तामिळनाडूतील 'या' टेकडीवर दीप प्रज्वलनासाठी थेट सुप्रीम कोर्टाला आदेश का द्यावे लागले? जाणून घ्या वाद आणि इतिहास

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुपरनकुंद्रम टेकडीवर शनिवारी (28 नोव्हेंबर) संध्याकाळी कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्यात आला.
हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या प्रशासकीय समितीच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आला.
बीबीसी तमिळच्या माहितीनुसार, समितीने यापूर्वीच जाहीर केलं होतं की 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता टेकडीच्या माथ्यावर असलेल्या दगडी स्तंभावर दीप प्रज्वलित केला जाईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती.
सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून तिरुपरनकुंद्रम मंदिर आणि टेकडी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) तैनात करण्यात आलं होतं.
कार्यक्रमापूर्वी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले निवृत्त न्यायाधीश एस. वैद्यनाथन आणि व्ही. पार्थिबन यांनी तिरुपरनकुंद्रम सुब्रमण्य स्वामी मंदिरात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर दोन्ही न्यायाधीश दीप प्रज्वलनासाठी आवश्यक साहित्य घेऊन टेकडीच्या मार्गाने वर गेले.
दरम्यान, टेकडीवर असलेल्या सिकंदर दर्ग्यातही दुआ आणि प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात विशेष दक्षता बाळगण्यात आली होती.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडेल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली होती. दीप प्रज्वलित झाल्यानंतर कार्तिगई दीपमचा हा कार्यक्रम कोणतीही अनुचित घटना न घडता पार पडला.
प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहेत.
तामिळनाडूतील मदुराई येथे असलेल्या तिरुपरनकुंद्रम टेकडीला हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांसाठी धार्मिक महत्त्व आहे.
टेकडीवर एका बाजूला प्रसिद्ध तिरुपरनकुंद्रम सुब्रमण्य स्वामी मंदिर आहे. हे मंदिर भगवान मुरुगन यांच्या सहा प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी (आरुपडई वीडु) एक मानलं जातं. याच टेकडीवर सिकंदर दर्गाही आहे, जिथे मुस्लीम भाविक जातात.

End of podcast promotion
गेल्या वर्षी मद्रास हाय कोर्टाने याच प्रकरणात आदेश दिला होता. मात्र, तामिळनाडू सरकारने त्याची अंमलबजावणी केली नव्हती.
या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायाधीशांची रिसीव्हर म्हणून नियुक्ती करत तिरुपरनकुंद्रम मंदिराचं विश्वस्त मंडळ निलंबित केलं होतं.
सुप्रीम कोर्टाने कार्तिगई दीपमच्या दिवशी (24 नोव्हेंबर) तिरुपरनकुंद्रम टेकडीच्या माथ्यावर असलेल्या दगडी स्तंभावर एकदा दीप प्रज्वलित करण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्या दिवशी नेहमीप्रमाणे उचिपिल्लैयार मंदिराजवळील दीपम मंडपातच दीप प्रज्वलित करण्यात आला.
मात्र, यावेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी टाळणं सरकारसाठी कठीण झालं होतं. आदेशाचं पालन न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा कोर्टाने दिला होता.
या प्रकरणात तामिळनाडूच्या मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती.
गेल्या वर्षी हे प्रकरण मद्रास हाय कोर्टाच्या मदुराई खंडपीठात पोहोचलं होतं. त्यावेळी न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांनी पारंपरिक ठिकाण असलेल्या उचि पिल्लैयार मंडपाबरोबरच टेकडीच्या माथ्यावर असलेल्या दगडी स्तंभावरही दीपम प्रज्वलित करण्याचे आदेश दिले होते.
नंतर हाय कोर्टाच्या खंडपीठानेही हा आदेश कायम ठेवला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी केली नव्हती.
दीप केवळ पारंपरिक ठिकाण असलेल्या उचि पिल्लैयार मंडपातच प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर सरकारने न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नसल्याचा आरोप झाला.
तिरुपरनकुंद्रम वादाचा इतिहास
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या (ASI) वतीने हजर झालेल्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की तामिळनाडू पोलिसांनी ASI च्या अधिकाऱ्यांना तिरुपरनकुंद्रम येथील दीपस्तंभाची पाहणी करण्यापासून रोखलं.
ASI ने सांगितलं की त्यांचे अधिकारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 3.15 वाजता परिसरात पोहोचले होते. मात्र, तेथे कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली नाही.
मद्रास हायकोर्टाचा आदेश असूनही दीपस्तंभाची पाहणी करण्यापासून आपल्याला रोखण्यात आल्याचा आरोप ASI ने केला.
तिरुपरनकुंद्रम प्रकरणात तामिळनाडू सरकारची ही कारवाई प्रशासकीय अधिकारांमध्ये अतिक्रमण करणारी असल्याचं एएसआयने म्हटलं होतं.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी विनंतीही एएसआयने सुप्रीम कोर्टाकडे केली होती.
तसंच, न्यायालयाच्या देखरेखीखाली तामिळनाडू सरकारकडून आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक देखरेख समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती.
सुरक्षाव्यवस्थेसह या प्रकरणाच्या कोणत्याही बाबीत तामिळनाडू पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, अशी स्पष्ट मागणी ASI ने केली होती.
सर्व हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी एक बाह्य पथक तैनात करण्यात यावं, अशी मागणीही ASI ने केली होती.
'विश्वस्त मंडळाने आदेशाचं उल्लंघन केलं'
लाइव्ह लॉच्या एका वृत्तानुसार, तिरुपरनकुंद्रम दीपम वादात न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करण्याच्या विश्वस्त मंडळाच्या स्पष्ट निर्णयावर सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात असंही म्हटलं होतं की विश्वस्तांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने न्यायालयाच्या आदेशाचं गंभीर उल्लंघन केलं आहे.
नेहमीप्रमाणे उचिपिल्लैयार मंदिराच्या मंडपातच दीप प्रज्वलित करण्याच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयावरही न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचं जाणीवपूर्वक पालन न करण्याचा हेतू दर्शवतो.

फोटो स्रोत, Getty Images
विश्वस्तांचा हा ठराव सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि हाय कोर्टात दिलेलं आश्वासन यांचं महत्त्व कमी करण्याचा स्पष्ट प्रयत्न असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं होतं.
मंदिराचा वारसा काय आहे, हे आम्ही न्यायालयाला सांगू, या विश्वस्त मंडळाच्या वक्तव्याबाबतही न्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
या वक्तव्याद्वारे सुप्रीम कोर्टाला मंदिराचा वारसा समजत नसल्याचा अनावश्यक आरोप करण्यात आला आहे, असं न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटलं होतं.
मुख्य सचिवांसह 13 जणांना हजर राहण्याचे आदेश
सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, हिंदू धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभागाचे आयुक्त, मदुराईचे जिल्हाधिकारी, मदुराईचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, मदुराईचे पोलीस अधीक्षक, सुब्रमण्य स्वामी मंदिराचे कार्यकारी अधिकारी, विश्वस्त मंडळ आणि विश्वस्तांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने या सर्वांना केली होती.
संबंधित व्यक्तींना नोटीस जारी झाल्याच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागेल.

फोटो स्रोत, ANI
याशिवाय, पुढील सुनावणीवेळी या सर्वांनी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहावं, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
मंदिर प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, त्यामुळे विश्वस्त मंडळाला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






























