You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात 'या' भागात पाऊस, कसा असेल हवामानाचा अंदाज
आज (2 ऑगस्ट 2026 ) रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर या भागात सध्या पाऊस सुरू आहे.
अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू आहे.
या भागात तुरळक ठिकाणी कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती.
मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडला आहे.
3 ऑगस्ट 2026 रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम देण्यात आला आहे.
4 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
5 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
उत्तराखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेनी सांगितले आहे.
केरळमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात हवामान कसं असेल?
देशात ऑगस्ट महिन्यात आणि नैऋत्य मान्सूनाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
एकूण पाऊस पाहता महाराष्ट्रात नाशिकच्या आसपासचा परिसर वगळता जवळपास सर्वच भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
घाट क्षेत्रात आणि कोकणात नेहमीच्या सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस पडू शकतो. तर, विदर्भ आणि मराठवाड्यात ॲागस्टमधल्या नेहमीच्या मासिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातही देशातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तापमानाबाबतही हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
मात्र, वायव्य भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पालगतच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीएवढं आणि काही भागात सरासरीपेक्षा जास्त राहू शकतं.
किमान तापमान मात्र बहुतांश भागात सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात मध्यम स्वरूपाचा एल निनो सक्रिय असल्याचं सांगितलं आहे. तसेच मान्सूनच्या उर्वरित कालावधीत तो आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल सध्या तटस्थ स्थितीत असून तो मान्सूनच्या उर्वरित कालावधीत कायम राहण्याची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)