You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट; जाणून घ्या महाराष्ट्रात कुठे किती पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पुढील 24 तास अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने आज (31 जुलै) राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
ओडिशावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे विदर्भ आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.
हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 31 जुलैपर्यंत या भागांत अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय जळगाव जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात नागपूरसह गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणे, सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे, भूस्खलन होणे तसेच रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज कोणत्या जिल्ह्यांसाठी काय अलर्ट दिले आहेत आणि राज्यातील हवामानाची काय स्थिती असेल जाणून घेऊयात.
विदर्भात पूर, कोणत्या जिल्ह्याना पावसाचा इशारा?
गेल्या 2 दिवसांपासून विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसानं नद्यांना पूर आलाय.
हिंगणघाट तालुक्यातल्या यशोदा नदीत एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. काही अंतरावर गेल्यानंतर एका झाडाला पकडून रात्र काढली.
त्यानंतर 31 जुलैच्या पहाटे एसडीआरएफच्या टीमनं या तरुणाला रेस्क्यू केलं. तसेच याच तालुक्यातील अलमडोह गावाला पुरानं वेढा घातलाय.
अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात लोकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं. 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
तिकडे गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. 30 जुलैला आष्टी मुलचेरा मार्गावर वनपरिक्षेत्र अधिकारी कारसह वाहून गेले. पण, कार झाडाला अडकली. त्यानंतर आष्टी पोलिस आणि वनविभागाच्या पथकानं त्यांना कारमधून रेस्कू केलं. तसेच भामरागडमधून 700 नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही पूरपरिस्थिती आहे. पैनगंगा नदीसह अरुणावती नदीला पूर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही वर्धा नदीला पूर आला असून शेती पाण्याखाली गेली आहे.
एकाचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. तर गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे घरांची पडझड होऊन 10 जण जखमी झाले आहे.
विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस थांबलेला आहे. पण, काही ठिकाणी पूर परिस्थिती कायम आहे.
31 जुलैला यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, तळकोकणातल्या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तसेच नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात देण्यात आला आहे.
तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 1 ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. घाटमाथ्यावर आणि तळकोकणातल्या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
31 जुलैला नाशिक आणि पुण्याच्या घाट प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे.
तसंच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा पठारी प्रदेश, पालघर, ठाणे, रायगड आणि साताऱ्याचा घाट प्रदेश इथे जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाट प्रदेश, अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यांत जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे.
तर बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा इथे मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट दिलेला आहे.
गेल्या 2 दिवसांत झालेल्या पावसानं विदर्भातील तूट बरीच भरून निघाली आहे आणि अनेक ठिकाणी धरणांतल्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.
पुढच्या 4 आठवड्यांसाठीचा विस्तारीत अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
त्यानुसार 30 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो.
ऑगस्टच्या मध्यावर पुन्हा विदर्भ आणि घाट प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
अचानक पूर आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामपंचायत सेवक पुराच्या पाण्यात गेला वाहून
नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर आला आहे. कंचली गावातील 32 वर्षीय ग्रामपंचायत सेवक राजू रेड्डी दांडेलु हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली.
तब्बल 12 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नसून पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
राजू रेड्डी दांडेलु हे कंचली येथून रेवा नाईक तांड्याकडे जाताना कंचली–आंदबोरी मार्गावरील पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस व महसूल प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पाण्याचा प्रचंड वेग आणि सततचा पाऊस यामुळे शोधकार्यात मोठे अडचण येत आहेत.
दरम्यान, पांगरपहाड, आंदबोरी, रेवा नाईक तांडा आणि अप्पारावपेठ या गावांचा संपर्कही तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)