2026 चे सूर्यग्रहण कधी आहे आणि ते कसे पाहता येईल?

    • Author, डेझी स्टीफन्स
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

जगातील काही भागांमध्ये 12 ऑगस्टला सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. काही क्षेत्रांमध्ये हे खग्रास सूर्यग्रहण असेल, तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

हे विलोभनीय दृश्य तुम्हाला थेट पाहायला मिळाले नाही, तरी जगभरातून याचे अत्यंत सुंदर फोटो पाहायला मिळतील.

सूर्यग्रहण म्हणजे काय ?

जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा तो सूर्याचा काही किंवा संपूर्ण प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. यालाच सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहण वेगवेगळ्या प्रकारचे असते. तुम्हाला ते कसे दिसणार, हे तुम्ही जगात कुठे आहात आणि चंद्र किती दूर आहे यावर ठरते.

जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी अगदी एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, तेव्हा त्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. यामुळे दिवसासुद्धा पहाटेसारखा किंवा संध्याकाळसारखा अंधार होतो.

तुम्ही जर चंद्राच्या मध्य भागातील गडद सावलीच्या क्षेत्रात असाल, तर तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल.

सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याभोवती एक चमकणारे कडे किंवा वलय दिसते. याला सूर्याचे बाह्य वातावरण म्हणजेच 'कोरोना' म्हणतात. हे कडे किंवा वलय एरवी सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे झाकलेले असते.

तुम्ही चंद्राच्या फिकट सावलीच्या क्षेत्रात असाल, तर तुम्हाला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळेल. यात चंद्र सूर्याला पूर्ण न झाकता त्याचा काही भागच झाकतो. त्यामुळे सूर्याचा आकार चंद्रकोरीसारखा दिसतो.

कंकणाकृती सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र सूर्याच्या समोर येतो. पण तो पृथ्वीपासून खूप दूर असल्यामुळे सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. चंद्राची कक्षा लंबगोलाकार आहे म्हणजेच ती पूर्ण गोल नाही. त्यामुळे चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असताना जेव्हा सूर्यासमोरून जातो तेव्हा तो आपल्याला आकाराने लहान दिसतो.

अशा ग्रहणाच्या वेळी चंद्राच्या पाठीमागे सूर्याचा चमकत असलेला गोल भाग कड्यासारखा किंवा अंगठीसारखा स्पष्ट दिसतो.

सूर्यग्रहणाचे हे सर्व प्रकार चंद्रग्रहणापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये एका रेषेत येते. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.

पुढचे सूर्यग्रहण कधी आणि कुठे दिसेल?

पुढील सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.

उत्तर रशिया, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन आणि पोर्तुगालच्या काही भागांत हे खग्रास सूर्यग्रहण दिसेल.

नासाच्या माहितीनुसार, उत्तर रशियाच्या एका लहान आणि दुर्गम भागात दुपारी 12 च्या सुमारास खग्रास स्थिती म्हणजेच सूर्य पूर्णपणे पूर्णपणे झाकला जाईल.

त्यानंतर हे ग्रहण पूर्वेकडे सरकत स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी उशिरा सूर्यास्ताच्या काही वेळ आधी स्पेनमध्ये पोहोचेल.

सूर्यग्रहणाकडे कधीही थेट उघड्या डोळ्यांनी पाहू नका. साधे गॉगल घालूनही ते पाहणे धोक्याचे आहे. कारण ते डोळ्यांचे योग्य रक्षण करत नाहीत. थेट पाहिल्यास तुमच्या डोळ्यांच्या रेटिनाला कायमचे नुकसान पोहोचू शकते.

फक्त खास सूर्यग्रहणासाठी असलेले चष्मे घालूनच सूर्याकडे पाहा. हे चष्मे साध्या गॉगलपेक्षा हजार पटीने जास्त गडद असतात. तुम्ही घेतलेला चष्मा ISO 12312-2 या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवलेला आहे ना, याची खात्री करून घ्या.

सूर्यग्रहणाचा चष्मा घातलेला असला तरीही कॅमेरा, टेलिस्कोप किंवा बायनोक्युलर्स (बायनोक्युलर दुर्बीण) यांसारख्या कोणत्याही उपकरणातून सूर्याकडे अजिबात पाहू नका.

अगदी सूर्यग्रहणाचा विशेष चष्मा घातलेला असला तरीही नाही. कारण नासाने दिलेल्या माहितीनुसार, या उपकरणांतून केंद्रित होऊन येणारे सूर्याचे किरण चश्म्याच्या फिल्टरला जाळून तुमच्या डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवू शकतात.

याशिवाय, तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतींचा वापर करून सूर्याची प्रतिमा पाहू शकता.

यासाठीची एक सोपी पद्धत म्हणजे 2 कार्डबोर्ड वापरणे. सूर्याकडे पाठ करून उभे राहा. दोन्ही कार्डबोर्ड तुमच्या समोर खांद्याच्या वर एकामागे एक अशा प्रकारे धरा की तुमच्या पहिल्या कार्डबोर्डची सावली दुसऱ्या कार्डबोर्डवर पडेल.

तुमच्या जवळ असलेल्या कार्डला एक छोटे छिद्र करा. त्या छिद्रातून सूर्याचे किरण जाऊन मागच्या कार्डवर एका लहान वर्तुळाच्या रूपात दिसतील. कार्डऐवजी तुम्ही एक किंवा त्यापेक्षा जास्त छिद्रे असलेली वस्तू जसे की चाळणसुद्धा वापरू शकता.

यामुळे ग्रहण जसजसे पुढे सरकेल, तसतसा चंद्र त्या प्रकाशाच्या गोलाला हळूहळू कसा झाकत जातो, हे तुम्हाला पाहता येईल.

आणि समजा हे काहीच जमले नाही किंवा ढगांमुळे सूर्य दिसला नाही, तर नासा सह अनेक ठिकाणी याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)