकांच्या लवचिकतेशीही याचा संबंध असू शकतो असेही त्या मानतात.
या पुढे म्हणतात, "अशीही एक शक्यता आहे की, जर एखाद्या माणसाच्या रोजच्या कामात या रंगांच्या फरकाचा काही प्रत्यक्ष उपयोग होत असेल, तरच तो रंगांमधला हा बारीक फरक ओळखायला शिकू शकतो."
चित्रकार कॉन्सेटा अँटिको यांचे मानणे आहे की त्यांच्या बाबतीत ही हेच घडले.
त्या सांगतात, "मी माझी रंग ओळखण्याची ही ताकद स्वतः मेहनत घेऊन वाढवली आहे. हे आपल्या शरीराच्या स्नायूंसारखे आहे. जितका सराव करू तितकी क्षमता वाढते."
त्या पुढे म्हणतात, "मी लहान असल्यापासूनच पेंटिंग करते. रंगांचे वेगवेगळे शेड्स बनवण्यात मी तब्बल 1 लाख तास घालवले असतील. मी हे काम रोज आणि न चुकता करते."
'एक मोठा आणि धाडसी दावा'

फोटो स्रोत, A. Martin UW Photography via Getty Images
फंक्शनल टेट्राक्रोमसी खरंच असते की नाही, याबद्दल वैज्ञानिकांमध्ये आजही मतभेद आहेत.
डॉ. बॉस्टन सांगतात की, काही माणसांना इतरांपेक्षा जास्त रंग दिसतात असे म्हणणे हा 'एक खूप मोठा दावा' आहे.
पण त्या पुढे म्हणतात, "जोपर्यंत यावर कोणतीही 100% अचूक वैज्ञानिक चाचणी येत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रयोगांतून आणि अभ्यासांतून समोर येणारी माहिती एकत्र करूनच निष्कर्ष काढला जातो. आणि जर सर्व पुराव्यांवरून एकच गोष्ट सिद्ध होत असेल तर या दाव्यात तथ्य आहे असे आपण मानू शकतो."
इतर लोक काय शंका घेतात याने कॉन्सेटा अँटिको यांना काहीच फरक पडत नाही. या जनुकीय बदलामुळे (अनुवांशिक बदलामुळे) त्या स्वतःला खूप नशीबवान समजतात.
त्या सांगतात, 'इतर लोकांना जे दिसत नाही, ते मी पाहू शकते ही खूप अद्भुत गोष्ट आहे. या गोष्टीने माझे आयुष्य अत्यंत सुंदर बनवले आहे.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























