You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
100 वर्षांपूर्वी व्हेल माशांच्या संशोधनासाठी गेलेलं जहाज, ज्यामुळे 'एल-निनो'चं रहस्य उलगडलं
- Author, गिल सेनेट (हल) आणि पॉल जॉन्सन
- Role, ईस्ट यॉर्कशायर आणि लिंकनशायर
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
संयुक्त राष्ट्रांनी जून महिन्यातच इशारा दिला होता की, पॅसिफिक महासागरात काही आठवड्यांत एल-निनोचा एक नवीन टप्पा सुरू होऊ शकतो.
हवामान संस्थांनी दिलेल्या काही अंदाजानुसार, हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली एल-निनो ठरण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील हवामानात धोकादायक बदल पाहायला मिळू शकतात.
एल-निनोमुळे पृथ्वीच्या हवामान बदलावर किती परिणाम होईल, हे समजून घेण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
'हिडन ईस्ट यॉर्कशायर'च्या पॉडकास्टनुसार, गेल्या 100 वर्षांपासून एल-निनोचा परिणाम समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
युनिव्हर्सिटी ऑफ हलचे मानद रिसर्च फेलो डॉ. रॉब रॉबिन्सन म्हणतात, "गेल्या काही काळापासून एल-निनोबाबत अनेक बातम्या येत आहेत. पॅसिफिक महासागरातील पाणी गरम झाल्यामुळे पूर्वी काय घडलं होतं आणि आता काय घडतंय, यावरही चर्चा सुरू आहे."
ते म्हणतात, "थंड पाण्याचा प्रवाह, समुद्रातील अतिरिक्त प्रवाह आणि हम्बोल्ट प्रवाह यावर अनेक वर्षांपासून चर्चा होत आहे."
"पॅसिफिक महासागरातील सागरी प्रवाह समजून घेण्यासाठी 'विल्यम स्कोर्सबी' या संशोधन जहाजाने खूपच महत्त्वाचं काम केलं. त्या जहाजाने केलेल्या अभ्यासामुळेच आज आपल्याकडे एल-निनोबद्दल इतकी माहिती उपलब्ध आहे."
100 वर्षांपूर्वी प्रवासासाठी निघालेलं 'ते' जहाज
साधारण 100 वर्षांपूर्वी जून महिन्यात 'रॉयल रिसर्च शिप विलियम स्कोर्सबी'ने हंबर डॉक येथून प्रवास सुरू केला होता. हे जहाज दक्षिणेकडील महासागरांच्या अभ्यासासाठी निघालं होतं.
या जहाजाचं उद्दिष्ठ हे फॉकलंड बेटांजवळील व्हेल माशांवर संशोधन करणं होतं.
रॉबिन्सन म्हणतात, "स्कोर्सबी हे खरोखरच एक विशेष जहाज होतं. अंटार्क्टिकाजवळच्या समुद्रात प्रवास करून समुद्राच्या तळाचा अभ्यास करता यावा, अशा पद्धतीने त्याची बांधणी करण्यात आली होती."
हे जहाज कूक, वेल्टन आणि जेमेल शिपयार्डमध्ये तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर हल नदीत ते पाण्यात उतरवण्यात आलं. या जहाजाचं नाव संशोधक व्हिटबी व्हेलर यांच्या नावावर ठेवण्यात आलं होतं.
रॉबर्ट फाल्कन स्कॉट आणि अर्नेस्ट शॅकल्टन 'डिस्कव्हरी' जहाजातून अंटार्क्टिकाच्या मोहिमेवर गेले होते. त्याच काळात 'स्कोर्सबी'नेही सागरी प्रवास केला होता.
स्कोर्सबीने या प्रवासात महासागरातील हालचाली आणि समुद्रप्रवाहांचा अभ्यास केला होता.
रॉबिन्सन म्हणतात, "या मोहिमेत समुद्रातील अनेक नमुने गोळा केले गेले आणि विविध प्रयोग करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञही या कामात सहभागी होते. या संशोधनामुळे सागरी जीवशास्त्र आणि समुद्रशास्त्राच्या अभ्यासाचा पाया रचला गेला."
1930 च्या दशकात या जहाजाने ब्रिटनपासून दूर राहून अनेक सागरीप्रवास केले. या काळात जहाजावरील कर्मचाऱ्यांनी हम्बोल्ट आणि समुद्रप्रवाहांचा अभ्यास केला.
ते पुढे म्हणाले, "या माहितीमुळे सागरी प्रवाह तसेच पॅसिफिक महासागर आणि जगावर होणारा त्यांचा परिणाम समजून घेण्यास मोठी मदत झाली."
जहाजावरील संशोधनामुळे काय समजलं?
परंतु, 'स्कोर्सबी'चा हा प्रवास इथेच संपला नव्हता.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे जहाज 'ऑपरेशन टॅबारिन'मध्ये सहभागी झालं होतं. रॉबिन्सन यांच्या मते, दक्षिण अटलांटिकमध्ये 'क्लॉक अँड डॅगर' या सांकेतिक नावाची एक गुप्त मोहीमही सुरू होती.
या मोहिमेत जहाज सहभागी झाल्याचं दाखवणारे त्या काळातील टपाल तिकीटही (पोस्टेज स्टॅम्प) आहे.
'स्कोर्सबी' जहाज 1950 पर्यंत सेवेत होतं. त्यानंतर ते मोडून टाकण्यात आलं. परंतु, रॉबिन्सन यांच्या मते, या जहाजाने आपल्या कामाची एक वेगळीच छाप सोडली.
ते म्हणतात, "सागरी जीवशास्त्र आणि समुद्रशास्त्राबद्दल आज आपल्याला जे काही माहिती आहे, त्यात 'स्कोर्सबी'ने केलेल्या संशोधनाचा वाटा खूप मोठा आहे."
"या संशोधनातून मिळालेल्या माहितीमुळे सागरी प्रवाह कसे वाहतात, ते कुठे जातात आणि त्यांचा हवामानावर कसा परिणाम होतो, हे देखील आपल्याला समजलं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)