You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुशर्रफ यांनी वाजपेयींना सॅल्युट केला होता का? 'ऑपरेशन सफेद सागर'मधील दृश्यामागचं वास्तव
- Author, अभिषेक प्रताप सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
कारगिलवर आतापर्यंत आपण 'एलओसी कारगिल'पासून ते 'शेरशाह'सारखे अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्या सर्व जमिनीवरील लढाईच्या कथा होत्या.
डोंगरावर चढणारे सैनिक, बंकर आणि शिखरांवर फडकणारा तिरंगा. 'नेटफ्लिक्स'वर अलीकडे प्रदर्शित झालेली वेब सिरीज 'ऑपरेशन सफेद सागर' ही पहिल्यांदाच हे युद्ध हवाईदलाच्या दृष्टीकोनातून दाखवते.
या सिरीजची मोठी चर्चा होत आहे. पण जेव्हा एखादी कथा इतिहासाच्या पानांतून पडद्यावर येते, तेव्हा तिच्यासोबत अनेक प्रश्नही समोर येतात.
तो दिवस होता 21 फेब्रुवारी 1999. 'ऑपरेशन सफेद सागर' वेब सिरीजमध्ये एक अत्यंत नाट्यमय आणि ऐतिहासिक दृश्य दाखवलं गेलं आहे.
या दृश्यानुसार, लाहोरच्या गव्हर्नर हाऊसमध्ये भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या परिचित शैलीत एका कवितेसह भाषणाचा समारोप केला. त्यानंतर वेळ आली ती पाकिस्तानच्या सैन्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी भेटीची.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ पुढे सरसावले आणि पंतप्रधान वाजपेयींसोबत चालत त्यांची सेनाधिकाऱ्यांशी ओळख करून देऊ लागले. सर्वप्रथम वाजपेयींसमोर आले पाकिस्तान नौदलाचे प्रमुख अॅडमिरल फसीह बुखारी.
त्यांनी भारतीय पंतप्रधानांना औपचारिक सॅल्युट केला. त्यानंतर एअर चीफ मार्शल परवेज मेहंदी कुरैशी यांनीही वाजपेयींना सॅल्युट केला.
आता पाळी होती पाकिस्तानच्या लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांची. वाजपेयी त्यांच्या जवळ पोहोचताच, मुशर्रफ एक क्षण थांबले. त्या काही सेकंदांच्या जड शांततेनंतर, इतर दोन्ही प्रमुखांच्या उलट, मुशर्रफ यांनी सलामी देण्याऐवजी वाजपेयींकडे हात पुढे केला.
वेब सिरीजमध्ये दाखवलेल्या या हस्तांदोलनाच्या क्षणासोबतच नवाज शरीफ यांची झालेली कोंडी आणि वाजपेयींच्या चेहऱ्यावर उमटलेले गंभीर भाव प्रेक्षकांना स्पष्टपणे जाणवतात.
'द प्रिंट'मध्ये 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, फेब्रुवारी 1999 मध्ये वाजपेयी लाहोरला पोहोचले तेव्हा वाघा सीमेवर त्यांचं स्वागत पूर्ण प्रोटोकॉलनुसार करण्यात आलं. 21 तोफांची सलामी, गार्ड ऑफ ऑनर आणि दोन्ही देशांची राष्ट्रगीतं वाजवण्यात आली, मात्र पाकिस्तानच्या कोणत्याही सैन्यप्रमुखाची तिथे उपस्थिती नव्हती.
लाहोरला जाणाऱ्या भारतीय प्रतिनिधीमंडळात वरिष्ठ पत्रकार कुलदीप नैयर यांचाही समावेश होता. ते त्या बसमधील 22 प्रवाशांपैकी एक होते.
गल्फ न्यूजमधील आपल्या लेखात त्यांनी लिहिलं की तेव्हा मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकलं नाही कारण पाकिस्तानची सेना त्याच्या विरोधात होती आणि जेव्हा पाकिस्तानच्या तिन्ही सैन्यप्रमुखांनी भारतीय पंतप्रधानांना सलामी देण्यास नकार दिला तेव्हा ते स्पष्टच झालं.
बीबीसीने पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार हामिद मीर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आम्ही त्यांना विचारलं की भारताचे पंतप्रधान पाकिस्तानमध्ये आले असता पाकिस्तान आर्मीचे प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी वाजपेयींशी हस्तांदोलन केलं होतं की सॅल्युट केला होता?
यावर त्यांनी उत्तर दिलं, "त्या वेळी पाकिस्तानचे हवाईदलप्रमुख आणि नौदल प्रमुख यांनी गणवेशासोबत कॅप घातली होती. त्यामुळे त्यांनी वाजपेयींना सॅल्युट केला. पण जनरल परवेज मुशर्रफ यांनी गणवेश घातला असला तरी कॅप घातली नव्हती. त्यामुळे त्यांनी सॅल्युटऐवजी हस्तांदोलन केलं."
बीबीसीने हामिद मीर यांना कुलदीप नैयर यांच्या गल्फ न्यूजमधील लेखाचा संदर्भ दिला. त्यावर त्यांनी बांगलादेशातील ढाका येथे कुलदीप नैयर यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेख केला.
हामिद मीर म्हणाले, "मी ढाकामध्ये नैयर साहेबांसोबत बसलो होतो तेव्हाही वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्या हस्तांदोलनाचा विषय निघाला होता. तिथं उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं हा प्रश्न थेट कुलदीप नैयर यांनाच विचारला होता. मात्र उत्तर देण्याऐवजी त्यांनी मला सांगितलं होतं, 'हामिदजी, तुम्ही सांगा त्या वेळी नेमकं काय झालं होतं.'"
'ऑपरेशन सफेद सागर'चे लेखक काय म्हणाले?
बीबीसीने 'ऑपरेशन सफेद सागर'चे लेखक संदीप जैन यांच्याशी याबाबत संवाद साधला. संदीप जैन म्हणाले, "आम्हाला प्रेक्षकांसमोर मुशर्रफ यांचं व्यक्तिमत्व दाखवायचं होतं. त्या काळात मुशर्रफ यांच्या मनात काय चाललं होतं, याची जाणीव होण्यासाठी पटकथा हेच एक माध्यम होतं."
संदीप जैन यांच्या मते, "प्रत्यक्षात वाजपेयी लाहोरला पोहोचण्याआधीच मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाचं संपूर्ण नियोजन केलं होतं. अशा परिस्थितीत पटकथेतून हे दाखवणं गरजेचं होतं की मुशर्रफ स्वतःला भारताच्या पंतप्रधानांपेक्षा कमी समजत नव्हते. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेचं गांभीर्य दाखवण्यासाठी पाकिस्तानच्या नौदल आणि हवाईदलाच्या प्रमुखांनी वाजपेयींना सॅल्युट केला, तर मुशर्रफ यांनी हस्तांदोलन केलं, असं दाखवलं गेलं."
'ऑपरेशन सफेद सागर' वेब सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर, आता 2001 मधील आग्रा शिखर परिषदेत तत्कालीन हवाईदलप्रमुख ए. वाय. टिपणीस यांनी मुशर्रफ यांना सॅल्युट न करुन लाहोरचा 'बदला' घेतला होता, अशी चर्चा सुरू झालीय. मात्र ही घटना आग्र्यात नाही, तर 14 जुलै 2001 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात घडली होती.
15 जुलै 2001 रोजी 'द ट्रिब्यून'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, टिपणीस यांनी गणवेशात असूनही सलामीऐवजी हस्तांदोलन करण्याचा पर्याय निवडला. प्रोटोकॉलनुसार तिन्ही सैन्यदलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुखाकडे हा पर्याय उपलब्ध असतो. सेवाज्येष्ठतेच्या दृष्टीने मुशर्रफ हे टिपणीस यांच्यापेक्षा कनिष्ठ होते.
2013 मध्ये डीएनए वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात टिपणीस यांनी स्वतः म्हटलं होतं की, "2001 मध्ये मी मुशर्रफ यांना सॅल्युट केला नाही कारण भारतीय सैनिकांबद्दल पाकिस्तानी सेनेची भूमिका नेहमीच शत्रुत्वाची राहिली आहे. सॅल्युट करणं अनिवार्य नव्हतं आणि शिष्टाचार म्हणून मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं."
'ऑपरेशन सफेद सागर' वेब सिरीजमध्ये असं दाखवलं आहे की संपूर्ण योजना मुशर्रफ एकट्याने आखली आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांना त्याची माहिती नव्हती. मात्र कारगिल युद्धानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी वेगवेगळी विधानं केली होती.
2007 मध्ये पत्रकार शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत नवाज शरीफ यांनी सांगितलं की, "मला अंधारात ठेवण्यात आलं होतं."
जुलै 2006 मध्ये बिझनेस प्लस वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरीफ यांना सर्व माहिती होती, असा दावा मुशर्रफ यांनी छायाचित्रं दाखवत केला होता.
त्यांनी 5 फेब्रुवारी 1999 रोजी शरीफ यांच्या केल (काश्मीर) दौऱ्याची 4 छायाचित्रं सादर केली. हा दौरा वाजपेयी यांच्या 19 फेब्रुवारीच्या लाहोर भेटीपूर्वीचा होता.
दुसऱ्या बाजूला, कारगिल युद्धाच्या काळात आयएसआयचे लेफ्टनंट जनरल शाहिद अजीज यांनी आपल्या 'हाऊ लाँग धिस सायलेन्स' या पुस्तकात लिहिलं की मुशर्रफ यांनी हे ऑपरेशन केवळ काही मोजक्या अधिकाऱ्यांसोबत मिळून राबवलं. राज चेंगप्पा यांनी 2013 मध्ये 'द ट्रिब्यून'मध्ये याचा उल्लेख करताना लिहिलं की, संपूर्ण आयएसआयलाही याची माहिती नव्हती हा अजीज यांचा दावा मानणं अवघड आहे.
कारगिल युद्धात लष्कर आणि हवाईदल यांच्यात समन्वयाचा अभाव होता का?
संकटाच्या वेळी लष्कर आणि हवाईदल यांनी त्वरित एकत्र येत पाकिस्तानविरोधी कारवाई सुरू केली होती, असं 'ऑपरेशन सफेद सागर' वेब सिरीजमध्ये दाखवलं आहे. पण खरंच असं घडलं होतं का?
ऑक्टोबर 2006 मध्ये 'फोर्स' मासिकात (जे 2024 मध्ये 'द वायर'ने प्रसिद्ध केलं) तत्कालीन हवाईदलप्रमुख ए. वाय. टिपणीस यांचा एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी लिहिलं की 10 ते 25 मे 1999 दरम्यान लष्कर आणि हवाईदल यांच्यात गंभीर मतभेद होते आणि सर्वात मोठी तक्रार म्हणजे दोन्ही दलांमध्ये कोणत्याही स्तरावर संयुक्त नियोजनच झालं नव्हतं.
14 मे रोजी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल चंद्रशेखर यांनी एअर फोर्सकडे एमआय-17 हेलिकॉप्टरच्या फायर सपोर्टची मागणी केली आणि असा युक्तिवाद केला की सरकारची परवानगी फक्त लढाऊ विमानांसाठी आवश्यक आहे. हेलिकॉप्टरचा वापर हा सेवा मुख्यालयांचा अंतर्गत निर्णय असू शकतो.
टिपणीस मदतीच्या विरोधात नव्हते. मात्र ते दोन मुद्द्यांवर ठाम होते.
परवानगी सरकारकडूनच मिळावी.
त्या भूभागात आक्रमक भूमिकेत हेलिकॉप्टर स्टिंगर क्षेपणास्त्रांसमोर "टप्प्यात आणून दिलेलं लक्ष्य" ठरतील.
अखेर 24 मे रोजी जनरल वेद मलिक यांच्यासोबत तीव्र वादानंतर त्यांनी सहमती दर्शवली आणि 25 मे रोजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या मंजुरीनंतर 26 मेपासून ऑपरेशन सुरू झालं. 28 मे रोजी एक एमआय-17 स्टिंगर क्षेपणास्त्राने पाडण्यात आलं आणि 4 वायुसैनिकांचा मृत्यू झाला.
ऑक्टोबर 2006 मधील 'द ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, टिपणीस यांच्या या लेखामुळे वाद निर्माण झाला. घुसखोरीचं गांभीर्य सरकारला समजावून सांगण्यात लष्कर कचरत होतं, असा त्यांचा आरोप होता.
याला उत्तर म्हणून जनरल व्ही. पी. मलिक यांनी टिपणीस यांचंच 7 जुलै 1999 चं पत्र प्रसिद्ध केलं, यात टिपणीस यांनी कारगिलमधील सैनिकांच्या शौर्याचं मुक्तकंठाने कौतुक केलं होतं.
मलिक यांनी आपली सविस्तर बाजू 'कारगिल: फ्रॉम सरप्राइझ टू व्हिक्टरी' या पुस्तकात मांडली आहे. त्याच ट्रिब्यून अहवालात टिपणीस यांनी हेही म्हटलं होतं की या मतभेदांचा ऑपरेशनवर परिणाम झाला नव्हता.
बीबीसीशी बोलताना संरक्षणतज्ज्ञ राहुल बेदी म्हणाले, "कारगिल युद्धाच्या काळात लष्कर आणि हवाईदल यांच्यात संयुक्त कारवाई करताना अनेकदा अडचणी आल्या होत्या. ही समस्या अजूनही कायम आहे."
त्यांनी कारगिल युद्धाला 'इंटेलिजन्स फेल्युअर' म्हटलं.
ते दावा करतात, "वाजपेयी लाहोरला पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानी सैन्याच्या तुकड्यांनी एलओसी ओलांडण्यास सुरुवात केली होती. कारण हिवाळ्यात भारतीय सेना उंच डोंगरांवरून खाली उतरून येत असे."
त्यांच्या मते, "जर गुप्तचर संस्थांकडून आधीच माहिती मिळाली असती तर हे कारगिल युद्ध टाळता आलं असतं."
17 वी स्क्वाड्रन 'गोल्डन अॅरोज'चं खरं काम काय होतं?
'ऑपरेशन सफेद सागर'मध्ये गोल्डन अॅरोजचा उल्लेख आहे. या स्क्वाड्रननेच डोंगरावरील उंच शिखरांवर शत्रूची घुसखोरी झाल्याचं प्रथम शोधून काढल्याचं दाखवलं आहे.
गोल्डन अॅरोज ही मुख्यतः टोही स्क्वाड्रन होती. कारगिल युद्धाच्या काळात माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ हे 17 व्या स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर होते.
एका मुलाखतीत ते सांगतात, "ऑपरेशन सफेद सागरचं पहिलं मिशन गोल्डन अॅरोजने पार पाडलं होतं."
त्या वेळी एअर चीफ मार्शल टिपणीस हे हवाईदलप्रमुख होते. त्यांनी संपूर्ण एअर फोर्सला सज्ज राहण्याचा आदेश दिला होता.
बी. एस. धनोआ म्हणतात, "आमच्या स्क्वाड्रनची भूमिका रिकॉनसन्स म्हणजे छायाचित्रण करण्याची होती. त्यानंतर स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा आणि लेफ्टनंट के. नचिकेता यांच्या घटनेनंतर आम्ही बॉम्बिंगची भूमिका देण्याची विनंती केली. नंतर आमच्या स्क्वाड्रनमधील 6 विमानांना बॉम्बिंगची जबाबदारी देण्यात आली. हीच स्क्वाड्रन आज राफेल विमान उडवत आहे."
स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा यांचा मृत्यू कसा झाला?
कारगिल युद्धादरम्यान लेफ्टनंट के. नचिकेता यांच्या विमानाचं इंजिन बंद पडल्यानं ते कोसळलं होतं.
त्यानंतर कोसळलेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा यांच्या विमानाला उंच डोंगरांवर तैनात पाकिस्तानी सैनिकांनी क्षेपणास्त्राने लक्ष्य केलं.
फायटर जेटला क्षेपणास्त्र लागल्यानं स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा यांचं विमान कोसळलं. टिपणीस लिहितात, "इजेक्शन सीटमुळे त्यांना दुसरं आयुष्य मिळालं होतं, पण शत्रूच्या क्रौर्यापासून वाचण्यासाठी तिसऱ्या आयुष्याची गरज होती."
फायटर जेटमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानने स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा यांना बंदी बनवलं होतं. भारताच्या अधिकृत शवविच्छेदन अहवालानुसार, जमिनीवर उतरल्यावर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. कारगिल युद्धातील ही सर्वांत वेदनादायी घटना मानली जाते.
कोणतीही वेब सिरीज ही काही एखाद्या इतिहासाचं पूर्ण पुस्तक असू शकत नाही. प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यात काही नाट्य, काही भावना आणि काही घटनांचं तुलनात्मक सादरीकरण करावंच लागतं.
'ऑपरेशन सफेद सागर' वेब सिरीजमुळे त्या वैमानिकांना, त्या विमानांना आणि त्या घटनांना पुन्हा चर्चेत आणलं आहे, ज्यांचा उल्लेख बहुतेक वेळा फक्त फायलींमध्ये किंवा लष्करी नियतकालिकांमध्येच आढळतो.
कारगिलमध्ये नेमकं काय घडलं होतं?
मे 1999 मध्ये कारगिलच्या डोंगररांगांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. या संघर्षाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलमधील उंच डोंगरशिखरांवर घुसखोरी करून आपली ठाणी निर्माण केली.
ही लढाई सुमारे 100 किलोमीटरच्या परिसरात लढली गेली, जिथे सुमारे 1700 पाकिस्तानी सैनिक भारतीय सीमेच्या 8 किंवा 9 किलोमीटर आतपर्यंत घुसले होते.
या संपूर्ण मोहिमेत भारताचे 527 सैनिक मृत्युमुखी पडले आणि 1363 जवान जखमी झाले.
सुरुवातीला भारताला आपली 2 मिग विमानं आणि एक हेलिकॉप्टर गमवावं लागलं, पण भारतीय हवाईदल आणि बोफोर्स तोफांनी पाकिस्तानी तळांवर वारंवार आणि अचूक प्रहार केले.
नसीम झेहरा आपल्या 'फ्रॉम कारगिल टू द कू' या पुस्तकात लिहितात की, "हे हल्ले इतके भयानक आणि अचूक होते की त्यांनी पाकिस्तानी चौक्यांचा चक्काचूर केला. पाकिस्तानी सैनिक कोणत्याही रसदीशिवाय लढत होते आणि बंदुकांची योग्य देखभाल न झाल्यामुळे त्या फक्त काठ्या बनून राहिल्या होत्या."
"भारतीयांनी स्वतः मान्य केलं की एवढ्याशा क्षेत्रावर शेकडो तोफांचा मारा करणं म्हणजे जणू एखादं अक्रोड मोठ्या हातोड्याने फोडण्यासारखं होतं."
कारगिल युद्धात कमांडर असलेले लेफ्टनंट जनरल मोहिंदर पुरी यांचं मत आहे की कारगिलमध्ये हवाईदलाची सर्वांत मोठी भूमिका मनोवैज्ञानिक होती. वरून भारतीय जेटचा आवाज ऐकताच पाकिस्तानी सैनिक घाबरून जात आणि इकडे-तिकडे पळू लागत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)