महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार का? जाणून घ्या पुढील 7 दिवस हवामान कसे असणार

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

राज्यभरात विश्रांतीवर गेलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार का? पुन्हा पावसाची दमदार हजेरी लागणार का? पुढचे काही दिवस नक्की कसं असेल हवामान? जाणून घेऊयात.

उत्तर-मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागांवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. 12 ऑगस्टच्या दरम्यान उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रणालींमुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहण्यास मदत होणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.

महाराष्ट्रात पुढील 7 दिवस पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 10 ते 16 ऑगस्टदरम्यान कोकण आणि गोव्यातील सर्वच भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर-मध्य महाराष्ट्रात सुरुवातीला अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, तर त्यानंतर पावसाची व्याप्ती कमी होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्टला कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

12 ऑगस्टला उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 13 ते 16 ऑगस्टदरम्यान मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

मुंबईत पुढील 48 तास पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 48 तास आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

11 ऑगस्टला कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

कुठे कोणता अलर्ट?

हवामान विभागाने 10 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता जारी केलेल्या अंदाजात 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान कुठे कोणता अलर्ट याची माहिती दिली आहे.

10 ऑगस्ट

पुणे घाट, सातारा घाट येथे यलो अलर्ट (मुसळधार पावसाची शक्यता) देण्यात आला आहे. या दोन्ही घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे ग्रीन अलर्ट (कोणताही मुसळधार पावसाचा इशारा नाही) देण्यात आला आहे.

11 ऑगस्ट

रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट येथे यलो अलर्ट (मुसळधार पावसाची शक्यता) देण्यात आला आहे. या ठिकाणी तुरळक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

12 ऑगस्ट

पुणे घाट येथे यलो अलर्ट (मुसळधार पावसाची शक्यता) देण्यात आला आहे. पुणे घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

13 ऑगस्ट

या दिवशी आयएमडीने मुसळधार पावसाचा स्वतंत्र इशारा दिलेला नाही. मात्र नांदेडमध्ये हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस, तर हिंगोलीत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

14 ऑगस्ट

या दिवशी मुसळधार पावसाचा स्वतंत्र इशारा नाही. पुणे आणि सातारा घाटात मध्यम पाऊस, तर कोकणातील काही जिल्ह्यांत मध्यम ते हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पुढील 7 दिवस शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज

10 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

11 ऑगस्ट

दक्षिण कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणातील बहुतांश ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

12 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

13 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या दिवशी मुसळधार पावसाचा स्वतंत्र इशारा देण्यात आलेला नाही.

14 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

15 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

16 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

कुठे किती पाऊस?

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत काही भागांत पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाच्या 10 ऑगस्टच्या सकाळी 8.30 वाजताच्या नोंदीनुसार, महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 20.9 मिमी, तर विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये 17.2 मिमी पाऊस झाला. डहाणूमध्ये 12.1 मिमी, रत्नागिरीत 11.7 मिमी आणि नांदेडमध्ये 2.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, यंदाच्या मान्सूनमध्ये 1 जूनपासून महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत 5114.8 मिमी पाऊस झाला आहे. मुंबईच्या सांताक्रूझमध्ये 1999.8 मिमी, कुलाब्यात 1661.8 मिमी, रत्नागिरीत 1639.8 मिमी आणि डहाणूमध्ये 1620.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भात चंद्रपूरमध्ये 1 जूनपासून 715 मिमी, नागपुरात 627.9 मिमी, बुलढाण्यात 623.2 मिमी, अमरावतीत 580.4 मिमी आणि वर्ध्यात 543.6 मिमी पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात नाशिकमध्ये 790.2 मिमी, साताऱ्यात 820.7 मिमी आणि कोल्हापुरात 586.7 मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)