You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराकमधून ड्रोन हल्ला, सौदी अरेबियाने महत्त्वाची तेल पाइपलाइन केली बंद
- Author, टिफनी टर्नबुल
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
इराकमधून ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने महत्त्वाची तेल पाइपलाइन बंद केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष आता आणखी वाढल्याचे दिसत आहे.
इराकने शेजारी देश सौदी अरेबियाच्या पूर्व-पश्चिम (ईस्ट-वेस्ट) तेल पाइपलाइनवर झालेला ड्रोन हल्ला मान्य केला आहे. हा हल्ला इराणच्या सीमेजवळ असलेल्या इराकमधील एका प्रांतातून झाला होता. यानंतर इराकने एका लष्करी कमांडरला लगेचच पदावरून हटवले असून, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
1200 किलोमीटर लांबीच्या या पाइपलाइनमुळे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल पाठवण्याची गरज कमी झाली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर इराणच्या पाठिंब्याने लढणाऱ्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी मोठी आगेकूच केली आहे. त्यामुळे जगभरातील तेल वाहतुकीच्या मार्गांवर दबाव वाढला आहे. अमेरिका-इराणमधील हे युद्ध सातव्या महिन्यात पोहोचले आहे.
सौदी अरेबिया प्रत्युत्तर देणार नाही
खबरदारी म्हणून ही पाइपलाइन बंद करण्यात आली आहे, असं रियाधने शुक्रवारी (11 सप्टेंबर) सांगितलं. दरम्यान, सॅटेलाइट फोटोंमध्ये या ठिकाणाजवळ जळालेली जमीन आणि धूर दिसून आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, या हल्ल्यात काही जण जखमी झाले असून काही प्रमाणात नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा आढावा अजून घेतला जात आहे.
रॉयटर्सने जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या कंपन्या आणि तज्ज्ञांच्या हवाल्याने सांगितलं की, या पाइपलाइनमधून जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे 4 ते 5 टक्के तेल वाहून नेल जातं.
इराकच्या पंतप्रधानांशी फोनवर चर्चा झाल्यानंतर सौदी अरेबियाने सध्या या हल्ल्याला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
सौदी अरेबियाने म्हटलं आहे की, शेजारी देशांवर इराकमधून होणारे ड्रोन 'हल्ले रोखण्यासाठी' इराक सरकार करत असलेल्या 'प्रयत्नांना तो (सौदी अरेबिया) पाठिंबा देईल'.
सौदी अरेबियाने स्पष्ट केलं आहे की, देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आल्यास तो आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. तसेच, आपल्या ठिकाणांचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीही आवश्यक पावले उचलली जातील.
इराकने ऑपरेशन्स कमांडरला हटवलं
इराकच्या पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनावरून सांगितलं की, ड्रोन हल्ला इराणच्या सीमेजवळ असलेल्या मेसान प्रांतातून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तेथील 'ऑपरेशन्स कमांडर'ला त्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे. ड्रोन हल्ला याच भागातून करण्यात आल्याची खात्री पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
संयुक्त अरब अमिराती, बहरीन, ओमान, कतार आणि कुवेत या देशांचा समावेश असलेल्या गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.
"हा हल्ला म्हणजे परिस्थिती आणखी गंभीर करणारे पाऊल आहे. सौदी अरेबियाच्या सुरक्षेला, सीमेला आणि महत्त्वाच्या ठिकाणांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचेही स्पष्ट उल्लंघन आहे," असे कौन्सिलचे महासचिव जासेम मोहम्मद अल-बुदाईवी यांनी म्हटलं आहे.
या आठवड्यात येमेनमध्ये हुथी बंडखोरांनी अत्यंत वेगाने पुढे जात देशाच्या किनारपट्टीवरील मोठ्या भागावर ताबा मिळवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हुथी बंडखोरांनी बाब अल-मंदाब सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. हा मार्ग लाल समुद्र आणि सुएझ कालव्याकडे जाण्यासाठी महत्त्वाचा आहे.
परंतु, "सौदीची जहाजे वगळता इतर सर्व कंपन्यांची जहाजे या मार्गावर सुरक्षितपणे जाऊ शकतात", असं हुथी बंडखोरांनी म्हटलं आहे.
या घडामोडींमुळे अरबी द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूंवर दबाव निर्माण झाला असून कच्च्या तेलाचे भाव जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या वर पोहोचले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)