राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसासाठी अनुकूल स्थिती, कोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळाची आणि मान्सूनचा स्थिती यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

पुढील 24 तासांत महाराष्ट्रात कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही आणि त्या नंतर 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते.

कोकण-गोव्यामध्ये नैऋत्य मान्सून सामान्य असून उर्वरित प्रदेशात तो कमकुवत आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहरात आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

पुढील 3 दिवसांचा हवामान अंदाज, कुठे काय अलर्ट?

शुक्रवारी (7 ऑगस्ट) कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात आज (7 ऑगस्ट) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जळगाव, पुणे घाट क्षेत्र, सातारा घाट क्षेत्र, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर येथे काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

या सर्व ठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

शनिवारी (8 ऑगस्ट) कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

शनिवारी (8 ऑगस्ट) नाशिक, नाशिक घाट क्षेत्र, जळगाव, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उर्वरित महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

तर रविवारी (9 ऑगस्ट) कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

9 ऑगस्टला जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव येथे हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचा राज्यातील शेतकऱ्यांना अलर्ट

या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत:

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पिकांमध्ये अतिरिक्त पाणी साचले असल्यास, त्याच्या तातडीने निचऱ्याची व्यवस्था करावी. विजांचा कडकडाट होत असताना उघड्यावर, विजेच्या खांबांजवळ किंवा झाडांखाली थांबणं पूर्णपणे टाळा.

पर्यटन किंवा प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी, विशेषतः घाट रस्ते आणि पर्वतीय भागात प्रवास करताना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

मागील 24 तासांत राज्यात कुठं आणि किती पाऊस पडला?

मागील 24 तासांत महाबळेश्वर येथे 82.5 मि.मी, रत्नागिरी येथे 51.6 मि. मी, अमरावती येथे 16 मि.मी, कोल्हापूर येथे 21.2 मि.मी तर सोलापूर येथे 12.1 मि.मी पाऊस पडला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)