कोकण जलमय, मराठवाडा कोरडाच? उद्या 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट, जाणून घ्या कुठे काय स्थिती असणार

रायगडच्या कर्जतमध्ये 297 मिलीमीटर. तर अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये 0 मिलीमीटर.

महाराष्ट्रातल्या कर्जत नावाच्याच दोन गावांमधली 5 जुलैच्या सकाळची पावसाची ही आकडेवारी आहे.

सध्या राज्यात दोन प्रदेशांमधला पाऊस किती असमान आहे हेच यावरून दिसून येतं.

एका बाजूला कोकणात मुसळधार तर राज्याच्या अंतर्गत भागांत तुलनेनं कोरडं हवामान, असं चित्र आहे.

6 जुलैच्या दुपारी सॅटेलाईटनं टिपलेल्या दृश्यांमध्ये मान्सूनच्या दोन्ही ब्रँचेस म्हणजे अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रीय असल्याचं दिसतं.

ओडिशाजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीचं 5 जुलैला डिप्रेशनमध्ये रुपांतर झालं आहे.

तर रविवारी (5 जुलै) दुपारीच या वादळानं किनारा ओलांडला, तसं महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरही पावसात वाढ झालेली दिसली.

बंगालच्या उपसागरालगत तयार होणाऱ्या अशा कमी दाबाच्या प्रणालींमुळे मान्सूनच्या वाऱ्यांना गती मिळते.

तर ते आणखी वेगानं पुढे सरकतात तसंच गेल्या दोन दिवसांत घडलं आहे.

5 आणि 6 जुलैला राज्यात विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि घाट प्रदेशात वेगानं ढग जमा होत गेले आणि मुसळधार पाऊस झाला.

याच दरम्यान, म्हणजे 5 जुलै सकाळी 8.30 ते 6 जुलै सकाळी 8.30 या 24 तासांत लोणावळ्यात 670 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, लोणावळ्यात 650 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता सरासरी 1000 वर्षांत केवळ एकदाच घडते.

पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासांत कोकण किनारपट्टी तसेच घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

अशीच परिस्थिती 6 जुलैपासून पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होताना दिसेल.

राज्यातील इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागात एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली तयार झाली आहे.

काही हवामान तज्ज्ञांच्या मते या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अगदी अंतर्गत भागांतही वादळी वारे अनुभवायला मिळाले आहेत.

7 जुलैलाही इथे मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे.

6 जुलैपासून पुढच्या 24 तासांत कोकणात अनेक ठिकाणी तर नाशिक, पुणे आणि आसपासच्या परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.

विदर्भातही विशेषतः संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावासाची शक्यता आहे.

मुंबईच्या प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या इशाऱ्यांनुसार, 6 जुलैच्या रात्री पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी हे जिल्हे आणि लगतच्या घाट प्रदेशात रेड अलर्ट आहे.

तर नाशिक, पुणे आणि कोल्हापूरचा उर्वरीत भाग, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदियात ऑरेंज अलर्ट आहे.

तर 7 जुलै रोजी पालघर, रायगड हे जिल्हे आणि नाशिक व पुण्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी रेड अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा पठारी भाग आणि साताऱ्याचा घाट प्रदेश तसंच अकोला आणि अमरावती इथे ऑरेंज अलर्ट आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड तसंच नाशिक आणि पुण्याच्या घाट प्रदेशात फ्लॅश फ्लड म्हणजे अचानक पूर येण्याच्या घटना घडू शकतात.

तसंच अनेक भागांत भूस्खलनाचाही धोका असल्यानं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

कमी वेळेत अतिवृष्टी आणि पुरेसा पाणी निचरा व्यवस्था नसल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये 12 जणांचा जीव गेला आहे.

तर दुसरीकडे राज्याच्या काही भागात सलग सहाव्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक सेक्शनवर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहतूक प्रभावित झाली आहे.

पुढील सूचना येईपर्यंत मुंबई-पुणे प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)