मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?

    • Author, छाया काविरे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

तुमच्या भागात पावसाचा अलर्ट आहे का? कमी दाबाच्या क्षेत्राची काय स्थिती आहे? पाहूयात.

कमी दाबाचे क्षेत्र सध्या बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात स्थित आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, समुद्रामध्ये ओडिशा राज्याची दक्षिण किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी जिथे एकत्र येते, त्या किनाऱ्याजवळ ढगांचा आणि वाऱ्याचा एक मोठा पट्टा तयार झाला आहे.

हा कमी दाबाचा पट्टा अधिक शक्तिशाली होत असून, पुढील 24 तासांत तो पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

म्हणजेच तो समुद्रातून पुढे येऊन दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडून जमिनीवर प्रवेश करेल. त्यामुळे या भागांसह महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढेल.

दक्षिण महाराष्ट्र वगळता कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासोबत 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

12 सप्टेंबरचा अंदाज :

12 सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत.

तर, उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव. याचबरोबर पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे सगळे जिल्हे यलो अलर्टवर आहेत.

13 सप्टेंबरचा अंदाज:

13 सप्टेंबरला हवामान कसं असेल? तर 13 सप्टेंबरला धुळे, नंदुरबार, नाशिकचा घाटाचा परिसर हे भाग ऑरेंज अलर्टवर आहेत. 24 तासांत 115.6 मिमी ते 204.4 मिमी इतका पाऊस ऑरेंज अलर्ट असताना पडण्याची शक्यता असते.

तर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हे जिल्हे पावसाच्या येलो अलर्टवर आहेत.

हे जिल्हे वगळता नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर इथे पावसाच्या हलक्या सरी बसण्याची शक्यता आहे.

14 सप्टेंबरचा अंदाज:

14 सप्टेंबरला नंदुरबार, नाशिकचा घाटाचा परिसर, अहल्यानगर, पुणे आणि पुण्याचा घाटाचा परिसर या भागांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे भाग वगळता इतर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील पण मुसळधार पावसाचा इशारा कुठेही देण्यात आलेला नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)