मीरा रोडमध्ये सोसायटीत बकऱ्या ठेवण्यावरुन वाद; नेमकं काय घडलं? - ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, Shahid Sheikh
ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील पूनम क्लस्टर या रहिवासी इमारतीत 25 आणि 26 मे रोजी बकरी ईदनिमित्त संकुलात आणलेल्या बकऱ्यांवरून वाद निर्माण झाला आणि काहीवेळ दोन गटांत तणावपूर्ण परिस्थितीही पाहायला मिळाली.
गृहसंकुलात बकऱ्यांना ठेवण्यावर आक्षेप घेत सोसायटीबाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. तर आंदोलनादरम्यान, डुक्कर आणल्याची दृश्यही समोर आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार गुन्हे दाखल केले आहेत.
काही दिवसांपूर्वी इमारतीतील काही रहिवाशांनी बकरी ईद निमित्त जवळपास 50 बकरे गृहसंकुलात आणले होते आणि एका शेडखाली त्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर याच सोसायटीतील काही रहिवाशांनी यावर आक्षेप घेतला होता.
नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया.
मीरा रोड परिसरामध्ये काय घडलं?
मीरा रोड परिसरामध्ये पूनम क्लस्टर वन या रहिवासी इमारतीतील काही रहिवाशांनी बकरी ईदनिमित्त सोसायटीमध्ये बकऱ्या आणल्या. या बकऱ्या सोसायटीच्या आवारात एका शेडखाली ठेवल्या जातात असं रहिवासी सांगतात.
यासाठी रहिवासी इमारतीच्या कमिटीची परवानगी असल्याचंही त्यांनी सांगितलं. या वर्षीही जवळपास 50 बकऱ्यांची व्यवस्था या गृहसंकुलात एका शेडखाली करण्यात आली होती. असं करण्यापूर्वी पोलीस आणि फायर ब्रिगेड यंत्रणेला कळवल्याचंही रहिवाशांचं म्हणणं आहे.
परंतु सोसायटीमध्येच ज्याठिकाणी बकऱ्यांची व्यवस्था केली होती तिथे जवळ राहणाऱ्या एका कुटुंबाने यावर आक्षेप घेतला. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ते या प्रकरणी लेखी निवेदन देत असल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Shahid Sheikh
या दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांनी सोमवारी 25 मे रोजी बैठक घेऊन प्रकरण सोडवलं होतं आणि दोन्ही गटात सहमती झाली होती असंही रहिवाशांनी सांगितलं. परंतु याच दरम्यान बैठकीनंतर सोसायटीबाहेर अचानक लोक जमले आणि आंदोलन सुरू झालं. हेच आंदोलन दुसऱ्या दिवशीही 26 मे रोजी करण्यात आलं असं रहिवासी सांगतात.
यावेळी आंदोलनकर्त्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. घोषणाबाजी, नारेबाजी झाली. तसंच आंदोलनस्थळावरून पोलिसांनी डुक्कर सुद्धा बाजूला नेल्याची दृश्य समोर आली आहेत.
दरम्यान, आंदोलनावेळी धारदार शस्त्राने एका इसमाने हल्ला केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला आहे.
या सोसायटीत राहणाऱ्या असीफा शेख सांगतात, "आम्हाला 2025 पासून बकरे ठेवण्याची परवानगी दिली होती की बकरे आणा आणि ठेवा. आम्ही स्लॉटरींग इथे कधीच केली नव्हती. तुम्ही आम्हाला एक व्हीडिओ दाखवा. मी मान्य करते की वास येतो त्यांची तक्रार आहे. पण आपण हे बोलून चर्चा करू शकतो."

तर याच ठिकाणी राहणाऱ्या उमेरा खान सांगतात, "आम्हाला सोसायटीच्या एजीएममधून परवानगी मिळाली होती. यानंतर आम्ही फायर ब्रिगेड आणि पोलिसांनाही कळवलं होतं. आम्हाला कल्पनाही नाही की हे प्रकरण एवढं मोठं होईल. आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेची परवानगी घेतली नव्हती. याचा फायदा उचलण्यात आला. पण जे काही झालं ते सोसायटीमध्ये किंवा इथल्या लोकांकडून झालेलं नाही. जे झालं ते बाहेरच्या लोकांनी केलं. आमच्यात आतमध्ये काही झालेलं नाही."
याच सोसायटीत राहणाऱ्या रिझवान यांनी तीन बकरे खरेदी करून आणले होते. ते सांगतात, "आमच्या सोसायटीमध्ये ईद, दिवाळी सगळे सण चांगल्या पद्धतीने साजरे होतात. आम्ही शेडसाठी परवानगी घेतली होती. त्याची स्वच्छताही करण्यात येत होती. त्यासाठी लोकांना वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. आम्ही काही अनधिकृत केलेलं नाही. आम्हाला परवानगी दिली सोसायटीने म्हणून आम्ही शेड केलं होतं. ते लोक डुक्कर घेऊन आले. आमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न झाला. सोसायटीच्या बाहेरच्या लोकांनी यात सहभाग घ्यायला नको होता."
ते पुढे सांगतात, "आमची मुलं रडत होती. तीन दिवस झालं ते घरात बंद आहेत. कालपासून आम्ही झोपलो नाहीय. आम्ही आपआपासात सगळ्या गोष्टी ठरवून घरी गेलो होतो. आमच्यात सेटलमेंट झाली होती. आम्ही तक्रार असलेल्या कुटुंबाला धन्यवाद करून बाहेर पडलो होतो. नंतर मध्यरात्री आवाज सुरू झाला. आम्ही इकडे स्लॉटर करत नाहीत, ही माहिती चुकीची आहे."
तक्रारदारांचं म्हणणं काय आहे?
याच रहिवासी इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबाने यासंदर्भात सोसायटी कमिटीकडे वारंवार तक्रार केली असं त्यांचं म्हणणं आहे. ही तक्रार सण साजरा करण्यासंदर्भात नसून केवळ बकरी ठेवण्याची जागा बदलण्यासंदर्भात होती असंही ते सांगतात.
हेमेंद्र भालचंद्र जोशी यांनी सांगितलं की, "आम्ही सगळे एकत्र राहतोय. आमचा विरोध त्यांच्या धर्माला नाही. फक्त घाण वास येत होता. डोकेदुखी होत होती. याची तक्रार होती. मी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. सोसायटीने याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून ही घटना घडली."

फोटो स्रोत, Shahid Sheikh
"त्यांची शेड माझ्या घराला लागून होती. दुर्गंध येत होता. बकऱ्यांचा आवाज. रात्रभर कल्लोळ व्हायचा. प्रकाशझोत होता. श्वसनाचे त्रास होत होते. आम्ही सोसायटीला सांगत होतो की त्यांना दुसरीकडे जागा द्या." असंही ते म्हणाले.
हे मीरा भाईंदर महानगरपालिकेचं अपयश आहे. मीरा भाईंदर पोलीस आणि पालिकेला हस्तक्षेप करायला पाहिजे असे ते पुढे म्हणाले.
'आंदोलनकर्त्यांना कोणी बोलवलं माहिती नाही'
रहिवासी इमारतीतल्या दोन्ही बाजूंच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करून तोडगा काढला होता पण तरीही सोसायटीबाहेर आंदोलन झालं. त्यांना कोणी बोलवलं ते कसे आले याबाबत कल्पना नसल्याचं ते सांगतात.
असीफा शेख सांगतात, "कोणी फायदा उचलला, का उचलला यात आम्हाला पडायचं नाहीये. कारण आम्हाला एकत्र रहायचं होतं आधीपासून. आम्ही इकडे सगळे सण साजरे करतो. कन्या पूजा होतात त्याला आम्ही आमच्या मुली पाठवतो. दरवर्षी सणांसाठी आम्ही स्वत:हून वर्गणी देतो."
तर रिझवान सांगतात की, "सोसायटीच्या बाहेरच्या लोकांनी येऊन वातावरण खराब केलं. ते चर्चेसाठीही तयार नव्हते. पण पोलिसांना आम्ही सॅल्यूट करतो. त्यांनी खूप सहकार्य केलं आणि आम्हाला सुरक्षितता पुरवली."

तर यासंदर्भात बोलताना हेमेंद्र जोशी सांगतात, "आमचं या नोटवर क्लोज झालं होतं की यावेळेस आता दोन दिवस उरलेत पण हे वर्ष शेवटचं करा असं बोलणं झालं होतं. एकाबाजूने आम्ही चर्चा करत होतो आणि बाहेर दुसऱ्याबाजूने काही उद्योग सुरू होते. आम्हाला माहितीच नाही. मी सकाळी त्यांना विचारलं की 'ये मेसेज कैसे बाहर गया. यात सोसायटीचा कोणताही रोल नाही."
"आम्हालाही वाद नकोय. आम्ही एकत्र राहत होतो. बाहेरच्या लोकांनी येऊन उद्योग केला यामुळे जनता भडकली. आम्हाला कल्पना नाही. सगळं सॉर्ट आऊट होत होतं. कोण काय आहे याचा पाठपुरावा करण्याचा विषय अधिकाऱ्यांचा आहे," असंही ते म्हणाले.
बजरंग दलाचे कार्यकर्ते हरसिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "सोसायटीतल्या लोकांनी आम्हाला कॉल केला होता."
सोसायटीत एका व्यक्तीने शस्त्राने हल्ला केल्याचा कॉल आल्यानंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने सांगितले. पोलिसांनी नंतर संबंधित हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली?
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सोमवारी (25 मे) आंदोलनादरम्यान, एका इसमाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर तीन गुन्हे हे आंदोलनकर्ते आणि संबंधितांवर दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
यात बजरंग दल आणि इतर संबंधितांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती काशिमीरा पोलिसांनी दिली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये आंदोलनस्थळावरून पोलीस एक डुक्कर हातात घेऊन बाहेर पडतायत पण आंदोलनकर्ते त्यांच्या पाठी धावत असल्याची दृश्य समोर आली आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी भावना दुखावल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून, मनाई आदेश असताना जमाव, एका तरुणाला मारहाण या प्रकरणीही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Shahid Sheikh
पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सांगितलं की, 'पूनम क्लस्टर एक येथे काही लोकांनी सोसायटीमध्ये बकरे आणले होते. याला एका गटाने विरोध केला होता. विरोध केल्यानंतर यात प्रशासनाची एक बैठक झाली. यात निर्णय घेण्यात आला की महानगरपालिका पर्यायी जागेची व्यवस्था करेल आणि त्यानंतर सोसायटीत दोन्ही गटाची बैठक घेतली. इथे सहमतीने निर्णय घेतला की पालिकेने ठरवलेल्या जागेवर बकरे ठेवावेत. तिकडे शिफ्ट केले आहेत. आता कोणताही इश्यू नाही."
प्रश्न मिटल्यावरही आंदोलन का झाले यासंदर्भात ते म्हणाले की, "काही लोकांचं ऑब्जेक्शन होतं. त्यानंतर काही वेळासाठी तणावाची स्थिती होती. आता लॉ-ऑर्डरची स्थिती नाही. कायदेशीर कारवाई सुरू आहे."
तर आंदोलनासंदर्भात परवानगी घेतली नव्हती त्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, "कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली त्याची दखल घेतली आहे. काही व्यक्तींनी तिथे डुक्कर आणलेला होता. त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे. महानगरपालिकेच्या रुल्समध्ये समजण्यात अभाव होता, आणि नियमातही संभ्रम होता. आता महानगरपालिका सोय करेल. जिथे इश्यू आहे तिकडे शिफ्ट केलं जात आहे."
राजकीय आरोप-प्रत्यारोप
मीरा भाईंदरचे काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसैन यांनी यावरून राजकारण केलं गेलं असा आरोप केला आहे.
ते म्हणाले की, "हे राजकीय झालं यात काही वाद नाही. बकऱ्यांच्या संख्येचा विषय होता. त्याचा वास येतो हा सुद्धा विषय होता. त्यांचा समाधानकारक निर्णय झाला होता. सोसायटीत कधी कुर्बानी होत नाही. असं तक्रारदारांनीही सांगितलं. हे दुर्देवी आहे जे झालं. देशात बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. नीटच्या परीक्षेचा विषय आहे. लोकांचं लक्ष या सगळ्यातून विचलित करायचं कोणते ना कोणते मुद्दे घेऊन हा विषय आहे. एखादा सण आला की कोणतेही मुद्दे घेऊन छोटी मोठी घटना चूक घडत असते. त्याचा मोठा विषय करून वेगळं वळण लावायाचा प्रयत्न केला जातो. त्याचा उपयोग करून घेतला जातो."

फोटो स्रोत, Reuters
तर स्थानिक भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितलं की, "विषय राजकीय फायद्याचा नाही. विषय लोकांना होणाऱ्या त्रासाचा आहे. सोसायटीची मागणी होती सोसायटीच्या आवारात बकऱ्या ठेवू नये. ठेवल्यानंतर तिथल्या लोकांनी पोलीस आणि महापालिकेकडे तक्रारी केल्या. ही कारवाई कोणी करायची यात दोन दिवस गेले त्यात वातावरण खराब झाले. काल मुख्यमंत्र्यांनीही निर्देश दिले की महानगरापालिकेने कारवाई करा. भविष्यात महापालिकेच्या माध्यमातून कडक कायदे करणार."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात ते म्हणाले की, "याला कोणतंही वेगळं वळण देऊ नये. तक्रार बाहेरच्या लोकांच्या नव्हती. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून या संघटनांनी पाठिंबा दिली. म्हणून त्यांनी दखल घेतली."
दरम्यान, या प्रकरणानंतर मीरा रोडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला असून पूनम क्लस्टर सोसायटी आवारात जवळपास दीडशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
























