मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; फ्लॅश फ्लडचा इशारा असलेले जिल्हे कोणते?

कोकणात अतिवृष्टी, विदर्भात मेघगर्जना; फ्लॅश फ्लडचा इशारा असलेले जिल्हे कोणते?

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले.

महाराष्ट्रात किनारी प्रदेशात गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे.

कोकणात अतिवृष्टी, विदर्भात मेघगर्जना; फ्लॅश फ्लडचा इशारा असलेले जिल्हे कोणते?

फोटो स्रोत, IMD

आज 4 जुलै रोजी दुपारी उपग्रहानं टिपलेलं दृश्यं पाहिलं, तर राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दिसतं. पण कोकण, घाट प्रदेश नाशिक आणि दक्षिण गुजरातच्या आसपास ढग दाटलेले दिसतात. पूर्व विदर्भातही दाट ढग दिसत आहेत. तर बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची प्रणाली सक्रीय आहे.

याच कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात मान्सूनचा पाऊस वाढला आहे, कारण ही कमी दाबाची प्रणाली मान्सूनच्या वाऱ्यांना बळ देते.

BBC weather 2 नुसार कमी दाबाचं हे क्षेत्र पुढे सरकेल, तसं पुढचे चार पाच दिवस कोकण, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात पाऊस बराच सक्रीय राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

मुंबईत पावसाचा कहर, रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या 24 तासांत झालेला मुसळधार पाऊस आणि आणखी पावसाची शक्यता पाहता कोकणातील मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांत तसंच अहिल्यानगर आणि सोलापूरच्या काही भागांत फ्लॅश फ्लड आणि भूस्खलनासारख्या घटनांचीही शक्यता आहे.

flash flood

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, फ्लॅश फ्लडची शक्यता असलेले प्रदेश

पाच जुलै साठी मुंबई, पालघर, ठाणे तसंच पुण्याचा घाट प्रदेश आण साताऱ्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी रेड अलर्ट आहे.

नाशिकच्या घाट प्रदेशात तसंच रायगड, रत्नागिरी तसंच कोल्हापूरचा घाट प्रदेश इथे जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदियात मेघगर्जनेसह पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे. सिंधुदुर्ग, नाशिकचा पठारी भाग, धुळे, हिंगोली इथे जोरदार पावसाठी यलो अलर्ट आहे.

तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलढाणा, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.

व्हीडिओ कॅप्शन, भांडुपमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता खचला

दरम्यान, राज्यात 3 ते 7 जुलै दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

याशिवाय, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भातही 3 ते 7 जुलैदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर ताशी 40 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा स्पष्ट इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यात 4 ते 6 जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाने 4 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास जारी केलेल्या नाऊकास्टनुसार, आज दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांत ताशी 15 मिमीपेक्षा अधिक तीव्रतेचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आली आहे.

संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पाणी साचलेल्या ठिकाणी आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत विशेष काळजी घ्यावी तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत पावसाने जनजीवन विस्कळीत

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सातत्याने पाऊस सुरू असून त्याचा दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी 4 जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही भागांत अतिवृष्टीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईसाठी पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट' कायम ठेवण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पाऊस

फोटो स्रोत, @RMC_Mumbai

कुलाबा वेधशाळेने पुढील 24 तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगर परिसरात संततधार पाऊस सुरू राहील. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या अंदाजासह अधूनमधुन ताशी 50 ते 60 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही दाट शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठीही 4 आणि 5 जुलै रोजी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे स्थानिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून सखल भागांत पाणी साचण्याचा धोका आहे.

तर, महा मुंबई मेट्रो मार्ग 2अ वर दहिसर पूर्व ते कांदरपाडा स्थानकांदरम्यान तांत्रिक कारणास्तव मेट्रो वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

  • अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी दरम्यान मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहेत.
  • डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व दरम्यान एकाच मार्गिकेवर (Single Line) दोन्ही दिशांनी मेट्रो सेवा सुरू असून, गाड्यांचे नियमन करून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
मुंबई पाऊस

फोटो स्रोत, Alpesh Karkare

फोटो कॅप्शन, यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सातत्याने पाऊस सुरू असून त्याचा दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे.

दरम्यान, अतिमुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून, मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेदेखील वाहत आहेत. परिणामी, परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी विलंब होत आहे. तसेच, समुद्राला दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी4.26 मीटर इतकी भरती येणार आहे.

त्यामुळे चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

नागरिकांनी याची नोंद घेऊन या रस्त्यांवर प्रवास करणे टाळावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

रायगड जिल्ह्यात शनिवारी (4 जुलै) अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. पोलादपूरमध्ये सर्वाधिक 222 मिमी पाऊस पडला असून तेथे अतिवृष्टीची नोंद झाली. याशिवाय म्हसळा (176 मिमी), महाड (162 मिमी), तळा (133 मिमी), सुधागड (116 मिमी) आणि मुरूड (113 मिमी) येथेही मुसळधार पाऊस झाला.

पेणमध्ये 100 मिमी, माणगावमध्ये 102 मिमी, माथेरान आणि खालापूरमध्ये प्रत्येकी 92 मिमी, उरणमध्ये 82 मिमी, रोहा 79 मिमी, पनवेल 78.2 मिमी, श्रीवर्धन 77 मिमी आणि कर्जतमध्ये 68 मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

रायगड जिल्ह्यातील मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाट 3 जुलै ते 6 जुलै दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

घाटातील तीव्र उताराचा रस्ता, दाट धुके आणि प्रगतीपथावर असलेले सुरक्षा भिंतींचे काम या बाबी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. माझी सर्व नागरिकांना व पर्यटकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे आणि प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत पुण्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे 30.5 मिमी, पाषाण येथे 31.4 मिमी, तर लोहेगाव येथे 29 मिमी पाऊस झाला.

शनिवार-रविवारीही पुणे आणि परिसरात पावसाची हजेरी कायम राहण्याची शक्यता असून, अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या 24 तासांत महाबळेश्वरमध्ये 266 मिमी पावसाची नोंद झाली असून, भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार हा पावसाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या भागांपैकी एक ठरला आहे. शनिवार-रविवारीही महाबळेश्वरसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)