महाराष्ट्रातील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; आई-वडिलांसह मुलीचा मृत्यू, दोन मुले अद्याप बेपत्ता

फोटो स्रोत, rupesh sonawane/ajit gadhvi
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे.
सुरतमधील बीबीसीचे प्रतिनिधी अजित गढवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उवा गावाजवळ एका कुटुंबाची कार अडवून चार जणांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना कालव्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.
यामध्ये आई-वडील आणि मुलगी अशा तिघांचा मृत्यू झालाय. एका मुलाने पोहत बाहेर येत आपला जीव वाचवला. तर अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. हे कुटुंब मूळचं महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्यात फेकण्यात आलेल्या कुटुंबातील एका मुलाने पोहत बाहेर येत आपला जीव वाचवला. त्यानंतर त्याने स्थानिकांना या घटनेची माहिती दिली.
बचावलेल्या मुलाने पोलिसांना सांगितलं की, "माझ्यासोबत माझा 16 वर्षांचा मोठा भाऊ आणि नऊ वर्षांची लहान बहीणही होती. सेजवाड गावाजवळील उकाईच्या कालव्यात आम्हाला फेकून देण्यात आलं. मात्र, मी पोहत बाहेर आलो."
या घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर, एका मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. इतर दोन मुलांचा शोध अद्याप सुरू आहे.
बारडोली आणि नवसारी परिसरातील कालव्यांमध्ये मृतदेह तसेच बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे, अशी माहिती बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. एन. जडेजा यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना दिली.
ते म्हणाले, "संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सध्या या घटनेचा तपास करणे हे पोलिसांसमोरील मुख्य आव्हान आहे."
दरम्यान, दोन मुले अद्याप बेपत्ता असल्याने या संपूर्ण प्रकरणाचे गूढ वाढले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरत ग्रामीण पोलिसांनी हत्येची शक्यताही व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी आठ स्वतंत्र पथकं तयार करून सखोल तपास सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या एफआयआरनुसार, नितीन पाटील, त्यांची पत्नी कविता आणि नऊ वर्षांची मुलगी स्विटी पाटील यांचे मृतदेह आढळले आहेत. तर, प्रथमेश आणि हरीश ही दोन मुलं बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळ महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आहे. एरंडोलमधील एका कारखान्यात मजुरी करणारे हे कुटुंब 21 नोव्हेंबर रोजी कारने सुरतकडे निघाले होते.

फोटो स्रोत, rupesh sonawane/ajit gadhvi
एफआयआरमध्ये नमूद माहितीनुसार, हे कुटुंब 22 नोव्हेंबरच्या रात्री सुरतकडे जात होते. दरम्यान, उवा गावाजवळ चार जणांनी त्यांची कार अडवली. खांडियो, आभा, बंटी आणि अन्य एका व्यक्तीचा या चौघांमध्ये समावेश होता.
आरोपी कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने दुसऱ्या कारमध्ये बसवत त्यांना सोबत घेऊन गेले.
पोलिसांच्या माहितीनुसार, त्यानंतर आरोपींनी कुटुंबातील सर्व सदस्यांना कालव्यात फेकून दिले. यावेळी 13 वर्षांच्या मुलाने पाण्याची पाइपलाइन पकडून बाहेर येत आपला जीव वाचवला. त्यानंतर त्याने जवळच्या एका हॉटेलमध्ये पोहोचत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आणि पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी काय माहिती दिली?
End of podcast promotion
सुरत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "सकाळी 112 क्रमांकावर एक फोन आला होता. त्यानंतर 112 क्रमांकाचं वाहन घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी या 13 वर्षांच्या एका मुलाला पोलीस ठाण्यात आणलं. तो मुलगा मराठीत बोलत होता. त्याच्याशी संवाद साधल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह कामानिमित्त महाराष्ट्रातून सुरतला येत असल्याचं समजलं."
ते पुढे म्हणाले, "मुलाचे आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य एका गाडीत होते. मात्र, रात्री आणखी एक गाडी त्यांच्या मागे आली. त्या गाडीतील अज्ञात व्यक्तींनी मुलाचे आई-वडील आणि दोन वर्षांच्या एका मुलाला एका गाडीत बसवलं, तर या मुलांसाठी वेगळी गाडी होती. त्या गाडीत एकजण चालकाच्या बाजूला बसला होता, तर दुसरा गाडी चालवत होता."
राजेश गढिया म्हणाले, "मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यासोबत त्याचा 16 वर्षांचा मोठा भाऊ आणि नऊ वर्षांची लहान बहीणही होती. सेजवाड गावाजवळील उकाईच्या कालव्यात त्यांना फेकून देण्यात आलं. या मुलालाही कालव्यात फेकण्यात आले होतं. मात्र, तो पोहत बाहेर येण्यात यशस्वी झाला."

फोटो स्रोत, rupesh sonawane/ajit gadhvi
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बचावलेल्या मुलाच्या मोठ्या बहिणीशी संपर्क साधला. ती सज्ञान आहे.
एसपी राजेश गढिया पुढे म्हणाले, "आमचे एक पथक महाराष्ट्रात गेले आणि मुलाच्या मोठ्या बहिणीला येथे घेऊन आले. तिच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आमची सहा स्वतंत्र पथके काम करत आहेत."
"तपासासाठी तांत्रिक पथकासह एलसीबी, एसओजी, पॅरोल-फर्लो स्क्वॉड, स्थानिक डे-स्टाफ आणि विभागीय डीवायएसपी यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे."
एसपी राजेश गढिया यांनी पुढे सांगितलं, "आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरात लवकर अटक करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या तपास सुरू आहे. बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत असून, बारडोलीचे डीवायएसपी राठोड त्यावर देखरेख ठेवत आहेत. तर, इतर पथकं त्यांना मदत करत आहेत."
हे कुटुंब कोण होते?

फोटो स्रोत, rupesh sonawane/ajit gadhvi
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली.
एसपी राजेश गढिया यांनी सांगितलं की, "महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हे कुटुंब निघालं होतं."
"या प्रकरणात ज्या दुसऱ्या गाडीचा करण्यात आला आहे, तीदेखील त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीची होती. तक्रारीतही ही बाब समोर आली आहे."
"आरोपींनी बचावलेल्या मुलाच्या आई-वडिलांना एका गाडीत बसवले, तर त्यांच्या तीन मुलांना दुसऱ्या गाडीत बसवले."
"त्यानंतर महुवा परिसरातील एका कालव्यात त्या मुलाच्या आईचा आणि लहान बहिणीचा मृतदेहही आढळून आला."
"हा कालवा पुढे नवसारी ग्रामीण आणि जलालपोर परिसरातून जातो."
"या भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांशीही आमचा सातत्याने संपर्क सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात कोणतीही नवीन माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्हाला पुढील कायदेशीर कारवाई करता येईल."
आरोपींचा शोध सुरू असल्याने त्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती बातमीत अपडेट करण्यात येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.




























