You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅनालॉग पनीर, बनावट पनीर आणि खऱ्या पनीरमध्ये नेमका काय फरक आहे? ते कसं ओळखायचं?
- Author, भार्गव पारीख
- Role, बीबीसी गुजराती
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वेगवेगळ्या कारवाया झाल्या. या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मुलाखती, त्यांनी केलेली भाषणं आणि वेगवेगळी वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.
यासोबतच महाराष्ट्रातील शेकडो रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर 'आम्ही अॅनालॉग पनीर वापरत नाहीत' अशा प्रकारचे पोस्टर्सही लावलेले दिसून येतात. महाराष्ट्रात नुकतीच अॅनालॉग पनीरवर बंदी देखील घालण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या गुजरातेत देखील या पनीर प्रकरणावरून वाद सुरू आहे. तो नेमका काय आहे? आणि अस्सल पनीर नेमकं ओळखायचं कसं हेच आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
गेल्या काही दिवसांत अहमदाबाद, मेहसाणा आणि सुरतसह गुजरातमधील विविध शहरांमध्ये छापे टाकण्यात आले.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट पनीर जप्त करण्यात आलं. त्यानंतर गुजरात सरकारने सर्व रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांना ग्राहकांना तेथे वापरल्या जाणाऱ्या पनीरबद्दल माहिती देणे बंधनकारक केले आहे.
निकृष्ट दर्जाचे पनीर अस्सल पनीर म्हणून वापरणाऱ्या रेस्टॉरंट मालकांवर दंडही ठोठावण्यात आला आहे. अस्सल पनीर आणि बनावट पनीरमध्ये नेमका काय फरक आहे?
बनावट पनीरचा शरीरावर कसा परिणाम होतो आणि शरीराच्या कोणत्या अवयवांना त्याचा धोका असू शकतो, हे जाणून घेऊया.
पनीरचा वाद काय आहे?
2023-24 मध्ये तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत होते. त्यावेळी गुजरातचे तत्कालीन अन्न आणि औषध आयुक्त एच. जी. कोशिया यांनी याची चौकशी केली. काही रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ पुरवठादार जास्त नफा कमावण्यासाठी स्वस्त दर्जाचे पनीर वापरत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
काही जण अस्सल पनीरऐवजी बनावट पनीर विकत होते, तर काही जण बनावट पनीरपासून तयार केलेले पदार्थ विकत होते. त्यामुळे एक परिपत्रक जारी करून पनीर उत्पादकांना पनीरच्या पॅकेटवर स्पष्टपणे 'दूध पनीर' आणि 'अॅनालॉग पनीर' असे लिहिण्याचे आदेश देण्यात आले.
एच. जी. कोशिया यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं, "तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत असल्याचं लक्षात घेऊन आम्ही गुजरातमधील अनेक रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ पुरवठादार आणि खाद्य व्यवसायांवर छापे टाकले. तिथे वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचीही तपासणी केली."
"यामध्ये सुमारे 30 टक्के ठिकाणी बनावट आणि आरोग्यासाठी हानिकारक पनीर वापरलं जात असल्याचं आढळून आलं. ज्या ठिकाणी आम्हाला निकृष्ट दर्जाचं बनावट पनीर आढळून आलं, तिथेचौकशी केली असता काही लोक जास्त नफा कमावण्यासाठी कृत्रिम पनीर तयार करत असल्याची माहिती मिळाली. हे पनीर आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे."
एच. जी. कोशिया गुजरातचे अन्न आणि औषध आयुक्त असताना, ग्राहकांना पनीर आणि त्यासारख्या 'अॅनालॉग पनीर'बद्दल माहिती मिळावी यासाठी विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, "पनीर आणि अॅनालॉग पनीरमध्ये खूप मोठा फरक आहे. पनीर दुधापासून बनतं आणि त्यात बाहेरून कोणतीही चरबी मिसळली जात नाही. साधारण 5 लिटर दुधापासून 1 किलो पनीर तयार होतं. त्यात प्रथिनं आणि कॅल्शियम असतात."
"दुधातील चरबी काढून त्यात वनस्पती तेलापासून तयार केलेली चरबी मिसळून अॅनालॉग पनीर तयार केलं जातं. हे पनीर खाण्यायोग्य असतं, मात्र ते खरं पनीर नसतं."
एच. जी. कोशिया यांनी आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टचे उदाहरण देत पनीरच्या या दोन प्रकारांमधील फरक समजावून सांगितला. ते म्हणाले, "आईस्क्रीममधून दुधाची चरबी काढून त्याऐवजी वनस्पतीजन्य चरबी मिसळली, तर त्यावर 'फ्रोजन डेझर्ट' असं लिहिणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, बनावट पनीरवर 'डेअरी ॲनालॉग चीज' असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलं होतं.. याशिवाय, बनावट पनीर विकणाऱ्यांसाठी दंड आणि कारावासाची तरतूदही करण्यात आली होती."
लोक अॅनालॉग पनीर का खातात?
अहमदाबादमध्ये अन्न तपासणीचं काम करत असलेल्या जनआरोग्य प्रयोगशाळेचे माजी प्रभारी डॉ. अतुल सोनी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं, "अॅनालॉग पनीर आणि दूधापासून बनवलेल्या पनीरमध्ये खूप फरक आहे. कॅलरीबाबत जागरूक असलेले लोक अॅनालॉग पनीर वापरतात. ते दूधापासून बनवलेल्या पनीरपेक्षा स्वस्त असतं. अहमदाबादमध्ये 15 हजारांहून अधिक खाद्य व्यवसाय आहेत. याशिवाय ट्रकचालकांसाठी असलेली खानावळ आणि विविध प्रकारची खाण्यापिण्याची दुकानेही आहेत."
"या ठिकाणी छापे टाकले असता, पनीरच्या नमुन्यांपैकी सुमारे 35 टक्के नमुने हे दूध किंवा अस्सल पनीरपासून बनवलेले नसून कृत्रिम पनीर असल्याचं आढळून आलं. या पनीरमध्ये अजिबात दूध नसतं. काही नमुन्यांमध्ये युरिया, डिटर्जंट पावडर, कॉस्टिक सोडा किंवा स्वस्त वनस्पती तेल देखील वापरलेलं असतं."
डॉ. अतुल सोनी पुढे म्हणाले, "अशा प्रकारचे पनीर चावायला मऊ नसतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांनाही नुकसान होऊ शकतं. हे पनीर बहुतांश वेळा पॅकेटमध्ये विकलं जात नाही, तर ते उघड्यावरच विकलं जातं. पनीरमध्ये मसाले मिसळलेले असल्याने लोकांना त्याची चव ओळखता येत नाही."
डॉक्टर काय म्हणतात?
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तेजस पटेल यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं, "अॅनालॉग चीजमधून दुधाची चरबी काढून त्याऐवजी वनस्पतीजन्य चरबी मिसळली जाते. त्यातील काही घटकांमुळे रक्त घट्ट होऊ शकते. त्यामुळे दीर्घकाळात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अॅनालॉग पनीर किंवा चीजपासून दूर राहायला हवं."
डॉ. राजेश शाह म्हणतात, "अॅनालॉग पनीरपासून बनवलेल्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी लोक सोडियमचा वापर करतात. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. अनेक लोक कमी कॅलरी असलेलं अॅनालॉग पनीर खातात. मात्र, यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. बनावट पनीर खाल्ल्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना नुकसान झाल्याची प्रकरणेही आमच्याकडे आली आहेत."
सरकारने काय म्हटलं?
अहमदाबाद महापालिकेच्या जनआरोग्य प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विमल शाह यांनी सांगितलं, "अहमदाबादमध्ये बनावट पनीर आढळलेल्या ठिकाणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि पनीर तयार करणाऱ्या युनिट्सवर छापे टाकण्यात आले. त्यामध्ये तपासण्यात आलेल्या 85 नमुन्यांपैकी 25 नमुन्यांमध्ये दुधापासून बनवलेल्या पनीरऐवजी बनावट पनीर वापरलं जात असल्याचं आढळून आलं. काही उत्पादक ठरवून दिलेल्या चरबीच्या प्रमाणानुसार पनीर तयार करत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर 3 लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे."
"याशिवाय, निकृष्ट दर्जाचं अॅनालॉग पनीर तयार करणाऱ्या 12 युनिट्सविरोधात विविध प्रकरणं दाखल करण्यात आली आहे."
डॉ. विमल शाह यांच्या म्हणण्यानुसार, आता हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालवणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये दूधापासून बनवलेलं पनीर आहे की अॅनालॉग पनीर आहे, हे स्पष्टपणे सांगावं लागेल.
गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री प्रफुल पंसेरिया यांनी बीबीसीला सांगितलं, "बनावट पनीरच्या मुद्द्यावर सरकार कठोर कारवाई करत आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खानपान सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या पदार्थांमध्ये दूधापासून बनवलेले पनीर वापरले आहे की अॅनालॉग पनीर, हे स्पष्टपणे सांगणं बंधनकारक असेल. राज्यभरातील पनीरच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे आदेश अन्न आणि औषध विभागाला देण्यात आले आहेत."
बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे पनीर वापरणे रोखण्यासाठी एक कायदा देखील आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलम 52 अंतर्गत खाद्यपदार्थांबाबत चुकीची माहिती देऊन त्यांची विक्री करणाऱ्यांवर 3 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कलम 54 अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच, एखाद्याच्या आरोग्याला नुकसान झाल्यास कलम 59 अंतर्गत 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
पंसेरिया यांनी पुढे सांगितलं की, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 275 अंतर्गतही दोषींवर कारवाई केली जाईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.