400 हून अधिक मृतदेह सापडले; केनियातील 'डूम्सडे' पंथाच्या धर्मगुरूमुळे चिमुकल्यांसह अनेकांचा धक्कादायक अंत कसा झाला?

फोटो स्रोत, Reuters
- Author, पॅट्रिक जॅक्सन
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
(सूचना: या बातमीतील काही माहिती अस्वस्थ करू शकते.)
केनियातील एका न्यायालयानं ख्रिश्चन धर्मातील डूम्सडे (प्रलयकाळ किंवा जगाचा शेवट) पंथाच्या प्रमुखाला त्याच्या 123 अनुयायांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलं आहे.
पॉल मॅकेन्झी याला मोम्बासा न्यायालयाने दोषी ठरवलं. जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2023 या काळात त्याने आपल्या प्रौढ अनुयायांना समुद्रकिनाऱ्याजवळील शाकाहोला जंगलात उपाशी राहून मृत्यू पत्करण्याचे आदेश दिले होते.
याच सामूहिक हत्याकांडातील 191 जणांच्या हत्येप्रकरणी या महिन्याच्या सुरुवातीला मॅकेन्झीला 200 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मृतांमध्ये एक व्यक्ती वगळता उर्वरित सर्व लहान मुलं होती.
मॅकेन्झीने सदोष मनुष्यवधाचे आरोप फेटाळले होते. या प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर शिक्षेविरोधात अपील करणार असल्याचे त्याच्या एका वकिलाने सांगितलं, असे रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
न्यायालयाने या प्रकरणात मॅकेन्झीची पत्नी रोडा मुम्बुआ मावेऊसह आणखी 29 जणांनाही सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आहे.
या प्रकरणातील 60 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. परंतु, सरकारी वकील कार्यालयाने त्यांच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे सांगितलं आहे.
एकत्रित जीवन संपवण्याचा निर्णय
हिंदी महासागराच्या किनाऱ्याजवळ असलेल्या शाकाहोला जंगलात उथळ कबरींमध्ये 400 हून अधिक मृतदेह आढळून आल्यानंतर 2023 मध्ये स्वतःला धर्मगुरू म्हणवणाऱ्या या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.
मॅकेन्झीने अनुयायांना 'उपाशी राहून मृत्यू पत्करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रवृत्त केलं', असं न्यायालयाने म्हटलं आहे.
शुक्रवारी (27 नोव्हेंबर) दिलेला हा निकाल त्याच्याविरोधातील खटल्यांमधील 'अंतिम निकाल' असल्याचे केनियाच्या सरकारी वकील कार्यालयाने निवेदनात म्हटलं आहे.
सरकारी वकील कार्यालयानं सांगितलं की, या योजनेनुसार सर्वात आधी मुलांनी, त्यानंतर महिलांनी आणि शेवटी पुरुषांनी उपाशी राहून प्राण सोडायचे होते. सर्वात शेवटी मॅकेन्झी स्वतः मृत्यू पत्करणार होता.
सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितलं की, 'येशूला भेटण्यासाठी' उपाशी राहून मृत्यू पत्करण्याची योजना (सुसाइड पॅक्ट) मॅकेन्झी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आखली होती. या योजनेनुसार सर्वांनी एकत्रित आत्महत्या करण्याचं ठरवलं होतं.
साक्षीदारांनी आपल्या साक्षीत म्हटलं की, मॅकेन्झी शिक्षण घेणं, औषधं वापरणं आणि दागिने घालणं ही पापाची कामं असल्याचे आपल्या अनुयायांना सांगत असत.

फोटो स्रोत, Mohamed Madi / BBC
191 जणांच्या हत्येप्रकरणी झालेल्या खटल्याच्या निकालानुसार, मॅकेन्झीच्या शिकवणीला विरोध करणाऱ्यांना मारहाण करून ठार मारलं जात होतं.
परंतु, मृतांनी स्वतःच्या इच्छेनं उपवास करून प्राण सोडले, असा दावा प्रतिवादींनी केला होता.
या आठवड्याच्या सुरुवातीला मॅकेन्झीला आणखी काही गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले. त्यात पुढील गुन्ह्यांचा समावेश आहे :
- मारहाण करून दुखापत करणे आणि मुलांशी क्रूरपणे वागल्याचे पाच गुन्हे.
- संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होणे.
- कट्टरपंथी बनवणे
- दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी मदत करणे.
- केनियाच्या 2012 च्या दहशतवादविरोधी कायद्यानुसार गुन्ह्याशी संबंधित वस्तू जवळ बाळगणे.
शिक्षण, औषधोपचार याला विरोध
End of podcast promotion
मॅकेन्झीने 2003 मध्ये 'गुड न्यूज इंटरनॅशनल मिनिस्ट्रीज' या चर्चची स्थापना केली. पुढील 16 वर्षांत या चर्चची लोकप्रियता वाढली आणि केनियातील वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचे अनुयायी हजारोंच्या संख्येने वाढले.
मालिंदी या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील त्याच्या चर्चमधून दिली जाणारी प्रवचनं 'टाइम्स टीव्ही' नावाची वाहिनी प्रसारित करत असत.
त्याच्या जगाच्या शेवटाबाबतच्या प्रवचनांमध्ये अनेक कटकारस्थानांचे दावे केले जात असत. शिक्षणाला तो 'वाईट', आरोग्यसेवेला 'तत्त्वप्रणालीच्या विरुद्ध' आणि डिजिटल ओळखपत्रांना 'सैतानाची खूण' असं म्हणत असे.
2019 मध्ये मुख्य चर्च बंद झाल्यानंतर मॅकेन्झी शाकाहोला जंगलात राहायला गेला. त्याने आपल्या अनुयायांनाही त्याच्यासोबत तिथे येण्यास प्रोत्साहित केलं.
या समुदायातील लोक जंगलाच्या मोठ्या परिसरात ठिकठिकाणी बांधलेल्या मातीच्या घरांमध्ये राहत होते.
"आम्ही शांतपणे सामान्य जीवन जगत होतो. काही दिवस उपवास करायचो आणि त्यानंतर थोडेसं जेवण घ्यायचो," असं या घटनेतून बचावलेले पीटर शुक्रानी यांनी सांगितलं. आजारी पडल्यानंतर त्यांची तेथून सुटका करण्यात आली होती.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
उथळ कबरी आढळून आल्यानंतर त्यातील मृतदेह बाहेर काढण्याचे अत्यंत कठीण आणि भयावह काम करण्यासाठी स्थानिक पुरुषांना कामावर ठेवण्यात आले होते.
"आम्हाला सापडलेल्या प्रत्येक कबरीत किमान 3 मृतदेह होते. काही मृतदेह काही आठवड्यांच्या लहान बाळांचेही होते," असं कबरी खोदण्याचे काम करणाऱ्या जेम्स यांनी बीबीसीला सांगितलं.
"एकदा आम्हाला एका कबरीत लहान मुलांचे 12 मृतदेह एका रांगेत आढळून आले. ती मोठी कबर होती. कपड्यांचा ढीग रचावा, तसे एकावर एक मृतदेह ठेवले होते."
कबरी खोदणाऱ्यांनी सांगितले की, काही मुलांचे हात-पाय बांधलेले होते आणि त्यांचे मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत होते.
शवविच्छेदन अहवालानुसार, अनेकांचा मृत्यू उपासमारीमुळे झाला होता. तर काही मृतदेहांची केवळ हाडेच शिल्लक राहिली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे मात्र समजू शकले नाही.
48 वर्षीय स्टीफन म्विटी यांनी सांगितलं की, या पंथामुळे त्यांनी आपली सहाही मुलं गमावली. मॅकेन्झीसोबत हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये त्यांच्या माजी पत्नीचाही समावेश आहे.
"सर्व आरोपींना दोषी ठरवण्यात आलं, याचा मला आनंद आहे," असं त्यांनी गेल्या महिन्यात न्यायालयाबाहेर बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
"माझी सहाही मुले शाकाहोला जंगलात मरण पावली. त्यापैकी माझा मुलगा सॅम्युअल याचेच अवशेष मला सापडले आणि त्याचे मला दफन करता आले."
या मृत्यूमुळे अनधिकृत धार्मिक कारवायांवर देखरेख ठेवण्यात असलेल्या त्रुटी आणि इतकी वर्षे या कारवाया कशा सुरू राहिल्या, याकडे लक्ष वेधलं गेलं आहे.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी चौकशी आयोगाची स्थापना केली होती. परंतु, नंतर हा आयोग घटनाबाह्य असल्याचे घोषित करण्यात आले.
(अतिरिक्त वार्तांकन: थॉमस मुखवाना)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






























