सरफराजचं कसोटीत पुनरागमन, पण अंतिम 11 मध्ये खेळणार का? 'या' फलंदाजानं वाढवल्या चिंता

फोटो स्रोत, Abhishek Chinnappa/Getty Images
'मी कदाचित यात फिट बसलो नसेन, पण माझ्याकडं जे काही आहे त्यासह मी पूर्ण ताकदीने लढेन.'
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळालं नाही, तेव्हा सरफराज खाननं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट केली होती.
पण रविवारचा (9 ऑगस्ट) दिवस त्याच्यासाठी आनंद घेऊन आला.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश करण्यात आला आहे.
उजव्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळं साई सुदर्शन मालिकेतून बाहेर पडला आहे.
बंगळूरुमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्यावर उपचार सुरू असून, बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे.
श्रीलंकेविरोधातला पहिला सामना 15 ऑगस्टपासून गॉलमध्ये खेळला जाईल, तर दुसरा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबो येथील एसएससी मैदानावर खेळवली जाईल.
नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता अखेरचा सामना
भारत-श्रीलंकेदरम्यानची ही मालिका वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. या चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. आतापर्यंत भारतानं नऊपैकी चार सामने जिंकले असून चार गमावले आहेत.
भारतीय संघात निवड झाल्यानंतर, सरफराज खाननं रविवारी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं टीम इंडियाच्या ट्रॅव्हलिंग जर्सीमधील दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सरफराज वडिलांसोबत उभा असल्याचे दिसत आहे.

फोटो स्रोत, Abhishek Chinnappa/Getty Images
सरफराजनं पोस्टला कॅप्शन दिलेलं नाही. त्यानं फक्त इमोजी वापरले आहेत. सरफराज जवळपास दोन वर्षांपासून भारतीय संघात परतण्याची वाट पाहत आहे. त्यानं शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी 'एक्स'वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं की, "सरफराज खानला कसोटी संघात परत पाहून आनंद झाला. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून 65 पेक्षा जास्त सरासरी असलेल्या आणि 11 कसोटी डावांमध्ये एक मोठं शतक आणि तीन अर्धशतकं झळकावणाऱ्या खेळाडूचा संघात नक्कीच विचार केला पाहिजे. इतर अनेक कमी प्रसिद्ध खेळाडुंना कदाचित जास्त संधी मिळाल्या असतील. सरफराज एक चांगला पर्याय आहे, विशेषतः उपखंडातील परिस्थितीमध्ये. तुम्ही सहमत आहात?"
सरफराजची कामगिरी
सरफराजनं 2024 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केलं. आतापर्यंत त्यानं सहा कसोटी सामने खेळले असून, त्यात एका शतक आणि तीन अर्धशतकांसह 37.1 च्या सरासरीनं 371 धावा केल्या आहेत.
सरफराज सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाकडून खेळतो. 2015 पासून तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यात त्यानं 58 सामन्यांमध्ये 22.6 च्या सरासरीनं आणि 137.4 च्या स्ट्राइक रेटनं ७४६ धावा केल्या आहेत.

फोटो स्रोत, sarfarazkhan97
सरफराज 2024-25 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय कसोटी संघातही होता. पण तेवहा तो एकही सामना खेळला नाही. नंतर गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातून त्याला वगळण्यात आलं.
2025 च्या रणजी ट्रॉफी हंगामात सरफराज मुंबईसाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्यानं सात सामन्यांमध्ये 53.62 च्या सरासरीनं 429 धावा केल्या. किमान 50 प्रथम-श्रेणी डाव खेळलेल्या खेळाडूंमध्ये त्याची सरासरी 64.73 अशी सर्वोत्तम आहे.
भारतीय संघाला दुखापतींचं ग्रहण
श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघ दुखापतींशी झुंजत आहे. जसप्रीत बुमरा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर आहेत.
कर्णधार शुभमन गिल श्रीलंका क्रिकेट इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजीला आला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून त्यानं हा निर्णय घेतल्याचं भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले म्हणाले.
गिलनं दुसऱ्या डावात फलंदाजी करत 54 चेंडूंमध्ये 44 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळं भारताला शेवटच्या दिवशी लक्ष्य गाठण्यात मदत झाली.
"खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. गिल पूर्णपणे ठीक आहे. तो सराव करत होता आणि संघ व्यवस्थापनानं त्याला पहिल्या दिवशी खेळू न देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात त्यानं केलेली फलंदाजी अप्रतिम होती. तो कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे," असं बहुतुले म्हणाले.
अंतिम 11 मध्ये स्थान मिळवणे कठीण
संघात समावेश झाला असला तरी सरफराजला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची खात्री आहेच असं नाही. संघात स्थान पक्कं करण्यासाठी त्याला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
देवदत्त पडिक्कलने श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावून दावा अधिक मजबूत केला आहे. त्याच्या कामगिरीमुळं संघ व्यवस्थापनाला तिसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
सरफराजला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटचा अनुभव असण्याचा फायदा आहे, तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी दमदार आहे.
मात्र, पडिक्कल एक मोठं शतक झळकावून मालिकेत येत आहे. डावखुरा असल्यामुळे भारताच्या अव्वल फळीत डावखुरा आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचं मिश्रण संघासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळं तिसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठीची स्पर्धा खूपच रंजक ठरू शकते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






















