'खरा हिरो' : वृद्धाला वाचवण्यासाठी स्वतःचं लाईफ जॅकेट दिलं अन् पुरात वाहून गेला

    • Author, सिराज
    • Role, बीबीसी तमिळ
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

केरळमध्ये दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळं अनेकदा पूरस्थिती निर्माण होते. 2018 साली केरळ पाण्याखाली बुडालं होतं, तेव्हा इथं जवळपास 50 वर्षांतला सर्वात भीषण पाऊस आणि पुराचा अनुभव लोकांना आला होता.

त्यावेळी केरळमधील अनेक सामान्य नागरिकांनी मदत कार्यात मदत करण्यासाठी स्वतःहून सेवा केली. त्यांच्यापैकी एक होते तिरुवनंतपुरमचे रहिवासी असलेले राजेश.

या वर्षीही केरळच्या अनेक भागांना मान्सूनचा मोठा फटका बसला. त्यामुळं राजेश यंदाही पुन्हा एकदा मदत आणि बचाव कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढं आले.

कन्नूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका 61 वर्षीय व्यक्तीच्या बचाव कार्यात राजेश 1 ऑगस्ट रोजी सहभागी झाले होते. यावेळी बचाव कार्यादरम्यान त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला त्यांचं घातलेलं लाईफ जॅकेट दिलं.

त्या वृद्ध व्यक्तीला सुखरुप वाचवण्यात आलं, पण राजेश मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. कुटुंबीयांना आणि मित्रांना ते जिवंत सापडतील अशी आशा होती.

पण, तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह सापडला. गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोण होते राजेश?

राजेश (36 वर्षे) हे तिरुवनंतपुरममधील थेत्तिविला मधील रहिवासी होते. ते रॅपलिंग प्रशिक्षक आणि 'ॲडव्हेंचर डिझास्टर सोसायटी' या स्वयंसेवी आपत्ती निवारण पथकाचे सदस्यही होते. हे पथक नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचाव कार्यात सहभागी व्हायचे.

राजेशचे मित्र विष्णू यांच्या मते, "राजेशच्या मृत्यूमुळं केवळ त्याचं कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण थेत्तिविला शोकात बुडालं आहे."

"2024 मध्ये वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेदरम्यानही राजेश यांनी बचावकार्यात सहभाग घेतला होता. त्यांनी अनेक लोकांना आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्याचं प्रशिक्षण दिलं. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांसाठी गिर्यारोहण प्रशिक्षक म्हणूनही ते काम करायचे," असं विष्णू म्हणाले.

कन्नूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं 1 ऑगस्ट रोजी कर्नाटक सीमेजवळच्या चेरुपुझातील पुलिंगोम गावात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.

राजेश यांनी वाचवलेल्या 61 वर्षीय व्यक्तीचं नाव बेनी असं आहे. त्यांची या परिसरात कॉफीची बाग आहे.

बेनी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "राजेश तिथे नसते, तर मी वाचलो नसतो. राजेशसारख्या तरुणानं माझ्यासारख्या 61 वर्षांच्या माणसाला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालायला नको होता."

पाण्यात कसे वाहून गेले?

बेनी यांनी सांगितलं की, "1 ऑगस्ट रोजी सारखा पाऊस पडत होता. तरीही मी कॉफीच्या मळ्यात कामाला गेलो. सुरुवातीला पाणी फक्त माझ्या पायाच्या घोट्यापर्यंत होतं. पण अचानक पुराचं पाणी वेगानं वाढू लागलं.

मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाणी कमरेपर्यंत आले होते. मी घाबरून कुटुंबीयांना फोन केला. काही मिनिटांतच, पुराच्या जोरदार प्रवाहात मी वाहून गेलो."

राजेश आणि त्यांची टीम त्यांना वाचवण्यासाठी पोहोचली, तेव्हा ते कसेतरी एका नारळाच्या झाडाला लटकून होते, असं बेनी यांनी सांगितलं.

बचाव कार्यादरम्यान राजेश यांच्यासोबत बिजूही होते. त्यांनी त्या दिवशीच्या घटनेबाबत बीबीसी तमिळला माहिती दिली.

"बेनी ज्या झाडाला अडकले होते, त्या दिशेने एक दोरी फेकण्यात आली. त्यांनी ती दोरी पकडून नारळाच्या झाडाला बांधण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांना त्यात अडचण येत असल्याचं राजेश यांच्या लक्षात आलं, तेव्हा ते लगेच पोहून त्यांच्याकडं गेले. झाडाला दोरी बांधल्यानंतर त्यांनी बेनी यांना वाचवायला सुरुवात केली." असं बिजू यांनी सांगितलं.

बिजू म्हणाले की, "बेनी पूर्णपणे थकले होते. त्यामुळं राजेशनं त्यांचं लाईफ जॅकेट काढून बेनी यांना घातलं. राजेशसोबत बचाव पथकाचे आणखी दोघं होते. त्या सर्वांनी दोरी धरली आणि ते नदीकिनारी परत येऊ लागले. पण, अचानक नदीचा प्रवाह खूप वाढला आणि राजेश वाहून गेले."

राजेश यांचा शोध तत्काळ सुरू करण्यात आला होता, असं बिजूनं सांगितलं.

"राजेशला उत्तम पोहता येत होतं आणि अशा परिस्थितीत काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांना होता. पण बराच वेळ थंड पाण्यात राहिल्यामुळं त्यांचं शरीर अखडलं असावं त्यामुळं त्यांना पोहण्यात अडचण आली असावी. ते जिवंत सापडतील असा विश्वास आम्हाला होता आणि त्याच आशेनं बचावकार्य सुरू होतं," असं बिजू म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

तीन दिवसांनंतर 4 ऑगस्ट रोजी राजेश यांचा मृतदेह करियांगोडे नदीत सापडला. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला. तिथं त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश यांना श्रद्धांजली अर्पण करताना केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन म्हणाले की, "राजेश यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांनी दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं.

अनेक आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांचं अपूर्ण घर बांधण्याचं काम पूर्ण करण्यासाठीही सरकार मदत करेल."

राजेश यांच्या पश्चात पत्नी शफिया आणि दोन मुलं अर्शन आणि अभिषेक असा परिवार आहे.

त्यांचा मित्र विष्णू म्हणाला की, "त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. या घटनेच्या आठवडाभरापूर्वीच ते कन्नूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण करून घरी परतले होते. गावात कधीही सार्वजनिक सेवेचं काम असलं की, राजेश सर्वात आधी पुढे यायचा."

"दरवर्षी जेव्हा केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर येतो, तेव्हा राजेशसारखे स्वयंसेवक लोकांना मदत करण्यासाठी सर्वात आधी पुढे येतात. त्यामुळं सरकारनं राजेशच्या कुटुंबाला सर्व आवश्यक मदत पुरवावी," असं आवाहन विष्णू यांनी केलं आहे.

टोविनो थॉमस, कुंचको बोबन आणि आसिफ अली यांची प्रमुख भूमिका असलेला 2023 सालचा मल्याळम चित्रपट '2018' हा केरळमधील 2018 सालच्या विनाशकारी पुरावर आधारित होता.

या चित्रपटात टोविनो थॉमस यांनी अनुप नावाच्या एका तरुणाची भूमिका साकारली आहे. तो पुरात एका वृद्ध माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करताना मरण पावतो.

सोशल मीडियावर अनेक लोक राजेशची तुलना या पात्राशी करत आहेत आणि त्यांना केरळचा 'खरा हिरो' म्हणत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.