कोलंबिया भूकंपानं हादरलं, देशात आणीबाणी लागू; पाहा 11 फोटो

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कोलंबियामध्ये आलेल्या एका भीषण भूकंपामुळे प्रचंड उत्पात घडलेला आहे.

7.4 तीव्रतेच्या या भूकंपामुळे कमीतकमी 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, मोठ्या संख्येनं लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची शक्यता आहे.

एकूण भीषण परिस्थिती पाहता, देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कोलंबियन जिओलॉजिकल सर्व्हिसच्या माहितीनुसार, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 34 मिनिटांनी झाला.

या भूकंपाचा केंद्रबिंदू चोको प्रांतात सुमारे 103 किलोमीटर खोलीवर होता. पश्चिम कोलंबियातील शेकडो किलोमीटरच्या विस्तीर्ण भागात याचे धक्के जाणवले.

भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांमध्ये कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले परेरा शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसराचा समावेश आहे.

तसेच, 'व्हाले देल काउका' या भागातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या परेरा शहरात प्रचंड विध्वंस झाला आहे.

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, परेरा आणि आसपासच्या परिसरामध्ये किमान 40 जणांचा मृत्यू झाला असून 65 इमारती कोसळल्या आहेत. यापैकी 15 इमारतींमध्ये लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 5 वाजेपर्यंत शहराच्या काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

परेराच्या दक्षिणेस सुमारे 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या काली शहराचंही मोठं नुकसान झालं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तिथे 32 इमारती कोसळल्या आहेत. काली हे शहर भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे.

सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. कोसळलेल्या इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन मोहीम राबवत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे, त्यामुळे मृतांची आणि जखमींची संख्या वाढू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)