You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विदर्भात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
राज्यात पावसाचा जोर वाढत असून अनेक भागांत विशेषत: विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील अनेक भागांसाठी 29 आणि 30 जुलै रोजी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
प्रशासनाने रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
नेमका कुठे कोणता अलर्ट जाणून घेऊयात.
विदर्भात मुसळधार
काल 28 जुलैरोजी झालेल्या पावसाने नागपूरला अक्षरश: झोडपून काढले. अवघ्या तासाभरात झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. रस्ते जलमय झाले होऊन वाहनधारकांची मोठी कोंडी झाली तसेच जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान, आज 29 जुलैरोजी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांचा परिसर तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
29 ते 31 जुलैदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून राज्यातील हवामानाबाबतची माहिती शेअर केली आहे.
बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे.
या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार, 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे.
30 जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो. 31 जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.
1 ऑगस्टला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.