You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सूनवर सुपर एल निनोचा असा परिणाम होईल, इंडियन ओशन डायपोलमुळे दिलासा?
- Author, अक्षय देवरस
- Role, वरिष्ठ हवामान संशोधक, रेडिंग विद्यापीठ, यूके.
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
महाराष्ट्रात आता मान्सून कधी येणार याचे वेध सगळ्यांना लागले आहेत. उन्हाळ्यात भारताची मुख्य भूमी आणि आसपासचा परिसर तापतो, तेव्हा हिंद महासागराकडून म्हणजे नैऋत्येकडून भारताकडे वारे वाहू लागतात, त्यातून मोसमी पावसाची निर्मिती होते, हे तुम्ही वाचलं असेल.
पण त्यापलीकडेही अनेक गोष्टींचा मान्सूनवर परिणाम होत असतो. त्याविषयीच युकेतील रेडिंग विद्यापीठातले हवामानाचे संशोधक अक्षय देवरस यांच्या मुलाखतीवर आधारीत लेख.
मान्सूनचा पाऊस बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. सध्या ज्याची सतत चर्चा होते आहे, ती गोष्ट म्हणजे ENSO, अर्थात एल निनो सदर्न ऑसिलेशन. (ऑसिलेशन म्हणजे हेलकावे.)
पॅसिफिक अर्थात प्रशांत महासागरातली स्थिती एल निनो आणि ला निना या दोन विरोधी घटनांमध्ये हेलकावत असते. या महासागराच्या मध्य आणि पूर्व भागाचं तापमान त्यासाठी विचारात घेतलं जातं.
प्रशांत महासागराचा पूर्व भाग म्हणजे दक्षिण अमेरिकेकडच्या भागात, समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त होत राहतं.
दर काही वर्षांनंतर जेव्हा ते सरासरीपेक्षा खूप वाढतं, तेव्हा त्या स्थितीला एल निनो म्हणतात आणि जेव्हा ते सरासरीपेक्षा खूप कमी होतं त्याला ला निना स्थिती म्हणतात.
आता याचा परिणाम जगाच्या हवामानावर कसा होतो? तर, या समुद्राचं तापमान बदलतं, तेव्हा त्या भागातून वाहणारे वारे, ढग आणि पाऊस यांच्यातही बदल घडतात. पॅसिफिक महासागर जगातला सर्वात मोठा महासागर असल्यानं इथल्या स्थितीचा एकंदरीत जगाच्याच हवामानावरही परिणाम होतो.
भारतीय मान्सूनच्या बाबतीच पाहिलं, तर जेव्हा एल निनो तयार होतो, तेव्हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस कमी पडतो. ला निना स्थितीमध्ये याच्या अगदी उलट होतं.
यावर्षी एल निनो आधीच तयार होऊ लागला आहे, तो वेगानं तयार होतो आणि वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी वर्तवलेल्या अनुमानांनुसार यंदा मोठ्या स्वरुपाचा एल निनो (सुपर एल निनो) तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा मान्सूनवर विपरीत परिणाम होईल हे जवळपास निश्चित दिसत आहे.
हवामानाविषयीच्या माहितीचं विश्लेषण करून वेगवेगळी कंप्युटर मॉडेल्स एल निनोच्या मान्सूनवरील परिणामांचा अंदाज लावतात.
नेमका किती परिणाम होईल, याविषयी वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी थोडे वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत.
भारतीय हवामाना विभागासह काही मॉडेल्सनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भारतात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा दहा टक्के कमी (90%) पाऊस होऊ शकतो. तर काही तज्ज्ञ ही घट चौदा ते पंधरा टक्के असेल असं म्हणतायत.
पण परिणाम होईल आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल ही गोष्ट स्पष्ट आहे. तर काहींच्या मते इंडियन ओशन डायपोलमुळे एल निनोचा परिणाम कमी होईल.
इंडियन ओशन डायपोल (IOD) अर्थात हिंदी महासागरातील द्विध्रुव
हिंदी महासागराचे दोन प्रमुख भाग म्हणजे पश्चिम हिंदी महासागर आणि पूर्व हिंदी महासागर. या दोन्ही
टोकाच्या भागात (dipoles मध्ये) समुद्राचं तापमान वेगवेगळं म्हणजे दोन ध्रुवांसारखं असतं, तेव्हा इंडियन ओशन डायपोल तयार झाल्याचं म्हणतात.
पूर्व हिंदी महासागर म्हणजे इंडोनेशियाकडच्या भागातलं तापमान सरासरीपेक्षा कमी झालं आणि पश्चिम हिंदी महासागर म्हणजे आफ्रिकेजवळच्या सोमालियालगतच्या भागातलं तापमान सरासरीपेक्षा वाढलं, की त्याला IODची पॉझिटिव्ह फेझ म्हणजे सकारात्मक IOD म्हटलं जातं.
या उलट स्थिती असते, तेव्हा त्याला नकारात्मक IOD म्हणतात. जेव्हा दोन्हीकडंच तापमान सरासरीएवढं आणि साधारण समसमान असतं, त्याला IOD ची न्यूट्रल स्थिती म्हणतात.
साधारणपणे सकारात्मक IOD असतो, म्हणजे आफ्रिकेजवळ हिंदी महासागराचं तापमान वाढलेलं असतं तेव्हा, भारतात मान्सूनच्या पावसात सुधारणा होते.
अर्थात किती सुधारणा होते, हे इतर घटकांवरही अवलंबून असतं. पण काही वेळा या सकारात्मक IOD मुळे एल निनोचा परिणाम कमी झाल्याचंही दिसलं आहे.
1997 सालीही सुपर एल निनो बनला होता. त्यावेळी मान्सूनचं भाकित करणारी जी हवामान मॉडेल्स होती, ती आजच्यासारखी अद्ययावत नव्हती. त्यामुळे त्यांनी भाकित वर्तवलं की एल निनो असल्यानं भारतात या काळात एकंदरीत बराच कमी पाऊस पडेल.
पण तसं काही झालं नाही. भारतात तेव्हा एकंदरीत बराच म्हणजे सरासरीपेक्षा दोन टक्के जास्त पाऊस पडला आणि त्यावेळी IOD अतिशय सकारात्मक स्थितीत होता. मात्र मराठवाडा, विदर्भ आण तेलंगानात तेव्हा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला.
2019 मध्ये एल निनो नव्हता, पण IOD अतिशय सकारात्मक होता आणि त्यावेळी भारतात बराच म्हणजे सरासरीच्या दहा टक्के जास्त पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रात त्याच काळात मोठ्या प्रमाणात पूर आले होते.
अनेकदा हे दिसलं आहे की एल निनोसोबतच सकारात्मक IOD तयार होतो. पण मान्सूनवर कोणाचा प्रभाव पडेल, हे या दोघांपैकी कोणाची तीव्रता जास्त आहे, यावर ठरतं. उदा. 2015 मध्येही एल निनो स्ट्राँग असताना, सकारात्मक IOD तयार झाला होता, तरीही भारतात सरासरीपेक्षा 14 टक्के कमी पाऊस पडला होता.
सध्याची स्थिती अशी आहे की अतिशय तीव्र एल निनो येतो आहे. सकारात्मक IOD तयार होण्याची निश्चितच शक्यता आहे. पण IOD त्याची तीव्रता जास्त नसेल, तर तो एल निनोचा प्रभाव कमी करू शकणार नाही.
मॅडन जुलियन ऑसिलेशन (MJO)
मुळात मान्सूनचा पाऊस एकसारखा नसतो. म्हणजे रोज ठराविक पाऊस पडतो, किंवा रोज सगळीकडे पाऊस पडतो, असं होत नाही. मोसमांतर्गत मान्सूनमध्ये हे जे बदल घडतात त्याला इंट्रासिझनल बदल म्हटलं जातं.
या बदलांमागचा एक महत्त्वाचा घटक आहे मॅडन-जुलियन ऑसिलेशन (MJO).
रोलँड मॅडन आणि पॉल जुलियन या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांनी 1971 साली वातावरणातल्या या ऑसिलेशनचा शोध लावला.
विषुववृत्तालगतच्या भागात वारा आणि हवेचा दाब यात फ्लक्चुएशन्स म्हणजे चढउतार होत असतात. साधारण 30 ते 60 दिवसांच्या काळात हे चढउतार विषुववृत्तीय भागात पूर्वेकडे सरकत राहतात आणि या चढउतारांचा पावसाच्या प्रमाणावर परिणाम होत असतो.
थोडक्यात सांगायचं, तर ही ढग आणि पावसाची एक रेल्वेगाडी आहे, जी पूर्वेकडे सरकते. साधारणपणे हिंदी महासागरात याची सुरुवात होते आणि पॅसिफिक महासागरापर्यंत तिचा प्रभाव जाणवतो. ती जिथे थांबेल, तिथे चांगला पाऊस पडेल पण ती ज्या दिशेनी नुकतीच निघाली, त्या भागात कमी पाऊस पडतो.
मॅडन जुलियन ऑसिलेशनमुळे वाऱ्याची दिशा आणि बाष्प यावर परिणाम होतो आणि मान्सून हा तर बाष्पाचा खेळ आहे.
मॅडन-जुलियन ऑसिलेशन हिंदी महासागरात किंवा इंडोनेशियाकडे असतं, तेव्हा त्या काळात मन्सूनच्या पावसात वाढ होते. याच्या विपरीत, मॅडन जुलियन ऑसिलेशन पॅसिफिक महासारगात असतं, तेव्हा मान्सून थोडा क्षीण होतो.
केरळमध्ये तर मान्सून ऑनसेट होताना MJOचा मोठा प्रभाव पडतो, कारण त्यामुळे मान्सूनचे वारे अधिक मजबूत होतात. मॅडन-जुलियन ऑसिलेशन हिंदी महासागरात गैरहजर असेल, तर मान्सून ऑनसेटलाही थोडासा उशीर होऊ शकतो. यंदाही तशीच स्थिती दिसली आहे.
एल निनोचा परिणाम कधीपर्यंत राहील?
साधारणपणे मार्च एप्रिलच्या काळात एल निनो तयार व्हायला लागतो आणि उत्तर गोलार्धातील हिवाळ्याच्या ऋतूमध्ये म्हणजे साधारण नोव्हेंबर ते जानेवारीत तो सर्वात तीव्र होतो. त्यानंतर एल निनोची स्थिती ओसरायला लागते, म्हणजे पॅसिफिक समुद्राचं तापमान पुन्हा सामान्य होऊ लागतं.
मान्सूनच्या पावसावर एल निनोचा लागलीच परिणाम दिसतो. एल निनो असेल तेव्हा जून ते सप्टेंबर या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीत पाऊस कमी पडतो.
तर विंटर मान्सून म्हणजे दक्षिण भारतात पडणाऱ्या ईशान्य मोसमी पावसात मात्र वाढ होऊ शकते.
एल निनो संपला तरी त्याचा परिणाम तापमानवर होत राहतो. कारण पॅसिफिक महासागराचा वरचा भाग इतक्या प्रचंड प्रमाणात तापलेला असतो, की तिथे जे ढग आणि वादळी प्रणाली तयार होतात, त्यातून प्रचंड प्रमाणात ही ऊर्जा वातावरणात सोडली जाते आणि ती काही रातोरात गायब होत नाही.
त्यामुळे एल निनोचा परिणाम आपल्याला त्या वर्षीचं जगभरातील हिवाळ्यातलं तापमान आणि पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानावरही पाहायला मिळतो. याआधीही असं घडलं आहे.
2023 साली एल निनो बऱ्यापैकी तीव्र होता आणि त्याचा परिणाम 2024 सालच्या तापमानावर झाला. ते वर्ष आजवरच्या नोंदवलेल्या इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं. 2015 च्या एल निनोनंतर 2016 मध्येही अशीच उष्णतेत वाढ झाली होती. आता यावेळीही तसं घडू शकतं.
जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळ्याची तीव्रता आधीच आणखी वाढते आहे, त्यात एल निनोची साथ मिळाली तर जगभरात विक्रमी तापमान पाहायला मिळतं.
मान्सूनचं भाकित अचूक कसं करता येईल?
मान्सूनविषयी कुठलं भाकित वर्तवण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये बरीच सुधारणा झाली आहे.
मोठ मोठे सुपरकंप्युटर्स खूप मोठ्या प्रमाणात माहितीवर प्रक्रिया करून अनेक सिम्युलेशन्स करू शकतात आणि अंदाज वर्तवू शकतात. त्यामुळेच आपल्या मान्सूनच्या सीझनल आउटलुकमध्ये म्हणजे संपूर्ण मोसमासाठीच्या अंदाजात बरीच सुधारणा झाली आहे.
स्थानिक पातळीवर नेमकं काय होईल, हे सांगता येणं अजूनही आपल्याला तेवढं शक्य होत नाही. कारण मान्सून ही खूप गुंतागुंतीची प्रणाली आहे. पण यावर्षी बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल हे स्पष्ट आहे.
(शब्दांकन – जान्हवी मुळे)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)