जेन-झीच्या 'या' सवयींमुळे 3.83 लाख कोटींच्या दिशेने धावतोय भारताचा सौंदर्य उत्पादनांचा उद्योग

    • Author, निखिल इनामदार
    • Role, मुंबई
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

अलीकडे भारतातील सौंदर्य उत्पादनं (ब्युटी प्रॉडक्ट्स) आणि ब्रँडकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही भारतातील या क्षेत्राकडे आकर्षित झाले आहेत.

यावर्षी मार्चमध्ये अमेरिकेच्या लक्झरी कॉस्मेटिक्स कंपनी 'एस्टी लॉडर'ने भारतीय आयुर्वेदिक ब्युटी ब्रँड 'फॉरेस्ट एसेंशियल्स'चं अधिग्रहण केलं. त्यानंतर जूनमध्ये फ्रान्सच्या लॉरियल ग्रुपने डिजिटल पर्सनल केअर ब्रँड इनोव्हिस्टमधील बहुसंख्य हिस्सा घेतला.

याशिवाय युनिलिव्हर कंपनीनंही, गेल्या काही वर्षांत आपल्या व्हेंचर कॅपिटल शाखेमार्फत भारतातील ब्युटी कंपन्यांमध्ये किमान चार वेळा गुंतवणूक केली आहे.

दोन मुलांची सिंगल मदर असलेल्या मीरा कुलकर्णी यांनी छोट्या व्यवसायापासून 'फॉरेस्ट एसेंशियल्स'ची सुरुवात केली. आज दोन दशकांनंतर हीच कंपनी जगभरात ओळखली जाणारी, सुमारे 1 अब्ज डॉलरची ब्युटी कंपनी बनली आहे.

यामुळे भारताच्या सौंदर्य उद्योगात झालेली मोठी वाढ दिसून येते. 2025 मध्ये या उद्योगाची किंमत सुमारे 23 अब्ज डॉलर (2.20 लाख कोटी रुपये) होती.

या दशकाच्या अखेरीपर्यंत ती जवळपास दुप्पट होऊन 40 अब्ज डॉलर (3.83 लाख कोटी रुपये) होण्याचा अंदाज आहे. या उद्योगाची वाढ देशाच्या जीडीपी आणि रिटेल बाजाराच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगानं होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढत आहे. त्यामुळे ब्युटी मार्केट वाढण्याचे हे एक मोठे कारण आहे.

व्यावसायिक सल्लागार कंपनी रेडसीरच्या मते, भारतातील दरडोई उत्पन्न 2019 मध्ये 1 लाख 90 हजार रुपयांपेक्षा (2000 डॉलर) जास्त झाले. या पातळीनंतर लोक गरजेच्या वस्तूंसोबत इतर गोष्टींवरही जास्त पैसे खर्च करण्याची शक्यता असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रँड थेट ग्राहकापर्यंत

2030 पर्यंत भारतातील सुमारे 15.5 कोटी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयांपेक्षा (9500 डॉलर) जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्युटी उद्योगाच्या वाढीलाही आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

रेडसीरचे भागीदार कुशल भटनागर यांनी बीबीसीला सांगितलं, "पूर्वी भारतात लोक ब्युटी प्रॉडक्ट्सवर फारसा खर्च करत नव्हते. कारण साधा साबण किंवा फेस पावडर यांसारख्या अगदी मूलभूत गोष्टी सोडल्या, तर इतर ब्युटी प्रॉडक्ट्स घेण्याइतकीही लोकांची आर्थिक क्षमता नव्हती."

"परंतु, आता लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढली आहे. त्यासोबतच ब्युटी प्रॉडक्ट्सची उपलब्धता, त्यांचे वितरण आणि त्याबद्दलची माहितीही वाढली आहे. इंटरनेटमुळे हे प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे. सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर्सच्या मदतीने ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत जात आहेत."

रेडसीरच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत ब्युटी प्रॉडक्ट्सवरील एकूण खर्चापैकी साधारण 35 टक्के खर्च ई-कॉमर्सच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी हा आकडा केवळ 8 टक्के इतकाच होता.

बॉलिवूड सेलिब्रेटिंची मोठी गुंतवणूक

वैशाली गुप्ता यांच्या मते, कोरोनाच्या काळात सौंदर्य उद्योगात मोठा बदल घडून आला. कोव्हिडच्या काळात सुरू झालेल्या त्यांच्या दोन सौंदर्यविषयक व्यवसायांचा त्यानंतर वेगाने विस्तार झाला.

त्यांनी 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननसोबत मिळून 'हायफन' नावाची व्हेगन स्किनकेअर कंपनी सुरू केली. त्या 'एमकॅफीन' ही कंपनीही चालवतात. ही कंपनी स्क्रब, फेस वॉश आणि लोशन यांसारखी उत्पादने बनवते आणि स्वतःला भारतातील पहिला कॅफिनयुक्त पर्सनल केअर ब्रँड म्हणून सादर करते.

वैशाली यांच्या मते, "कोरोना काळात लोकांनी स्वतःची काळजी घेण्याकडे जास्त लक्ष दिलं. त्याच काळात टियर-1, टियर-2 आणि टियर-3 शहरांपर्यंत इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे भारतीय ग्राहकांना ब्युटी आणि स्किनकेअरबद्दल आधीपेक्षा खूप जास्त माहिती मिळू लागली."

"कोरिया किंवा युरोपमध्ये कोणते ब्युटी ट्रेंड सुरू आहेत, त्वचा चमकदार ठेवण्यासाठी किंवा मुरुम कमी करण्यासाठी कोणते घटक उपयोगी आहेत, अशी माहितीही त्यांना सहज मिळू लागली."

"या माहितीच्या आधारे ग्राहकांना आपल्याला नेमकं काय हवं आहे, हे समजू लागलं. आणि याच काळापासून भारतात स्किनकेअर प्रॉडक्ट्सची मागणी आणि बाजारपेठ वेगाने वाढू लागली."

गेल्या एका वर्षभरात गुप्ता यांच्या ब्रँड्सच्या एकूण महसुलात 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढेही या व्यवसायात चांगली वाढ होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

त्या सांगतात की, हायफन आणि एमकॅफीन हे दोन्ही ब्रँड्स आता भारतातील आपापल्या क्षेत्रातील टॉप 10 ब्रँडमध्ये आहेत.

गुप्ता म्हणाल्या, "ही वाढ कायमस्वरूपी होणाऱ्या बदलाचा भाग आहे. आणि या बाजारात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे."

त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनीही या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे, यात काहीच आश्चर्य नाही. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि 'बिग ब्रदर' फेम शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्री आणि सेलिब्रिटींनी गेल्या काही वर्षांत स्वतःचे स्किनकेअर ब्रँड्स सुरू केले आहेत.

ग्राहकांची संख्या देशभरात वाढत आहे. ब्युटी प्रॉडक्ट्सची मागणी केवळ मोठ्या शहरांमध्येच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातही वाढत आहे.

गुप्ता यांच्या मते, आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेन-झी हे पुढे नेत आहेत. जेन-झीचे तरुण स्किनकेअर आणि पर्सनल केअरवर मिलेनियल्सच्या तुलनेत जवळपास दुप्पट खर्च करताना दिसत आहेत.

वॉलमार्टचा पाठिंबा असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या आकडेवारीतूनही हे स्पष्ट होते. फ्लिपकार्टवरील ब्युटी आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्सच्या सुमारे 56 टक्के ग्राहकांमध्ये जेन-झीचा समावेश आहे. यापैकी 70 टक्के तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सौंदर्य उत्पादनांची माहिती मिळते.

फ्लिपकार्टवर ब्युटी प्रॉडक्ट्ससंबंधी होणाऱ्या सर्चपैकी दोन तृतीयांश सर्च मोठ्या शहरांबाहेरील भागांतून होतात.

रेडसीरच्या मते, सौंदर्य उत्पादनांवर होणाऱ्या एकूण खर्चात जेन-झी आणि जेन-अल्फाचा वाटा 2024 मधील 32 टक्क्यांवरून 2030 पर्यंत सुमारे 50 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

फ्लिपकार्टमध्ये ब्रँड स्ट्रॅटेजी अँड इनसाइट विभागाचं नेतृत्व करणाऱ्या प्रियांका भार्गव यांच्या मते, हे एक महत्त्वाचे वळण आहे. पूर्वी तरुणांसाठी ब्युटी प्रॉडक्ट्स ही फक्त इच्छा किंवा हौस होती. परंतु, आता ते त्यांच्या रोजच्या सेल्फ-केअरचा, म्हणजेच स्वतःची काळजी घेण्याच्या सवयीचा एक भाग बनले आहे.

पुढे बाजारपेठ जसजशी वाढत जाईल, तसतशी ग्राहकांची समज आणि माहितीही अधिक विकसित होण्याची शक्यता आहे.

रेडसीरचे कुशल भटनागर यांच्या मते, आतापर्यंत केवळ मोजक्याच ब्युटी ब्रँड्सनी मोठी प्रगती केली आहे. परंतु, बाजारपेठेच्या वाढीचा वेग पाहता पुढील 3 ते 5 वर्षांत किमान 10 ते 15 ब्युटी कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न 20 कोटी डॉलर (सुमारे 19 हजार कोटी रुपये) किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.