असा वैमानिक ज्याने नकळतपणे ओसामा बिन लादेनला सुदानमधून अफगाणिस्तानला नेले

माजी वैमानिक मोहम्मद उमर अफझल (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, माजी वैमानिक मोहम्मद उमर अफझल (फाइल फोटो)
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

ही गोष्ट आहे मे 1996 सालची. त्या दिवशी एक विमान अफगाणिस्तानातून सुदानची राजधानी खार्तूमकडे रवाना झालं होतं.

विशेष म्हणजे या विमानातून ओसामा बिन लादेनला सुदानमधून अफगाणिस्तानात आणण्यात आल्याचा दावा केला जातो.

11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एरियाना अफगाण एअरलाइन्सचे माजी वैमानिक मोहम्मद उमर अफझल यांनी बीबीसी पश्तोला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

ओसामा बिन लादेन याच विमानातून सुदानमधून अफगाणिस्तानात आला होता, असं त्यांनी सांगितलं. मात्र, त्या वेळी अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुखही विमानात प्रवास करत असल्याची त्यांना कल्पना नव्हती.

ओसामा बिन लादेन हा अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता.

मे 2011 मध्ये पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या लष्करी कारवाईत तो मारला गेला.

पाकिस्तानातील एबोटाबाद येथे अमेरिकेच्या मरीन कमांडोंनी ओसामा बिन लादेनला ठार केले होते.
फोटो कॅप्शन, पाकिस्तानातील एबोटाबाद येथे अमेरिकेच्या मरीन कमांडोंनी ओसामा बिन लादेनला ठार केले होते.

बीबीसीशी बोलताना मोहम्मद उमर अफझल यांनी त्या विमानप्रवासाचा सविस्तर तपशील सांगितला. या विमानात ओसामा बिन लादेनही होता, हे आपल्याला अनेक वर्षांनंतर समजल्याचा त्यांचा दावा आहे.

मोहम्मद उमर अफझल सांगतात की, या विमानाचे कॅप्टन सैयद नबी आगा होते. त्यांचं आता निधन झालं आहे. सुदान सरकारने हे विमान भाड्यानं घेतलं होतं.

ते सांगतात, "दुपारी 3 किंवा 4 च्या सुमारास हे विमान बगरामहून निघालं आणि जलालाबादला पोहोचलं. पेशावरहून येणाऱ्या सुदानी प्रवाशांना त्यांच्या देशात घेऊन जाण्याची योजना होती."

मात्र, विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत दाखल झाल्यानंतर हा प्रवास नेहमीसारखा नसल्याचा अंदाज उमर यांना पहिल्यांदा आला.

त्यांनी सांगितलं की, या विमानाचा कॉल साइन FG602 होता. सामान्यत: जेद्दाहला जाणाऱ्या विमानांसाठी या कॉल साइनचा वापर केला जात असे.

कॉल साइन म्हणजे विमानाची ओळख पटवण्यासाठी वापरला जाणारा विशिष्ट कोड किंवा नाव. याच्या मदतीने हवाई वाहतूक नियंत्रक आणि वैमानिक एकमेकांशी संपर्क साधतात.

खार्तूममध्ये 4 दिवसांचा मुक्काम

उमर अफझल यांच्या म्हणण्यानुसार, विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत दाखल झाल्यानंतर त्यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर सौदी अधिकाऱ्यांनी विमान उतरवण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, वैमानिकांनी उत्तर दिलं, "नाही, आम्ही खार्तूमला जात आहोत."

विमानाला पुढे जाण्याची परवानगी देण्याऐवजी सौदी अधिकाऱ्यांनी त्याला हवेतच थांबण्यास सांगितलं.

विमान वाहतुकीच्या भाषेत याला 'होल्डिंग पॅटर्न' म्हणतात. यात विमान एका ठराविक मार्गावर चक्कर मारत हवेतच थांबतं.

सौदी अधिकाऱ्यांनी सांगितलं, "ही विमानाची संख्या जेद्दाहसाठी राखीव आहे, पण तुम्ही सुदानला जात आहात."

अफझल यांचा दावा आहे की, त्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ओसामा बिन लादेनचाही समावेश होता, हे त्यांना अनेक वर्षांनंतर समजलं.
फोटो कॅप्शन, अफझल यांचा दावा आहे की, त्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ओसामा बिन लादेनचाही समावेश होता, हे त्यांना अनेक वर्षांनंतर समजलं.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मोहम्मद उमर अफझल यांच्या मते, विमान सुमारे 7 मिनिटं किंवा त्याहून थोडा अधिक वेळ हवेत घिरट्या घालत राहिलं. त्यानंतर 360 अंशांची एक फेरी पूर्ण केल्यावर सौदी अधिकाऱ्यांनी पुन्हा संपर्क साधला आणि विमानाला खार्तूमच्या दिशेने जाण्याची परवानगी दिली.

यानंतर विमान सुदानमध्ये पोहोचलं. तिथेही काही अनपेक्षित घटना घडल्या. विमान पार्किंगसाठी एका लष्करी भागात नेण्यात आलं. तिथे लष्करी जवान आणि साध्या वेशातील काही लोक उपस्थित होते.

मोहम्मद उमर अफझल यांच्या म्हणण्यानुसार, खार्तूमला पोहोचल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांच्या पासपोर्टची तपासणी करण्यात आली नाही किंवा त्यांची कोणतीही चौकशीही झाली नाही. त्यांना थेट हॉटेलमध्ये नेण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता विमानातील कर्मचारी नाश्ता करून झाल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं, "खाली या, अफगाणिस्तानचे राजदूत आपल्याला भेटणार आहेत."

अफगाणिस्तानच्या राजदूतांनी विमानातील कर्मचाऱ्यांना सांगितलं की, 4 जणांसाठी व्हिसा जारी करण्यात आले आहेत आणि सुमारे 11 टन म्हणजेच 11 हजार किलो सामान अफगाणिस्तानात न्यायचं आहे.

ते म्हणाले, "सगळं तयार झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही उड्डाण करू शकता."

मोहम्मद उमर अफझल यांनी बीबीसीला सांगितलं की, विमानातील कर्मचारी जवळपास 4 दिवस खार्तूममध्ये थांबले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासाची तयारी करण्यासाठी ते विमानतळावर पोहोचले.

मात्र, विमानात चढल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला.

विमानात चढताच कर्मचाऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का

अफगाणिस्तानच्या राजदूतांनी 4 जणांसाठी व्हिसा जारी करण्यात आल्याचं सांगितलं होतं. मात्र, विमानात चढल्यानंतर कर्मचाऱ्यांना वेगळंच चित्र दिसलं.

"आम्ही विमानात चढलो, तेव्हा संपूर्ण विमान प्रवाशांनी भरलेलं होतं."

मोहम्मद उमर अफझल सांगतात की, ही परिस्थिती त्यांच्यासाठी अनपेक्षित होती. शिवाय, विमान प्रवासाच्या नेहमीच्या प्रक्रियेच्या अगदी विरुद्ध होती.

ते बीबीसीला सांगतात, "खरं सांगायचं तर, ही परिस्थिती अगदी विचित्र होती. आम्हाला वाटलं होतं की विमानात चारच प्रवासी असतील आणि उर्वरित विमान रिकामं असेल. विमानाच्या खालच्या मालवाहू भागात 11 टन सामान असेल."

त्यांच्या म्हणण्यानुसार, विमानातील कर्मचारी बोइंग 727 या विमानाच्या मागच्या दरवाजाने आत गेले. तिथे चढण्यासाठी पायऱ्याही लावण्यात आल्या होत्या. मात्र, विमानात पोहोचताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

माजी वैमानिक मोहम्मद उमर अफझल यांनी बीबीसी पश्तोला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
फोटो कॅप्शन, माजी वैमानिक मोहम्मद उमर अफझल यांनी बीबीसी पश्तोला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

मोहम्मद उमर अफझल सांगतात की, विमानातील मागच्या सीटजवळ पुस्तकं आणि कॉम्प्युटर ठेवण्यात आले होते. विमानात 4 ते 6 महिलाही होत्या आणि एकूण प्रवाशांची संख्या जवळपास 95 होती.

आधी सांगण्यात आलेल्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा ही संख्या कितीतरी जास्त होती.

विमानातील कर्मचाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला, तेव्हा विमान भाड्याने घेणाऱ्या कंपनीच्या समन्वयकाने उत्तर दिलं, "आम्ही हे विमान भाड्याने घेतलं आहे आणि त्याचे पैसेही दिले आहेत. आम्ही काय घेऊन जात आहोत, हे पाहणं आमचं काम आहे. तुम्हाला फक्त विमान उडवायचं आहे."

मोहम्मद उमर अफझल यांच्या म्हणण्यानुसार, विमानातील कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि अफगाणिस्तानच्या राजदूतांशी संपर्क साधण्याची मागणी केली. मात्र, त्यांना सांगण्यात आलं की, विमान भाड्याने घेतलं असून ते उडवण्याची जबाबदारी त्यांची आहे.

ते सांगतात की, विमानातील कर्मचारी प्रवाशांची नावानुसार ओळख पटवत नाहीत. ते फक्त प्रवाशांची एकूण संख्या तपासतात. त्यामुळे विमानात नेमकं कोण प्रवास करत होतं, हे जाणून घेणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं.

दुबईमार्गे अफगाणिस्तानचा प्रवास

परतीच्या प्रवासात विमान दुबईमध्ये काही वेळ थांबलं आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना झालं.

मोहम्मद उमर अफझल यांच्या म्हणण्यानुसार, विमान बगराममध्ये उतरणार होतं. मात्र, काबूलशी संपर्क साधला असता विमानाचं गंतव्यस्थान बदलण्यात आल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

नियंत्रण कक्षातून संदेश आला, "तुम्हाला काबूलमध्ये उतरण्याची परवानगी नाही. त्याऐवजी तुम्हाला जलालाबादमध्ये उतरावं लागेल."

मोहम्मद उमर अफझल यांच्या म्हणण्यानुसार, विमान जलालाबादमध्ये उतरलं, तेव्हा प्रवाशांचं स्वागत करण्यासाठी तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

ते सांगतात, "अफगाण नागरिकांबरोबरच अरब देशांमधील लोकही तिथे होते. मी जमियत-ए-इस्लामी, हिज्ब-ए-इस्लामी आणि इतर संघटनांच्या लोकांना पाहिलं."

"प्रवासी विमानातून खाली उतरले, तेव्हा सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लोक एकमेकांना मिठ्या मारत होते, शुभेच्छा देत होते. काही जण तर आनंदाने रडतही होते."

तोपर्यंत विमानातील कर्मचाऱ्यांना प्रवासी नेमके कोण होते, याची कल्पना नव्हती.

मोहम्मद उमर अफझल यांचा दावा आहे की, या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ओसामा बिन लादेनचाही समावेश होता, हे त्यांना अनेक वर्षांनंतर समजलं.

परतीच्या प्रवासात विमान दुबईमध्ये काही वेळ थांबलं आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना झालं.
फोटो कॅप्शन, परतीच्या प्रवासात विमान दुबईमध्ये काही वेळ थांबलं आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना झालं.

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर त्यांनी काबूल, कंदाहार, दुबई, शारजाह आणि जलालाबाद या शहरांदरम्यान नियमित व्यावसायिक विमानसेवा पुन्हा सुरू केली होती.

त्या काळात एरियानाची 3 ते 4 बोइंग 727 विमानं दररोज या मार्गांवरून उड्डाण करत असत.

मोहम्मद उमर अफझल यांच्या म्हणण्यानुसार, एकदा ते त्यांचे सहकारी कॅप्टन सैयद नबी यांच्यासोबत विमानप्रवास करत होते. त्यावेळी सैयद नबी यांनी त्यांना सांगितलं, "उमर, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे."

ते म्हणाले, "सुदानमधून आपण ज्या विमानातून प्रवाशांना आणलं होतं, त्यात कोण कोण होतं, हे तुला माहीत आहे का?"

त्यावर उमर यांनी विचारलं, "मला कसं माहीत असणार?"

त्यावर सैयद नबी म्हणाले, "तोच माणूस, तोच व्यक्ती त्या विमानातून आला होता."

हे ऐकून उमर यांनी आश्चर्याने विचारलं, "कॅप्टन, तुम्हाला हे कसं कळलं?"

त्यावर सैयद नबी यांनी उत्तर दिलं, "मौलवी मन्सूर यांनी मला स्वतः सांगितलं."

तालिबानच्या पहिल्या राजवटीत मौलवी मन्सूर हे नागरी उड्डाण वाहतूक मंत्री होते.

मोहम्मद उमर अफझल यांच्या म्हणण्यानुसार, मौलवी मन्सूर आणि सैयद नबी आगा यांचे जवळचे संबंध होते. मौलवी मन्सूर यांनी सैयद नबी यांना सांगितलं होतं, "तुम्हीच त्याला (ओसामा बिन लादेनला) अफगाणिस्तानात घेऊन आला होतात."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)