You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फोल्डेबल फोनच्या बाजारात ॲपलची उशिरा एन्ट्री; काय आहेत नवीन फीचर्स?
- Author, कॅली हेस, टेक्नोलॉजी रिपोर्टर आणि लिली जमाली, उत्तर अमेरिका टेक्नोलॉजी रिपोर्टर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
ॲपलच्या नवीन बॉसने पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन लाँच केला आहे. हा फोल्डेबल आयफोन असून त्याची सुरुवातीची किंमत 1999 पौंड (सुमारे 2 लाख 58 हजार रुपये) आहे.
टिम कुक यांच्यानंतर या महिन्यात ॲपलच्या सीईओपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या जॉन टर्नस यांनी 'आयफोन ड्यूओ' लाँच केला.
सुमारे दोन दशकांनंतर आयफोनच्या डिझाइनमध्ये झालेला हा पहिला मोठा बदल आहे.
ॲपल फोल्डेबल फोनच्या बाजारात तुलनेने उशिरा उतरलेलं आहे. यापूर्वीच दक्षिण कोरियाच्या सॅमसंग आणि चीनच्या हुवावे या कंपन्यांनी फोल्डेबल फोन बाजारात आणले आहेत.
कॅलिफोर्नियातील ॲपलच्या मुख्यालयात उपस्थित लोकांना संबोधित करताना टर्नस म्हणाले, "इतर कंपन्यांचे फोल्डेबल फोन म्हणजे 2 फोन जबरदस्तीने एकमेकांना जोडल्यासारखे वाटतात."
ॲपलचा ड्यूओ फोल्डेबल फोन वापरण्याचा अनुभवच बदलून टाकेल, असा दावा टर्नस यांनी केला.
ॲपलची स्पर्धा चीनबरोबर
अमेरिकेत या फोनची सुरुवातीची किंमत 1999 डॉलर (1 लाख 90 हजार रुपये) आहे. पण, अधिक फीचर्स असलेल्या मॉडेलची किंमत 3200 डॉलरपर्यंत (3 लाख 5 हजार) जाऊ शकते.
हा फोल्डेबल आयफोन तयार करण्यासाठी ॲपलला तब्बल 8 वर्षे लागली. या फोनच्या विकासाच्या कामात टर्नस यांचा थेट सहभाग होता. त्याआधी त्यांनी ॲपलच्या हार्डवेअर विभागात अनेक वर्षे वरिष्ठ पदावर काम केले होते.
उघडल्यावर हा फोन छोट्या आयफोनसारखा दिसतो, तर दुमडल्यावर तो रुंद आयफोनसारखा दिसतो.
टर्नस म्हणाले, "हा फोन पूर्णपणे नवीन आहे, पण तरीही तो ओळखीचा वाटतो. त्याचा आकार आपल्या पासपोर्टसारखा आहे. त्यामुळे हातात धरताना तो सहज वाटतो. आणि एका हातानेही वापरणं सोपं आणि सोयीस्कर आहे."
पण या फोनसमोर आधीपासून बाजारात असलेल्या फोल्डेबल फोनची स्पर्धा आहे. आयडीसी ईएमईएचे उपकरण विभागातील डेटा आणि विश्लेषणाचे उपाध्यक्ष फ्रान्सिस्को जेरोनिमो म्हणाले, "खरी स्पर्धा चीनबरोबर आहे. तिथल्या फोल्डेबल फोनच्या बाजारपेठेत हुआवेचा सुमारे 80 टक्के हिस्सा आहे."
"ॲपलमध्ये कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही," असे वूड यांनी पुढे सांगितलं.
क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजीजच्या विश्लेषक कॅरोलिना मिलानेसी बुधवारी झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, कार्यक्रमात टर्नस यांच्यावर इतका भर देण्यात आला की, "जणू ते स्वतःच ॲपलचं एखादं प्रॉडक्ट आहेत," असं वाटत होतं.
डिझाइनमध्ये पहिल्यांदाच मोठा बदल
आयफोनच्या डिझाइनमध्ये केलेला हा बदल ॲपलवरील टीका काही प्रमाणात कमी करू शकतो. कारण 2007 मध्ये पहिला आयफोन लाँच झाल्यापासून ॲपलने कोणतंही मोठं आणि लोकांना खरोखर उत्सुकता वाटेल असं नवीन उत्पादन किंवा तंत्रज्ञान आणलेलं नाही, अशी टीका होत होती.
फॉरेस्टरचे विश्लेषक दिपांजन चॅटर्जी म्हणाले, "हा फोल्डेबल फोन महागडा असूनही ॲपलच्या उत्पादनांमध्ये केवळ शोभेची वस्तू बनून राहण्याचा धोका आहे. त्यातून ॲपलच्या ब्रँडची प्रतिष्ठा वाढू शकते, परंतु कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ होईलच असं नाही."
यापूर्वीच्या नवीन आयफोनची सुरुवातीची किंमत 900 डॉलर (सुमारे 85 हजार रुपये) होती. ॲपलने बुधवारी आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्स हे दोन नवीन मॉडेलही लाँच केले. अमेरिकेत त्यांची सुरुवातीची किंमत अनुक्रमे 1199 आणि 1299 डॉलर इतकी आहे.
चॅटर्जी म्हणाले की, हा फोल्डेबल आयफोन ॲपलच्या व्हिजन प्रो हेडसेटसारखा अपयशी ठरू शकतो. ॲपलने व्हिजन प्रोची किंमत 3699 डॉलर (सुमारे 3 लाख 52 हजार रुपये) ठेवली होती. परंतु, तो ग्राहकांमध्ये फारसा लोकप्रिय झाला नाही.
मात्र, हा फोन कंपनीच्या ॲपल वॉचसारखा यशस्वीही होऊ शकतो, असंही चॅटर्जी म्हणाले. ॲपल वॉचला आयफोन इतकी लोकप्रियता मिळालेली नसली, तरी दरवर्षी लाखो लोक ते खरेदी करतात.
लोकांना आयफोन कसा वापरायचा याची सवय झाली आहे. त्यामुळे नवीन डिझाइनचा हा फोन ग्राहकांना मोठ्या प्रमाणात खरेदी करायला कितपत आवडेल, ही ॲपलसमोरची आणखी एक अडचण ठरू शकते.
"फोल्डेबल फोन ही नक्कीच आकर्षक कल्पना आहे," असं मिलानेसी यांनी सांगितलं.
"अनेकांना अशा फोनबद्दल उत्सुकता, कुतूहल आहे. पण, नेहमीच्या फोनवरून फोल्डिंग फोनकडे वळताना त्याचं सॉफ्टवेअर समजून घेणं (लर्निंग कर्व्ह) आणि त्याच्या वापराची सवय होणं हे मोठं आव्हान आहे."
सिरी-एआयचे फिचर्स मिळणार
वूड यांनी सांगितलं की, सध्या सॅमसंग आणि हुवावेसारख्या कंपन्यांच्या फोल्डेबल स्मार्टफोनची विक्री एकूण स्मार्टफोन बाजाराच्या केवळ 2 टक्के इतकी आहे.
ॲपलचा फोल्डिंग आयफोन बाजारात आल्यामुळे या फोनबद्दलची उत्सुकता आणि मागणी वाढण्याची शक्यता आहे. तरीही, एफडीएम सीसीएम इनसाइट या डेटा आणि विश्लेषण संस्थेच्या अंदाजानुसार, येत्या 10 वर्षांत फोल्डेबल फोनची विक्री एकूण स्मार्टफोन बाजाराच्या केवळ 4 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
आयफोन हे ॲपलचं सर्वाधिक विकलं जाणारं उत्पादन आहे. कंपनीच्या दरवर्षीच्या एकूण विक्रीपैकी अर्ध्याहून अधिक विक्री आयफोनची होते.
अलीकडच्या काही तिमाहींमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, आयफोनची मागणी आतापर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आयफोनच्या सध्याच्या मॉडेलला कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी लॉन्च मिळाला आहे, असंही ॲपलने म्हटलं आहे.
कंपनीने सिरी या आपल्या व्हॉइस आणि चॅट असिस्टंटच्या नव्या आवृत्तीबाबतही अधिक माहिती दिली. आता कंपनी या नवीन आवृत्तीला 'सिरी एआय' असं नाव देत आहे.
आयफोन 18 पासून सिरी एआय हा बॉट तुमच्या फोनमधील मेसेज आणि ई-मेलसारखी माहिती शोधू शकेल. त्यातून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासोबतच, तुमच्या वतीने काही कामंही करू शकेल.
नवीन ॲपल वॉचवर सिरी एआयची काही फीचर्स मिळतील. त्यापैकी एक म्हणजे संभाषणाची नोंद करून त्याचं लिखाणात रूपांतर करणं. पण, यासाठी वापरकर्त्याला हे फीचर आधी सुरू करावं लागेल.
टर्नस यांनी आयफोनमधील नव्या एआय फीचर्सना 'इंटेलिजंट पर्सनल हब' असं म्हटलं. ते म्हणाले की, यासाठी ॲपल तुमच्या दैनंदिन आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक आणि खासगी माहितीचा वापर करणार आहे.
टर्नस यांनी सांगितलं की, ही सर्व माहिती गोपनीयच राहील. सिरी एआयची अनेक फीचर्स 'थेट आयफोनवर'च (डिव्हाइसवर) चालतील, त्यामुळे त्यासाठी थर्ड-पार्टी कंपन्यांची गरज भासणार नाही. एखाद्या कामासाठी थर्ड-पार्टी कंपनीची मदत घ्यावी लागली, तरी माहिती सुरक्षितपणे रिमोट सर्व्हर किंवा क्लाउडवर ठेवली जाईल, असा टर्नस यांनी दावा केला.
टर्नस म्हणाले, "इतर कंपन्या ही माहिती गोळा करून साठवण्याच्या दृष्टीने पाहतात. मात्र, इथे तुमची माहिती ॲपललाही पाहता येणार नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.