बोटं मोडणं ही सवय आहे की आजार? आरोग्यावर याचा किती परिणाम होतो, जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सँडी ओंग
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
अनेकदा लोक बसल्या बसल्या सहजच हाताची बोटं मोडू लागतात आणि त्यातून येणारा तो 'कट-कट' आवाज ऐकून त्यांना एक वेगळंच समाधान मिळतं.
मात्र, बोटं मोडण्याच्या या सवयीबाबत अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. विशेषतः यामुळे अर्थरायटिस म्हणजेच संधिवात होतो असा एक मोठा गैरसमज आहे.
पण खरोखरच बोटं मोडल्यामुळे आपल्या सांध्यांना काही कायमचं नुकसान होतं का?
याचाच शोध घेण्यासाठी डॉक्टर डोनाल्ड उंगर यांनी स्वतःवरच एक भन्नाट प्रयोग करून पाहिला.
डोनाल्ड उंगर लहान असताना त्यांच्या आई, मावशी आणि नंतर सासूबाईंनी त्यांना नेहमी एक गोष्ट बजावली होती की सतत बोटं मोडू नकोस नाहीतर संधिवात होईल…
पण हे चुकीचं आहे हे सिद्ध करायचा ध्यास त्यांनी घेतला. आणि सलग 50 वर्षे त्यांनी रोज कमीत कमी दोनदा फक्त डाव्या हाताचीच बोटं मोडली.
पूर्ण आयुष्यात त्यांनी सुमारे 36 हजार वेळा डाव्या हाताची बोटं मोडली. पण उजव्या हाताला मात्र स्पर्शही केला नाही.
शेवटी 1998 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी या अनोख्या प्रयोगाचा काय निकाल आला हे पाहण्यासाठी त्यांनी दोन्ही हातांचे एक्स-रे काढले.
त्यांच्या असं लक्षात आलं की, दोन्हीपैकी एकाही हाताला संधिवात झालेला नव्हता आणि दोन्ही हातांच्या स्थितीत कोणताही मोठा फरक नव्हता.
अर्थात हा प्रयोग एकाच व्यक्तीवर केला होता. विविध अभ्यासांतून असं दिसून येतं की, जवळपास 20 ते 50 टक्के लोकांना बोटं मोडण्याची सवय असते.
मग ही सवय खरोखरच चिंता करावी अशी आहे का? बोटं मोडल्यावर निघणाऱ्या त्या 'कट-कट' आवाजाने सांधे कायमचे खराब होतात का?
बोटं मोडताना 'कट' असा आवाज का येतो?
काही लोकांसाठी बोटं मोडणं ही नकळत लागलेली एक साधी सवय असते. तर काहींना सांधे मोडल्यावर होणारा तो बदल आणि मिळणारा आराम आवडतो.
पण आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'कायरोप्रॅक्टिक ॲडजस्टमेंट'चे व्हीडिओ पाहिले तर सांधे मोडल्याचा आवाज ऐकायला आवडणारे हजारो लोक आहेत हे लक्षात येतं.
आपण जेव्हा बोटं किंवा सांधे मोडतो तेव्हा शरीराच्या आत एक साधी आणि सोपी प्रक्रिया घडत असते. सांधा म्हणजे अशी जागा जिथे दोन हाडे एकत्र येतात.

फोटो स्रोत, Getty Images
बोटं, मान आणि पाठीच्या मणक्यात असलेल्या सांध्यांमध्ये 'सायनोव्हिअल फ्लूइड' नावाचा एक द्रवरूप पदार्थ असतो. हा अंड्याच्या पांढऱ्या भागासारखा बुळबुळीत असतो आणि सांध्यांमध्ये वंगणासारखे कार्य करतो. जेव्हा तुम्ही सांधे मोडण्यासाठी ते फिरवता, ताणता किंवा वाकवता तेव्हा सांध्यामधील अंतर काही काळासाठी वाढतं.
यामुळे सांध्यांमधील सायनोव्हिअल द्रवावरचा ताण कमी होतो आणि त्यात विरघळलेले वायू बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर पडतात. बोटं मोडल्यावर येणारा कट-कट आवाज म्हणजे दुसरं काही नसून तयार झालेले हे बुडबुडे फुटण्याचाच आवाज असतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा आवाज तब्बल 83 डेसिबलइतका मोठा असू शकतो. तासाला 64 किमी वेगाने जाणाऱ्या एखाद्या डिझेल ट्रकचा जेवढा आवाज येतो जवळजवळ तेवढाच हा मोठा आवाज असतो.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिसच्या संशोधकांनी जेव्हा अल्ट्रासाऊंडद्वारे सांधे मोडण्याची क्रिया पाहिली तेव्हा स्क्रीनवर तो आवाज होतो त्या क्षणी जणू फटाकेच फुटल्यासारखे दृश्य दिसल्याचे त्यांनी सांगितले.
नुकसान न पोहोचवणारी सवय
ब्रिटनमधील मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संधिवात तज्ज्ञ किमे हायरिच यांच्या मते, बोटं किंवा सांधे मोडताना आवाज येत असला तरी सांधे मोडणे ही 'फक्त एक सामान्य शारीरिक प्रक्रिया' आहे.
पण एखादी प्रक्रिया सामान्य असली म्हणजे त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही असा याचा अर्थ होतो का?
अमेरिकेच्या मिशिगन इथे सराव करणारे न्यूरोसर्जन डॉ. जे जगन्नाथन यांच्या मते, सांधे दुखणे किंवा सूज येणं ही धोक्याची लक्षणं असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
मान खूप ताकदीने मोडल्यामुळे स्नायूंमध्ये लचक भरणे किंवा इतर त्रास होण्याचे अनेक रुग्ण त्यांनी पाहिले आहेत म्हणूनच असा प्रकार न करण्याचा सल्ला दिला जातो.
डॉ. जगन्नाथन पुढे म्हणतात, "साधारणपणे जेव्हा तुम्हाला सहजच सांधे मोडायची सवय असते तेव्हा ते बहुतांश वेळा सुरक्षितच मानलं जातं."
अजूनही काही लोकांच्या मनात ही शंका असते की, बोटं जोरात मोडल्यास ती सांध्यातून निसटतील की काय! विशेषतः खूप ताकद लावून किंवा अचानक असा झटका देऊन बोट ओढले तर ते चुकीच्या पद्धतीने सांध्यातून वेगळे होऊ शकते.
आणि खरंच अशा घटना घडल्यासुद्धा आहेत. उदाहरण द्यायचं तर, 1999 मध्ये फिलाडेल्फियातील एका सर्जनने दोन रुग्णांची माहिती दिली होती. बोटं मोडताना येणारा तो समाधानकारक 'कट' आवाज ऐकण्याच्या नादात दोन रुग्णांच्या बोटांना लचक भरली होती.
पण फार ताकद न लावता हलक्या हाताने बोटे मोडल्यास अशा दुर्घटना घडण्याची शक्यता फारच कमी असते.

फोटो स्रोत, Getty Images
पण सारखे बोटं मोडणाऱ्या लोकांना सर्वात 'ऑस्टिओआर्थरायटिस'चीच म्हणजे संधिवाताची भीती असते. हा संधिवाताचा असा प्रकार आहे जो कार्टिलेज झिजल्यामुळे होतो.
कार्टिलेज म्हणजे दुसरं काही नसून दोन हाडांमध्ये सॉफ्ट उशीसारखं काम करणारा एक मऊ भाग असतो जो हाडांचं संरक्षण करतो.
यावर डॉ. हायरिच स्पष्टपणे सांगतात, "माझ्या क्लिनिकमध्ये किंवा अगदी घरीसुद्धा लोक मला सतत हाच प्रश्न विचारतात. आणि याचे स्पष्ट उत्तर म्हणजे बोटं मोडल्यामुळे असा कोणताही त्रास होत नाही."
अशा अनेक संशोधनांनी हा जुना समज पूर्णपणे चुकीचा सिद्ध केला आहे. 1975 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात 28 वृद्धांवर संशोधन करण्यात आले होते. यात असं दिसून आले की, नियमित बोटं मोडणाऱ्या लोकांमध्ये संधिवाताचे प्रमाण तितकेच होते जितके बोटं न मोडणाऱ्या लोकांमध्ये होते. म्हणजेच बोटं मोडल्याने संधिवाताचा धोका अजिबात वाढत नाही.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ऑस्टिओआर्थरायटिसच्या 215 रुग्णांना भूतकाळात बोटं मोडण्याची सवय होती का हे अभ्यासले गेले. यानंतर या रुग्णांची तुलना अशा लोकांशी केली गेली ज्यांना हा आजार नव्हता.
या अभ्यासाचा निकालही तोच आला. एखाद्या माणसाने आयुष्यात कितीही वेळा किंवा कितीही वर्षे बोटं मोडली असली तरी त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस होण्याचा धोका अजिबात वाढत नाही.
हाताची पकड
बोटं मोडण्याबाबत असाही एक निष्कर्ष काढला जातो की, यामुळे तुमच्या हातातील ताकद किंवा मूठ आवळण्याची क्षमता कमी होते. वास्तविक हाताची ही ताकद आरोग्याचे एक महत्त्वाचे गमक आहे. ज्याचा संबंध हृदयाचे आजार, स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य आणि काही कर्करोगांसारख्या समस्यांशी असतो.
1990 मध्ये 18 ते 60 वर्षांपासून नियमितपणे बोटं मोडणाऱ्या 74 लोकांवर एक अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात असं आढळलं की, बोटं न मोडणाऱ्या लोकांच्या तुलनेत या लोकांच्या हाताची ताकद कमी होती आणि त्यांच्या हातांवर सूज जास्त होती.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र 2017 मध्ये हे निष्कर्ष चुकीचे सिद्ध झाले जेव्हा एका वेगळ्या अभ्यासात बोटं मोडणे आणि हाताची ताकद कमी होणे यांच्यात कोणताही संबंध नसल्याचे आढळले.
याबाबत इतरही अनेक गैरसमज पसरलेले आहेत.पण हायरिच यांच्या मते या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. आधी सांगितलेल्या अल्ट्रासाऊंड संशोधनातूनही हेच स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनी जेव्हा बोटं मोडणाऱ्या लोकांची शारीरिक तपासणी केली तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची सूज किंवा त्रास दिसून आला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
काही लोकांना बोटं मोडल्यानंतर आराम मिळू शकतो. आणि थोड्या वेळासाठी सांध्यांची हालचाल सुधारते. यामुळे सांधे ताणले जाऊन ते अधिक चांगल्या प्रकारे फिरवता येतात.
एका सिद्धांतानुसार बोटं मोडल्याने सांध्यांच्या सभोवतालचे चेतातंतू म्हणजेच नसांची टोके उत्तेजित होतात. ज्यामुळे आसपासचे स्नायू रिलॅक्स होतात, वेदना कमी होतात आणि 'एंडॉर्फिन' म्हणजेच आनंददायी केमिकल तयार होते. मात्र ही गोष्ट अजून सिद्ध झालेली नाही.
बोटं मोडल्याने सहसा काही नुकसान होत नाही त्यामुळे ही सवय बंद करण्याचे काही मोठे कारण नाही.
पण तरीसुद्धा तुम्हाला ही सवय थांबवायची असेल तर डॉ. ए जगन्नाथन 'कॉग्निटिव्ह थेरपी'ची मदत घेण्याचा सल्ला देतात. यामुळे तुम्ही नक्की काय करत आहात याची तुम्हाला जाणीव होते आणि ही सवय टाळण्यासाठी नवीन मार्ग शोधणं सोपं जातं.
उदाहरणार्थ तुम्ही ज्या कारणांमुळे बोटं मोडता त्याची एक नोंद ठेवू शकता. तसेच स्वतःला या सवयीपासून दूर ठेवण्यासाठी हातात 'स्ट्रेस बॉल' किंवा खेळणी धरून हातांना व्यस्त ठेवू शकता.
एकंदरीत हायरिच यांच्या मते बोटं मोडणे सांध्यांसाठी हानीकारक नाही. त्या पुढे म्हणतात की, यामुळे फक्त तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. या सवयीमुळे तुमच्या मित्रांची चिडचिड झाली तर मात्र तुमचे वैयक्तिक संबंध खराब होऊ शकतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























