छत्रपती संभाजीनगर : दुर्दैवी घटनेत कुटुंबाचा अंत, 400 फूट खोल दरीत कोसळले बाप-लेक; आईनंही जीवन संपवलं

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरालगतच्या तिसगाव येथील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 21 ऑगस्ट रोजी घडली आहे.

या घटनेत मुरलीधर दामोधर चांदगुडे, त्यांच्या पत्नी संगीता मुरलीधर चांदगुडे आणि मुलगा कुणाल मुरलीधर चांदगुडे यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोबाईल फोनच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादानंतर कुणाल चांदगुडे स्वत:चा जीव घेण्याच्या उद्देशाने खवड्या डोंगराच्या कड्यावर गेला होता.

एका युवकाने डोंगरावरून उडी मारण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीही तणावाचा सामना करत असाल, तर तुम्ही भारत सरकारच्या 'जीवन आस्था' हेल्पलाइन 18002333330 वर मदत मिळवू शकता. तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांशीसुद्धा बोलले पाहिजे.)

शॉर्ट व्हीडिओ पाहा

युवकाला समजावून सांगून त्याचा स्वत:चा जीव घेण्याचे विचार बदलवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

तसेच डोंगराखाली सुरक्षेच्या दृष्टीने जाळीही लावण्यात आली होती. मात्र, कुणाल वारंवार आपली जागा बदलत असल्याने बचावकार्याला अडथळे येत होते.

दरम्यान, कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे घटनास्थळी पोहोचले. मुलाला वाचवण्यासाठी आणि कड्यापासून दूर खेचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नादरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते मुलासह खोल दरीत कोसळले.

ही घटना डोळ्यांसमोर घडल्यानंतर आई संगीता चांदगुडे यांना मोठा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, पती आणि मुलगा दरीत पडल्याचे पाहून त्यांनीही स्वतःचं जीवन संपवलं. या तिघांचाही मृत्यू झाला.

या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी रामेश्वर गाडे यांनी सांगितलं की, "21 ऑगस्ट रोजी खवड्या डोंगरावर एक व्यक्ती स्वत:चा जीव देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत युवकाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

त्याला वाचवण्यासाठी खाली जाळीही लावण्यात आली होती. मात्र, तो वारंवार आपली जागा बदलत होता. त्याचवेळी त्याचे वडील तिथे आले आणि मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दोघेही दरीत कोसळले.

त्यानंतर आईनेही उडी घेतली. पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते."

गाडे यांनी सांगितले की, डोंगराची उंची सुमारे 400 ते 500 फूट आहे. "एका मोबाईल फोनच्या कारणावरून झालेल्या वादामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले," असेही त्यांनी म्हटले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे तिसगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्षदर्शीनं काय सांगितलं?

संजय जाधव या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, तो तरुण जवळपास तीन तास कड्याच्या टोकावर बसून राहिला आणि तिथून बाजूला होण्यासाठी स्थानिक लोक व पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या वारंवार विनंत्यांना त्यानं कोणताही प्रतिसाद दिला नाही.

ते म्हणाले की, "18 वर्षांचा एक तरुण इथे येऊन कड्याच्या टोकावर बसला होता. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तो तिथून हलण्यास तयार नव्हता. मी तिथे पोलिसांसोबत उपस्थित होतो. मात्र, तो तरुण कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो आपली जागा बदलत होता आणि त्याच वेळी आपल्या आईशी बोलत होता. त्याची आई त्याला विनवणी करत होती आणि असं न करण्याची कळकळीची विनंती करत होती. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो नैराश्याचा सामना करत होता," असे संजय जाधव यांनी 'एएनआय'ला सांगितलं.

त्यांनी पुढे सांगितले की, "जवळपास तीन तास मी त्याला समजावण्याचा आणि खाली येण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्याचे वडीलही तिथे आले. आम्हाला वाटलं की त्याचे वडील त्याला समजावून सुरक्षितपणे खाली आणू शकतील. पण काही मिनिटांतच, त्याच्या वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या गडबडीत तो तरुण व त्याचे वडील दोघेही खाली पडले. त्यानंतर, त्याच्या आईनंही जीवन संपवलं ."

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)