You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थायलंडमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार; बौद्ध भिक्खूच्या घरातून सोनं आणि रोकड जप्त, महिलेसोबतचा व्हीडिओही समोर
- Author, केली एनजी
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
थायलंड पोलिसांनी एका बौद्ध भिक्खूला अटक केली आहे. त्याने आपल्या विहारातून सुमारे 10 कोटी थाई बाथ (सुमारे 3 मिलियन डॉलर) रक्कम हडप केल्याचा संशय आहे.
या प्रकरणात त्याच्यासोबत एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. या भिक्खूला त्या महिलेसोबतचे खासगी संबंधांचे व्हीडिओ चित्रित झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.
फ्रा वाचिरायान वी हा प्राचीन राजधानी अयुथ्यामधील 14व्या शतकातील प्रसिद्ध वाट फुथाईसावान विहारचा माजी प्रमुख भिक्खू होता.
त्याने दोन वर्षांत 20 हून अधिक वेळा विहाराला मिळालेल्या देणग्यांपैकी पैसे कथितपणे स्वतःकडे वळवल्याचा आरोप आहे.
थायलंडमध्ये बौद्ध भिक्कूंना ब्रह्मचर्य पाळण्याची आणि सांसारिक वस्तूंचा त्याग करण्याची शपथ घ्यावी लागते.
अटकेनंतर या भिक्कूला भिक्कू पदावरून हटवण्यात आलं आहे. या प्रकरणावर त्याने अद्याप सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या भिक्कूने तयार केलेले ताईत पंतप्रधानांकडेही
या अटकेच्या घटनेच्या अवघ्या वर्षभर आधीच, वरिष्ठ बौद्ध भिक्खूंशी संबंधित लैंगिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणामुळे थायलंडमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
हा 66 वर्षांचा भिक्खू अत्यंत लोकप्रिय आणि लोकांना हवीहवीशी वाटणारी नाण्याच्या आकाराची ताईतं तयार करण्यासाठी प्रसिद्ध होता.
थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नवीराकुल यांच्याकडेही त्याने तयार केलेले काही ताईत असल्याचे सांगितलं जातं.
थायलंडमधील बौद्ध धर्मसंस्थेवर भिक्खूंनी ब्रह्मचर्याची शपथ मोडणे, अमली पदार्थांची तस्करी करणे आणि आर्थिक गैरव्यवहार करणे, असे आरोप यापूर्वीही होत आले आहेत.
गेल्या वर्षी जुलैमध्ये पोलिसांनी 'गैरवर्तन करणाऱ्या भिक्कूं'ची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन (हॉटलाइन) सुरू केली होती. त्यावेळी किमान 9 भिक्खू एका महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले होते.
त्या महिलेने त्यांचे फोटो आणि व्हीडिओ दाखवून त्यांच्याकडून सुमारे 12 मिलियन डॉलरची खंडणी मागितल्याचे समोर आले होते.
घरी सापडले कोट्यवधी रुपये आणि सोन्याच्या विटा
शुक्रवारी (11 सप्टेंबर) पोलिसांनी सांगितले की, फ्रा वाचिरायान याने मंदिराच्या नावाने दिलेल्या देणगीच्या पावत्यांशी संबंधित पैशांचे दोन प्रकार आढळून आले आहेत.
त्यापैकी एक रक्कम मंदिराच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी होती, तर दुसरी रक्कम ताईत आणि इतर धार्मिक वस्तू खरेदी करण्यासाठी होती.
मुख्य तपास अधिकारी पट्टानासाक बुप्पासुवान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, या दोन्ही प्रकारचे पैसे मंदिराच्या खात्यात जमा झालेच नाहीत. त्यातील एकही बाथ (थायलंडचे चलन) मंदिराच्या खात्यात जमा झालेला नाही.
गुरुवारी (10 सप्टेंबर) पोलिसांनी फ्रा वाचिरायानच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तिथे 10 कोटी बाथपेक्षा जास्त किमतीची रोकड आणि सोन्याच्या विटा सापडल्या. रात्री उशिरापर्यंत या पैशांची मोजणी सुरू होती, अशी माहिती थायलंडमधील द नेशन या वृत्तसंस्थेने दिली.
घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना त्या भिक्खूचा एका महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवत असल्याची क्लिप सापडली. हा प्रकार त्याच्या जेवणाच्या टेबलवर घडल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका महिलेलाही अटक
अधिकाऱ्यांनी तिची ओळख 47 वर्षीय पुन्यावी रुनग्रुएंग अशी केली आहे. तिला सरकारी अधिकाऱ्याला बेकायदा कामात मदत केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तिने या प्रकरणावर अद्याप सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
थायलंडमध्ये अनेक बौद्ध भिक्खूंना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. त्यामुळे त्यांना सरकारी अधिकारी मानले जाते.
पोलिसांनी पुन्यावीच्या घरातून 35 सोन्याचे ताईत, सुमारे 1.5 किलो सोन्याच्या विटा आणि दागिने जप्त केले. या सर्वांची किंमत सुमारे 60.4 लाख थाई बाथ असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांना संशय आहे की, पुन्यावीने फ्रा वाचिरायानने गैरव्यवहार करून मिळवलेले पैसे सांभाळण्यास मदत केली. 'द बँकॉक पोस्ट'नुसार, दरवर्षी कोट्यवधी बाथ रक्कम तिच्या बँक खात्यांमधून फिरत होती, असे तपासात समोर आले आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जुलै महिन्याच्या मध्यापासून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. एका अज्ञात व्यक्तीने फ्रा वाचिरायानच्या गैरवर्तनाची आणि मंदिराच्या पैशांचा गैरवापर केल्याची तक्रार केल्यानंतर हा तपास सुरू सुरू करण्यात आला होता.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकरणात आणखी 2-3 जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)