एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे प्रकरण : मृतांच्या पोटात आणि कलिंगडात काय सापडलं?

- Author, दिपाली जगताप आणि अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या चार सदस्यांच्या मृत्यू प्रकरणात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) चा अहवाल समोर आला आहे.
या अहवालानुसार, सर्व मृत व्यक्तींच्या व्हिसेरा नमुन्यांमध्ये यकृत, मूत्रपिंड आणि प्लीहा तसेच पोटातील घटक, पित्त आणि पोटातील मेदाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
झिंक फॉस्फाईड हे एक अतिशय विषारी रासायनिक संयुग आहे.
झिंक फॉस्फाईड काय आहे?
झिंक फॉस्फाईड (Zinc Phosphide) हे एक अतिशय विषारी रासायनिक संयुग असून ते प्रामुख्याने उंदीर, घुशी आणि इतर कृंतक प्राणी(रोडंट) मारण्यासाठी वापरलं जातं. हा पदार्थ शेती आणि धान्य साठवणुकीत कीटकनाशक (Rodenticide) म्हणून वापरला जातो.
झिंक फॉस्फाईड हा झिंक (Zn) आणि फॉस्फरस (P) यांपासून बनलेला अजैविक पदार्थ आहे. त्याचा रासायनिक फॉर्म्युला Zn₃P₂ असा असून तो गडद करड्या किंवा काळसर रंगाच्या पूड किंवा कणांच्या स्वरूपात आढळतो.
ते पोटात गेल्यावर काय होतं?
तज्ज्ञांच्या मते, झिंक फॉस्फाईड पोटातील आम्लाशी प्रतिक्रिया करतं आणि त्यातून फॉस्फिन नावाचा अत्यंत विषारी वायू तयार होतो. हा वायू शरीरातील पेशींना ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया थांबवतो. त्यामुळे हृदय, फुफ्फुसं आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
झिंक फॉस्फाईडचा वापर प्रामुख्याने :
- शेतीत पिकांना नुकसान करणाऱ्या उंदीर, घुशी, खारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी
- धान्य साठवण केंद्र, शेतजमीन, बागा आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागा
- बहुतेक वेळा हा पदार्थ धान्य किंवा खाद्यात मिसळून वापरला जातो.
झिंक फॉस्फाईड चुकून गिळल्यास किंवा फॉस्फिन वायू श्वासात गेल्यास प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे अनेक देशांत या रसायनाचा वापर कडक नियम आणि नियंत्रणाखाली केला जातो आणि तो सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध नसतो.

फोटो स्रोत, Getty Images
झिंक फॉस्फाईडचा वापर कशात होतो? शरीराला ते कसं घातक असतं? यासंदर्भात मुंबईतील डॉ. भूषण रोकडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "झिंक फॉस्फाईड हे एक अत्यंत विषारी रासायनिक रसायन (संयुग) आहे. याचा वापर उंदीर, घुशी आणि इतर किडे मारण्यासाठी "रॅट पॉइझन" म्हणून केला जातो. हे साधारणपणे काळ्या किंवा राखाडी रंगाच्या पावडर स्वरूपात असतं. मात्र त्याचा वापर आणि स्वरूपानुसार काही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तो बाजारात आढळतो."
याचा वापर कशात होतो, याबद्दल बोलताना डॉ. भूषण रोकडे म्हणाले की, "शेती करताना घुस लागू नये म्हणून उंदीर नियंत्रणासाठी, गोदामे, धान्य साठवण जागा येथे, कीटकनाशक किंवा उंदीर मारण्याच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो."
"मानवी शरीराला आणि इतर पाळीव प्राण्यांना हे खूप हानिकारक आहे."
शरीराला ते कसं घातक असतं, यासंदर्भात बोलताना डॉ. रोकडे म्हणाले की, "हे रसायन शरीरात पोटात गेल्यानंतर किंवा ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर हे रसायन "फॉस्फीन गॅस" तयार करतं, जो अतिशय विषारी असतो. हा वायू शरीरातील पेशींना ऑक्सिजन वापरण्यापासून रोखतो आणि अनेक अवयवांवर गंभीर परिणाम करतो.यामुळे उलट्या होणे, श्वासाला लसणासारखा वास येणे, छातीत घट्टपणा जाणवणे, धाप लागणे, शॉक बसणे. अगदी कमी प्रमाणातही हे प्राणघातक ठरू शकते."
पुढे डॉ. रोकडे म्हणाले की, "यासाठी कोणतेही ठराविक प्रतिविष (अँटिडोट) उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करून केवळ आवश्यक ते सहाय्यक उपचार (सपोर्टिव्ह ट्रीटमेंट) दिले जातात. हे रसायन लहान मुलांपासून आणि अन्नपदार्थांपासून दूर ठेवावे. चुकून गिळल्यास किंवा विषबाधेची शंका आल्यास उलटी करण्याचा प्रयत्न करू नये. अशावेळी तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे."
फॉरेन्सिकच्या रिपोर्टमधून काय समोर आलं?
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालासंदर्भात FSL चे संचालक डॉ . विजय ठाकरे यांच्याशी बीबीसी मराठीनं संवाद साधला.
डॉ. ठाकरे म्हणाले की, "पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात आम्ही फॉरेन्सिक सायन्स लॅब अहवाल पोलिसांकडे आज सुपूर्द केला आहे."
"अहवालानुसार, मृतांच्या व्हिसेरा नमुन्यांमध्ये म्हणजेच यकृत (लिव्हर), मूत्रपिंड (किडनी), प्लीहा (स्प्लीन) नमुन्यांमध्ये तसेच पोटातील पदार्थ, पित्त (बाइल) आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आले आहे. कलिंगडाच्या नमुन्यातही झिंक फॉस्फाइड आढळले आहे."
तसंच, "आम्ही पोलिसांकडे अहवाल सादर केला असून, पुढील तपासात आवश्यकतेनुसार पोलिसांना सहकार्यही करण्यात येईल," असंही डॉ. विजय ठाकरे म्हणाले.
याबद्दल मुंबईतील झोन-1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनीही याबाबत माहिती दिली. ते,"फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडून प्राप्त झालेल्या अहवालात सर्व मृत व्यक्तींच्या व्हिसेरा नमुन्यांमध्ये यकृत, मूत्रपिंड आणि प्लीहा तसेच पोटातील घटक, पित्त आणि पोटातील मेदाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे."
प्रवीण मुंडे यांनी पुढे सांगितलं की, "तपासादरम्यान घेतलेल्या कलिंगडाच्या नमुन्यातही झिंक फॉस्फाइड आढळले आहे. मात्र, तपासासाठी पाठवण्यात आलेल्या इतर कोणत्याही अन्नपदार्थांच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आलेले नाही."
एफएसएलचा हा अहवाल सखोलपणे अभ्यासला जाणार असून, फॉरेन्सिक डॉक्टरांशी सल्लामसलत करून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे, अशी माहितीही प्रवीण मुंडे यांनी दिली.
FDA च्या अहवालात काय आढळलं होतं?
पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चारही जणांच्या मृत्यूनंतर FDA कडून कलिंगडाच्या सालीचे नमुने तपासण्यासाठी दिले होते. त्याबाबत घेतलेल्या नमुन्यांमध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही, असं स्पष्ट झाल्याची माहिती एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.
दरम्यान, ही चाचणी कोणत्याही प्रकारच्या विषबाधेसंदर्भात तपासण्यासंदर्भात नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं होतं.
याबाबत फाॅरेन्सिक (न्यायवैद्यक) रिपोर्टमधूनच स्पष्ट माहिती मिळू शकेल असंही त्यांनी सांगितलं होतं.
तसंच, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) एका पथकाकडून घटनास्थळाच्या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली होती.
इथल्या स्थानिक फळ विक्रेते विशेषतः कलिंगड विक्रेत्यांशी बोलण्यासाठी एफडीएचं पथक तिथे पोहचलं होतं, परंतु त्यांना एकही विक्रेता सध्या आढळला नसल्याची माहिती एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.
इथल्या विक्रेत्यांशी बोलून, ते विक्री करत असलेल्या कलिंगडची तपासणी अन्न व औषध प्रशासनाला करायची होती, परंतु विक्रेतेच नसल्याने पथकाच्या हाती अद्याप काहीही लागलं नव्हतं.
यापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे कलिंगडामधून विषबाधा झाल्याच्या एकाही प्रकरणाची नोंद आढळलेली नाही, अशीही माहिती देण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील पायधुनीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याची घटना 25 एप्रिलच्या रात्रीच्या जेवणानंतर घडली होती. कुटुंबातील सर्वांना जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
कुटुंबातील सर्वांनी रात्री जेवणानंतर उशिरा कलिंगड खाल्लं होतं. त्यामुळं त्यांना विषबाधा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता स्थानिक डॉक्टरांनी वर्तवली होती.
अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळं मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत माहिती अस्पष्ट आहे. पोलीस याबाबत तपास करत असून अन्न आणि कलिंगडाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा एहवाल एफडीएनं दिला आहे. त्यात भेसळ आढळेली नाही.
या कुटुंबानं 25 एप्रिल रोजी रात्री साधारण दहा ते साडे दहा वाजता काही नातेवाईकांसह जेवण केलं होतं.
त्यानंतर नातेवाईक गेल्यानंतर रात्री उशिरा सुमारे दीड वाजता त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणात नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

नेमकं काय घडलं?
पायधुनी परिसरातील जुनी इमारत असलेल्या मोघल इमारतीत पहिल्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं.
अब्दुल्ला डोकाडिया(40 वर्षे), त्यांच्या पत्नी नसरीन डोकाडिया (35वर्षे) तसंच 16 आणि 13 वर्षे वयाच्या दोन लहान मुली असं हे कुटुंब होतं.
यापैकी तिघांचा जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर लहान मुलीला घरातून जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत असतानाच तिचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक डाॅ. झैद कुरेशी यांनी दिली होती.
25 एप्रिल रोजी नातेवाईकांसह सगळ्यांनी रात्रीचं जेवण केलं होतं. नातेवाईक गेल्यानंतर सुमारे दीड वाजता या सगळ्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. यानंतर पहाटे कुटुंबातील सर्वांना उल्टी आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. यावेळी इमारतीतील लोकांनी त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले.
याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारे डाॅ. झैद कुरेशी यांनी तत्काळ त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.
डाॅ.कुरेशी घटनास्थळी पोहचले त्यावेळी खोलीत चारही जण अत्यावस्थ होते, अशी माहिती डाॅ. कुरेशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
"यावेळी चौघांपैकी सर्वात लहान मुलीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं मला दिसलं. तिला तत्काळ सीपीआर दिला. परंतु परिस्थिती तशीच राहिल्यानं जवळच्या रुग्णालयात नेलं. त्यावेळी तिचा मृत्यू झाला. तर इतर तिघांना स्थानिक रुग्णालयातून नंतर जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे काही तास त्यांच्यावर उपचार सुरू होते. नंतर त्यांचा मृत्यू झाला," अशी माहिती डाॅ कुरेशी यांनी दिली.

पोलिसांनी काय माहिती दिली होती?
या प्रकरणी जेजे पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटना समोर आली, तेव्हा मुंबईतील झोन-1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं होतं की," एका कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झालेला आहे. 25 एप्रिल रोजी रात्री इतर काही नातेवाईकांसह त्यांनी जेवण केलं होतं. नातेवाईक निघून गेल्यानंतर रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती मिळालेली आहे."
"यानंतर पहाटेपासून त्यांना उल्टी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु या चौघांचाही दुर्देवी मृत्यू झालेला आहे."
"पोस्ट माॅर्टम करण्यात आलेलं आहे. त्यांनी खाल्लेल्या पदार्थांचे नमुने पोलिसांनी जप्त केले आहेत. कलिंगडाचेही नमुने घेण्यात आले असून त्यांच्या शरीरातील नमुनेही घेतले आहेत. या प्रकरणी मृत्यूबाबत चौकशी सुरू आहे."
माजी आमदार वारीस पठाण काय म्हणाले?
MIM चे स्थानिक नेते आणि माजी आमदार वारीस पठाण यांनी राज्य सरकार आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी केलीय की, या प्रकरणाची दखल घ्यावी.
एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट शेअर करत वारीस पठाण यांनी म्हटलंय की, "मला अनेकांचे फोन आले की अशाप्रकारे कोणाचा मृत्यू कसा होऊ शकतो? काय कारण आहे? आम्ही सध्या पोस्टमार्टेम अहवालाची प्रतिक्षा करत आहोत. माझी राज्य सरकार आणि पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणाची चौकशी करावी की नेमकं काय घडलं आहे. कोणत्या गोष्टीमुळे कुटुंबातील सर्वांचा एकाचवेळी मृत्यू झाला. कलिंगड खाल्ल्यामुळे झालं की दुसरं काही कारण आहे, याची चौकशी व्हायला हवी. याची माहिती सरकारने जाहीर करावी जेणेकरून इतर लोक काळजी घेऊ शकतील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























