महाराष्ट्रात 3 ते 7 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार, मराठवाडा आणि विदर्भात 'अशी' असणार स्थिती

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 3 ते 7 जुलैदरम्यान पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्रातील पठारी प्रदेश आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर विदर्भात 3 ते 7 जुलैदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वाढल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

मुंबईमध्ये 3 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढील 72 तासांत शहर आणि उपनगरात पुढील 48 ते 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांत वाहतुकीवर परिणाम होण्याबरोबरच सखल भागांत पाणी साचून स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे किती पाऊस

मागील 24 तासांत म्हणजे 2 जुलैला सकाळी 8.30 ते 3 जुलै सकाळी 8.30 दरम्यान सह्याद्रीच्या घाटमाथा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

रायगड आणि पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, भिरा येथे सर्वाधिक 210 मिमी पावसाची नोंद झाली.

त्यानंतर ताम्हिणी येथे 170 मिमी, डोंगरवाडी 141 मिमी, लोणावळा कार्यालय 140 मिमी, दावडी 135 मिमी, शिरगाव 130 मिमी, धारावी 122 मिमी, लोणावळा 116 मिमी, आंबोणे 108 मिमी आणि खोपोली येथे 100 मिमी पाऊस झाला.

भिरा येथे आतापर्यंत तब्बल 1,675 मिमी पावसाची नोंद झाली असून, डोंगरवाडी (821 मिमी), ताम्हिणी (794 मिमी), पोफळी (729 मिमी), लोणावळा कार्यालय (659 मिमी), धारावी (632 मिमी), दावडी (615 मिमी) आणि शिरगाव (571 मिमी) येथेही लक्षणीय पाऊस झाला आहे.

घाटमाथ्यावर सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठी आवक होत असून, नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना घाट परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

पुढच्या 4 आठवड्यांचा अंदाज

दर गुरुवारी हवामान विभाग पुढच्या चार आठवड्यांचा विस्तारीत अंदाज जाहीर करतो.

2 जुलैच्या विस्तारीत अंदाजानुसार, पुढच्या 2 आठवड्यांत राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

2-9 जुलै या पहिल्या आठवड्यात राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

9-16 जुलै या आठवड्यात उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त, पण इतर ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

16 ते 23 जुलै आणि 23 जुलै ते 3 ऑगस्ट या आठवड्यात मान्सूनच्या पावसात खंड पडण्याची चिन्हं आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)