You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रक्षाबंधन : भावाच्या मनगटावर नाही, तर त्याच्या 'धडधडणाऱ्या हृदयावर' बहिणीनं बांधली राखी
यंदाच्या रक्षाबंधन सणाला 25 वर्षीय निधी पटेल भरुच जिल्ह्यातील हंसोटजवळच्या असरामा गावात पोहोचली.
तिला रविराज महिदाच्या मनगटावर राखी बांधायची होती. याच रविराजला तीन वर्षांपूर्वी तिचा भाऊ शैशव पटेलचं हृदय देण्यात आलं होतं.
18 मार्च 2023 रोजी झालेल्या एका अपघातानंतर 24 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर शैशव पटेल यांना सूरत येथील AIIMS रुग्णालयात डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलं होतं.
त्यानंतर त्यांच्या कुटुंबानं त्यांचं हृदय, फुफ्फुसं, यकृत, मूत्रपिंड आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.
मार्च 2023 मध्ये सूरत येथील महावीर रुग्णालयात 22 वर्षीय रविराज महिदा याच्यावर हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं. त्याला शैशवचे हृदय देण्यात आलं.
रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा वेगळा आणि भावनिक उत्सव साजरा झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबं आणखी जवळ आली आहेत.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबांमध्ये भावनिक क्षण निर्माण झाले. ज्या युवकाच्या हृदयाचे प्रत्यारोपण झाले होते, त्या युवकाच्या घरी अवयवदान करणाऱ्या मुलाच्या बहिणीनं जाऊन त्याला राखी बांधली.
जणू भावाच्या हृदयालाच राखी बांधली
रक्षाबंधनाच्या दिवशी शैशवची बहीण निधी आणि तिची आई मनीषा आपल्या हाजत गावातून रविराजच्या गावात पोहोचल्या होत्या.
हातात राखी आणि मनात भावाच्या आठवणी स्मरत निधीनं रविराजला राखी बांधली.
यावेळी रविराज भावूक होत म्हणाला, "शैशवचं हृदय माझ्या शरीरात धडधडत आहे. निधीनं बांधलेली ही राखी फक्त माझ्या हातावर नाही, तर दोन कुटुंबांच्या हृदयांवर बांधली गेलीय."
तो पुढे म्हणाला, "शैशवनं मला केवळ नवं जीवन दिलेलं नाही, तर निधीसारखी बहीणही दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून निधी मला राखी बांधण्यासाठी येथे येते."
बीबीसी गुजरातीशी बोलताना निधी म्हणाल्या, "माझा भाऊ प्रत्यक्ष आमच्यात नाही, पण तो अप्रत्यक्षपणे आमच्यासोबत आहे."
"त्याचं हृदय रविराजच्या शरिरामध्ये धडधडत आहे. मी देवाकडे प्रार्थना करते की माझा हा भाऊ खूप आनंदी राहो आणि आयुष्यात खूप प्रगती करो."
या प्रत्यारोपणात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या 'डोनेट लाइफ' संस्थेचे संस्थापक नीलेश मंडलेवाला यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय, "हा केवळ रक्षाबंधनाचा सण नाही, तर मानवतेच्या अतूट नात्याचा उत्सव आहे. दोन अनोळखी व्यक्तींच्या हृदयांनी दोन कुटुंबांना प्रेमाच्या अशा पवित्र बंधनात बांधलंय, जे रक्ताच्या नात्यांपेक्षाही जवळचं आहे. अवयवदान केवळ जीव वाचवत नाही, तर नातेसंबंधांनाही नवी ओळख देते."
रविराज महिदा सांगतात, "2022 मध्ये मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर माझ्यावर सूरतमध्ये उपचार सुरू होते, पण माझ्या हृदयाची पंपिंग क्षमता वाढत नव्हती.
माझ्या प्रकृतीनुसार मला हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. त्यामुळे माझी यात नावनोंदणी करण्यात आली आणि त्यानंतर मला शैशवचं हृदय मिळालं. त्यामुळे मला नवं जीवन मिळालं."
निधीबेन यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या भावाचा अपघात झाला होता. सूरतमध्ये उपचार सुरू असताना त्याचे निधन झालं. डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं होतं."
"भावाचं पार्थिव घेऊन जाण्याऐवजी त्याच्या अवयवांचं दान केल्यास, कोणाला तरी नवजीवन मिळू शकतं, हे कुटुंबाला समजलं. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तींचंही अवयवदान करता येतं. त्यामुळे आमच्या कुटुंबानं हा निर्णय घेतला."
"आजकाल अनेक लोक अवयव निकामी होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत."
रक्षाबंधनाच्या निमित्तानं संदेश देताना निधी पटेल म्हणाल्या, "माझ्याकडे भाऊ नाही, पण त्याचे हृदय माझ्यासोबत आहे. तेच माझ्यासाठी सर्वकाही आहे."
"भाऊ नसला तरी त्याच्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. त्यामुळे आपणही मानवतेच्या या कार्याबद्दल विचार केला पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)