डिलिमिटेशन लागू झाल्यानंतर खासदार-आमदारांच्या पगार, भत्ते आणि इतर खर्चात किती वाढ होणार?

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहाच्या कामकाजाचं संचालन करताना
फोटो कॅप्शन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहाच्या कामकाजाचं संचालन करताना
    • Author, चंदन कुमार जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतात डिलिमिटेशन विधेयक म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून वातावरण तापलं आहे.

एकीकडे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला उघडपणे विरोध केला आहे, तर दुसरीकडे काही पक्षांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनात मोदी सरकार डिलिमिटेशन बिल मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करेल.

या राजकीय चर्चांमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, जर हे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर झालं आणि नवीन पुनर्रचना लागू झाली, तर लोकसभा तसंच राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल होतील. शिवाय या पुनर्रचनेनंतर या जागांची संख्याही बदलणार आहे.

सध्याच्या प्रस्तावांनुसार जर हे डिलिमिटेशन विधेयक मंजूर झालं, तर लोकसभेच्या जागांची संख्या 543 वरून जास्तीत जास्त 850 पर्यंत वाढू शकते.

विरोधी पक्षांचा असाही एक आरोप आहे की, खासदारांची संख्या वाढल्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा खर्चाचा बोजा आणखी वाढेल.

विरोधकांचा आरोप

भारताच्या नव्या संसद भवनात लोकसभेचे 888 सदस्य बसू शकतील इतकी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तर वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी 384 सदस्यांची आसनक्षमता आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीवेळी नव्या संसद भवनात एकाच वेळी 1,272 सदस्य बसू शकतील.

भविष्यात खासदारांची संख्या वाढणार असल्याचं गृहीत धरूनच नवीन संसद भवन बांधण्यात आलं आहे. हे भवन उभारण्यासाठी 862 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सध्या भारतात लोकसभेच्या 543, तर राज्यसभेच्या 245 जागा आहेत.

यावर राज्यसभा खासदार संजय सिंह यांचं म्हणणं आहे की, अमेरिकेत 1929 नंतर देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली, पण तिथे खासदारांची संख्या मात्र वाढवली गेली नाही.

संजय सिंह यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं, "भारतात लोकसंख्या वाढली खरी, पण सर्वसामान्यांसाठी डॉक्टर, शिक्षक, शाळा, रुग्णालयं आणि तरुणांसाठी रोजगार वाढवले जात नाहीत. फक्त भाजपला निवडणुका जिंकवून देण्यासाठी खासदारांची संख्या वाढवली जात आहे."

जास्त खासदारांना बसता यावं यासाठी नवीन संसद भवन याआधीच बांधून तयार झालं आहे ज्यावर 800 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.
फोटो कॅप्शन, जास्त खासदारांना बसता यावं यासाठी नवीन संसद भवन याआधीच बांधून तयार झालं आहे ज्यावर 800 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.

30 नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं असून यात हे डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार आहे.

तर दुसरीकडे 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 'एक्स'वर पोस्ट करत दावा केला, "सध्या 68 मंत्री असलेल्या मंत्रिमंडळावर सरकार दरवर्षी करदात्यांचे 620 कोटी रुपये खर्च करतं. म्हणजेच सरासरी प्रत्येक मंत्र्यावर दरवर्षी करदात्यांचे 9.1 कोटी रुपये खर्च होतात."

"डिलिमिटेशननंतर मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या 81 वरून वाढून 122 पर्यंत जाऊ शकते. या 41 अतिरिक्त मंत्र्यांवर सरकारला दरवर्षी अंदाजे 374 कोटी रुपये अधिक खर्च करावे लागू शकतात."

अभिजीत दिपके यांच्या मते, लोकसभा आणि मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास त्यातून सर्वसामान्य जनतेच्या हाती काहीही लागणार नाही.

मुळात संविधानातील तरतुदींनुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभा किंवा राज्याच्या विधानसभेच्या एकूण जागांच्या 15 टक्क्यांहून अधिक असू शकत नाही.

यामुळे एकूण जागांची संख्या वाढली, तर साहजिकच सरकारला जास्त लोकांना मंत्रीपद देण्याची संधी मिळेल.

जागांचं गणित कसं बदलू शकतं?

केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल यांनी 16 एप्रिलला संसदेत 3 विधेयके सादर केली होती. महिला आरक्षण लागू करणं आणि लोकसभेच्या जागांची संख्या वाढवणं हा या विधेयकांचा मुख्य उद्देश आहे.

यावर बोलताना मेघवाल म्हणाले होते, "लोकसभेच्या सदस्यांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ केली जाईल. यामुळे लोकसभेतील खासदारांची एकूण संख्या वाढून 815 इतकी होईल आणि त्यापैकी 272 जागा महिलांसाठी राखीव असतील."

फक्त भाजपला निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठीच 'डिलिमिटेशन' केलं जात आहे, असं आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांचं म्हणणं आहे.
फोटो कॅप्शन, फक्त भाजपला निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठीच 'डिलिमिटेशन' केलं जात आहे, असं आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे 'पीआरएस इंडिया' या स्वायत्त संशोधन संस्थेनुसार सरकारने घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतल्यास लोकसभेतील खासदारांची कमाल संख्या 850 पर्यंत जाऊ शकते. सध्या ही मर्यादा 550 इतकी आहे.

इतकंच नाही तर डिलिमिटेशन लागू झाल्यास विधानसभांच्या जागांमध्येही 50 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मिळून एकूण 4,123 आमदार आहेत. ही संख्या वाढून 6,185 पर्यंत पोहोचू शकते. सध्या राज्यसभेतील जागांची जास्तीत जास्त संख्या 250 इतकी आहे.

"या नव्या गणितामुळे सरकारला एक मोठा फायदा होणार आहे. तो म्हणजे एखाद्या मुद्द्यावर जर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली गेली, तर लोकसभेतील वाढलेल्या जागांच्या जोरावर सरकारचं पारडं आधीपेक्षा जास्त जड राहील."

डिलिमिटेशननंतर खर्च किती वाढणार?

डिलिमिटेशनमुळे सरकारी तिजोरीवरचा ताण वाढणार हे नक्की आहे. सध्या भारत सरकार एका खासदारावर दरमहा सुमारे 2 लाख 86 हजार रुपये खर्च करतं, म्हणजेच वर्षाला हा आकडा साधारण 35 लाखांच्या घरात जातो.

यामध्ये 1 लाख 24 हजार रुपये मूळ पगार, 87 हजार रुपये मतदारसंघाचा भत्ता आणि 75 हजार रुपये ऑफिसच्या खर्चासाठी दिले जातात.

इतकंच नाही तर संसदेच्या अधिवेशनादरम्यान किंवा संसदीय समितीच्या बैठकांसाठी खासदारांना इतरही अनेक सुविधा मिळतात ज्यांचा खर्च सरकार उचलतं.

यामध्ये मोफत विमान प्रवास, मोफत रेल्वे प्रवास आणि रस्ते प्रवासाचा खर्चही सरकारकडून दिला जातो.

यासोबतच खासदारांना दरवर्षी 1.5 लाख मोफत लोकल कॉल्स, गाडी खरेदी करण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंतची आगाऊ रक्कम, वर्षाला 4 हजार किलोलिटर मोफत पाणी आणि 50 हजार युनिट मोफत वीज अशा सुविधाही दिल्या जातात.

भारत सरकार सध्या प्रत्येक खासदारावर दरमहा सुमारे 2 लाख 86 हजार रुपये खर्च करतं.
फोटो कॅप्शन, भारत सरकार सध्या प्रत्येक खासदारावर दरमहा सुमारे 2 लाख 86 हजार रुपये खर्च करतं.

जर डिलिमिटेशननंतर लोकसभेतील खासदारांची संख्या 850 पर्यंत गेली तर सरकारचा दरमहा होणारा खर्च 186 कोटी रुपयांवरून थेट 291 कोटी रुपयांवर जाईल.

साहजिकच खासदार वाढले की त्यांच्या राहण्याची घरं, सुरक्षा आणि इतर सोयीसुविधांचीही सोय करावी लागेल. तसंच लोकसभा किंवा विधानसभांच्या जागा वाढल्यास त्याचा मोठा परिणाम निवडणुकीच्या खर्चावरही होऊ शकतो.

आमदारांवर होणारा खर्च

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आमदारांच्या बाबतीत सांगायचं तर प्रत्येक राज्यानुसार त्यांचे पगार आणि भत्ते वेगवेगळे असतात. आता जर आमदारांची संख्या वाढली तर त्यांच्यावर होणारा हा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढणार हे नक्की.

उदाहरणच द्यायचं तर राजधानी दिल्लीचं घेऊ. दिल्ली विधानसभेच्या वेबसाइटवरच्या माहितीनुसार तिथल्या एका आमदाराला दरमहा 30 हजार रुपये पगार मिळतो. तर मतदारसंघाच्या कामांसाठी भत्ता म्हणून महिन्याला 25 हजार रुपये दिले जातात.

याशिवाय दिल्लीतल्या आमदारांना ऑफिससाठी दरमहा 15 हजार रुपये दिले जातात. सोबतच प्रत्येक आमदाराला महिन्याला 10 हजार रुपये फोनचा खर्च आणि 10 हजार रुपये प्रवास भत्ताही मिळतो. याव्यतिरिक्त त्यांना रोजचा दीड हजार रुपये भत्ताही दिला जातो.

तसंच लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर किंवा मोबाईल यांसारखी कामकाजाची साधनं विकत घेण्यासाठी दिल्लीतल्या आमदारांना एकदाच वेगळे 1 लाख रुपयेही दिले जातात.

दिल्लीतल्या प्रत्येक आमदाराला स्वतःसाठी किंवा कुटुंबासोबत प्रवासासाठी दरवर्षी जास्तीत जास्त 1 लाख रुपये दिले जातात.

याशिवाय आमदारांच्या दरमहा वीज आणि इतर सुविधांवरही सरकारकडून खर्च केला जातो. आमदारांना आरोग्य सुविधाही पुरवल्या जातात. तसंच महिन्याला 4 डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या पगारासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकारकडून परत मिळवू शकतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)