उडत्या तबकड्या ते हवेत चमकणारे दिवे, अमेरिकेकडून पहिल्यांदाच गुप्त कागदपत्रं प्रसिद्ध; काय समोर आलं?

फोटो स्रोत, US Department of Defense
- Author, साक्षी वेंकटरामन आणि रेबेका पायडर
- वाचन वेळ: 4 मिनिटे
पेंटागॉनने यूएफओबद्दल नुकतीच काही कागदपत्रे जाहीर केली आहेत. या नवीन अहवालात यापूर्वी कधीही समोर न आलेल्या माहितीचा समावेश आहे.
या फाईल्समध्ये पृथ्वीवर सामान्य नागरिकांनी पाहिलेल्या यूएफओ घटनांचा उल्लेख आहे, तसेच चंद्रावर असताना अंतराळवीरांनी केलेल्या काही रहस्यमय निरीक्षणांचाही समावेश आहे.
या फाईल्स अनेक दशकांपासूनच्या आहेत. ती गोपनीय कागदपत्रे शुक्रवारी (8 मे) ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिले होते.
लोकांकडून 'या विषयात खूप उत्सुकता दिसत' असल्यामुळे ही कागदपत्रे सार्वजनिक केली जातील, असं त्यांनी यावर्षाच्या सुरुवातीला सांगितलं होतं.
अमेरिकेत गेल्या काही वर्षांत परग्रहवासी जीवांविषयी पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांची उत्सुकता वाढली आहे. 2022 मध्ये, तब्बल 50 वर्षांनंतर काँग्रेसमध्ये यूएफओबद्दल पहिल्यांदाच सुनावणी झाली. तसेच लष्कराने या विषयात अधिक पारदर्शकता ठेवण्याचे आश्वासनही दिले आहे.
या 161 फाईल्स अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. आणखी काही फाईल्स येत्या काळात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
या फाईल्स शुक्रवारी (8 मे) जाहीर करण्यात आल्या. त्याआधी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेब्रुवारीमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत परग्रहवासी असू शकतात, 'पण मी त्यांना प्रत्यक्षात पाहिलेलं नाही', असं म्हटलं होतं. त्यामुळे या विषयात सर्वसामान्य लोकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
ओबामा यांनी नंतर त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, आकडेवारीनुसार विश्वात इतरत्र जीवन असण्याची शक्यता आहे. पण ते अध्यक्ष असताना त्यांना परग्रहवासी अस्तित्वाचा 'कोणताही ठोस पुरावा' मिळाला नव्हता.
ट्रम्प यांनी त्या महिन्याच्या शेवटी "पेंटागॉनला परग्रहवासी आणि अवकाशातील अज्ञात जीव, तसेच आकाशात दिसणाऱ्या अज्ञात घटनांशी (यूएपी) आणि अनोळखी उडत्या वस्तू (यूएफओ) संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे निर्देश दिले होते."
प्रसिद्ध झालेल्या या फाईल्समध्ये अनेक दशकांतील गोपनीय लष्करी नोंदी आहेत. त्यात अपोलो चंद्र मोहिमांमधील अहवालांचाही समावेश आहे.
त्याचबरोबर काही लोकांनी यूएफओ म्हणजेच अनोळखी उडत्या वस्तू पाहिल्याचा दावा केलेले अहवालही यात आहेत. त्या लोकांना वाटतं की, या वस्तू परग्रहावरून आलेल्या असू शकतात.
अपोलो अंतराळवीरांनी पाहिले चमकणारे प्रकाश
या फाईल्समध्ये 1960 आणि 1970 च्या दशकातील अपोलो 11, अपोलो 12 आणि अपोलो 17 चंद्र मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या अंतराळवीरांच्या पूर्वी गोपनीय ठेवलेल्या संभाषणांच्या नोंदी आहेत.
अपोलो 11 मोहिमेतील प्रसिद्ध अंतराळवीर बझ ऑल्ड्रिन यांनी 1969 मधील एका मुलाखतीत सांगितलं की, चंद्रावरच्या प्रवासादरम्यान त्यांनी काही अकल्पनीय गोष्टी पाहिल्या. त्यांना एक अतिशय तेजस्वी प्रकाश दिसला, जो कदाचित लेझरमुळे दिसला असावा, असा त्यांना वाटलं होतं.
या नोंदींमध्ये अपोलो 12 चे अंतराळवीर ॲलन बीन, ज्यांनी 1969 मध्ये चंद्रावर पाऊल ठेवले होते, त्यांनी म्हटलं आहे की, मोहिमेदरम्यान त्यांना अवकाशात तरंगणारे कण आणि चमकणारे प्रकाश दिसले. हे कण जणू अवकाशात पुढे जात होते, असं वाटलं. तसेच ते चंद्रावरून 'बाहेर जात आहेत' असं भासत होतं.
1972 मधील अपोलो 17 मोहिमेदरम्यान 2 अंतराळवीरांनी अंतराळात चमकणारे प्रकाश पाहिल्याचे सांगितले.
अंतराळवीर जॅक श्मिट म्हणाले, "बाहेर जणू 4 जुलैच्या (स्वातंत्र्य दिन) आतिषबाजीसारखं दृश्य दिसतंय!"
हा प्रकाश कदाचित बर्फाच्या तुकड्यांवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे दिसत असावा, असंही त्यांनी नमूद केलं.
जाहीर केलेल्या आणखी एका फाईलमध्ये 1965 मधील जेमिनी 7 अवकाश मोहिमेचा ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. यात अंतराळवीर फ्रँक बोमन आणि पृथ्वीवरील नासा मिशन कंट्रोल यांच्यातील संवाद ऐकायला मिळतो.
या संवादात बोमन यांनी अवकाशात एक अज्ञात वस्तू (यूएफओ) दिसल्याचे सांगितले. त्यांनी त्या वस्तूला 'बोगी' असं म्हटलं आहे आणि अंतराळयानाच्या डाव्या बाजूला 'लाखो-कोट्यवधी सूक्ष्म कण' (पार्टिकल्स) दिसत असल्याचं वर्णन केलं.
प्रकाशातून दिसणाऱ्या तरंगणाऱ्या वस्तू
या फाईल्समध्ये अनेक दशकांतील अहवालांचा समावेश आहे. त्यात अनेक लोकांनी पाहिलेल्या अज्ञात आणि विचित्र किंवा विसंगत घटनांचे (यूएपी) डझनभर वैयक्तिक दावे नोंदवलेले आहेत.
एका फाईलमध्ये 1957 मधील एफबीआय मुलाखतीचा उल्लेख आहे. त्यात एका व्यक्तीने सांगितलं की, त्याने जमिनीवरून वर उडणारे एक मोठे गोलाकार वाहन पाहिले होते.
तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 मधील काही मुलाखतीही आहेत. त्यात अमेरिकन नागरिकांनी त्यांना तेजस्वी, चमकदार प्रकाशातून अचानक दिसणाऱ्या आणि हवेत तरंगणाऱ्या धातूच्या वस्तू दिसल्याचे सांगितले.
इराक, सीरिया आणि यूएईमधील लष्करी दृश्य
या फाईल्समध्ये 2022 मधील अमेरिकन सैन्याने घेतलेले काही व्हीडिओ क्लिप्सही आहेत. हे व्हीडिओ मध्य पूर्वेतील भागात लष्करी कारवाईदरम्यान रेकॉर्ड करण्यात आले होते.
इराक, सीरिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधून घेतलेल्या या व्हीडिओंमध्ये अशी दृश्यं दिसतात. त्यांना पेंटागॉनच्या वेबसाइटवर 'अनुत्तरित अज्ञात विसंगती घटना (यूएपी)' असं म्हटलं आहे.
2022 मधील एका व्हीडिओमध्ये, मध्य पूर्वेतील एका गोपनीय ठिकाणी रेकॉर्ड केलेलं दृश्य आहे. त्यात एक अंडाकृती वस्तू वेगाने डावीकडून उजवीकडे जाताना दिसते. या व्हीडिओसोबतच्या अहवालात या वस्तूचं 'संभाव्य क्षेपणास्त्र' असू शकतं असं वर्णन केलेलं आहे.
हा केवळ पहिला टप्पा, आणखी माहिती आवश्यक - कायदेमंडळ
टेनेसी राज्यातील रिपब्लिकन खासदार टिम बर्चेट यांनी याआधीही यूएफओ दिसण्यांबाबत सरकारने अधिक पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी केली होती.
पेंटागॉनने या फाइल्स जाहीर केल्यानंतर त्यांनी हे पाऊल स्वागतार्ह असल्याचं सांगितलं आणि एक्सवर याला 'चांगली सुरुवात' असं म्हटलं.
फ्लोरिडा राज्यातील रिपब्लिकन खासदार अॅना पॉलिना लुना यांनीही या विषयावर अधिक पारदर्शकता असावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी याला 'योग्य दिशेने टाकलेलं पहिलं मोठं पाऊल' असं म्हटलं आहे.
एकेकाळी ट्रम्प यांच्या सहकारी असलेल्या पण नंतर त्यांच्याशी मतभेद झाल्याने काँग्रेस सोडणाऱ्या माजी काँग्रेस महिला सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांनी याबाबत वेगळं मत व्यक्त केलं आहे.
या फाईल्स जाहीर करणे म्हणजे अमेरिकन लोकांसमोरील खऱ्या आणि महत्त्वाच्या समस्यांपासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
या फाइल्स जाहीर केल्यामुळे वाढती महागाई आणि इराणमधील युद्धासारख्या गंभीर मुद्द्यांपासून लक्ष विचलित होतं, असं त्या म्हणाल्या.
"मला नेहमी लक्ष विचलित करणाऱ्या अशा 'चमकदार गोष्टी पाहा' प्रकारच्या प्रचाराचा खूप कंटाळा आला आहे," असं ग्रीन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























